गोष्ट गुणवंत कुमाराची

(म्यानमारची लोककथा)

राजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे
लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या)
जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी
होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते.



(म्यानमारची लोककथा)

राजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे
लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या)
जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी
होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते. बरोबर राणी यावेळी
प्रसूतिगृहात होती, बाळ होणार होते. मुलगा झाला तर सोन्याची साखळी
ओढली जाणार ! मुलगी झाली तर चांदीची ! त्यांचे डोळे साखळ्यांवर गुंतलेले
होते.
‘प्रधान, मला वाटतं सोनेरी साखळी ओढली गेली-हलतेय ती.’ राजा
म्हणाला. प्रधान हसत म्हणाला-
‘आपल्याला भास झाला महाराज. घंटा नसत्या का वाजल्या साखळी
ओढली गेली असती तर ? मी पण प्रार्थना करतो आहे सोन्याची साखळी
ओढली जावी! पांढऱ्या हत्तीवरून मिठाई वाटणार आहोत आपण-‘
‘थांबा ! पहा पहा ! घंटा वाजू लागल्या ! अरे ! दोन्ही साखळ्या ओढल्या
गेल्या! म्हणजे?’
‘म्हणजे-जुळे! एक पुत्र एक कन्या दोन बाळे झाली !
प्रधान म्हणाला व उठलाच- पॅगोडाला दानदक्षिणा देण्याचं पवित्र काम आधी
करून टाका महाराज – तो घाईने म्हणाला.
‘नाही प्रधानजी ! आधी मी माझी बाळं डोळ्यांनी बघतो, अन् मग ते सारं !
चला, मला तर केव्हा बाळं बघेनसं झालंय.’
राजा उत्साहाने म्हणाला व लगबगीने प्रसूतिगृहाकडे आला तर तेथे
भलताच प्रकार ! दाई व सुईण डोळ्यांतून पाणी गाळताहेत व राणी हुंदके देऊन
रडते आहे ! काय झालं तरी काय ? बाळ उपजताच तर त्याचं काही बरंवाईट
झालं नाही ना ? राजाने राणीकडे धाव घेतली तोवर ती बेशुद्ध झाली ! सुईण
म्हणाली – ‘महाराज बुद्ध भगवानांची आपल्यावर अवकृपा झाली आहे. राणी
सरकारांना त्यांना-त्यांना-‘ तिने रडायला सुरवात केली.
‘ऑ? त्यांना- त्यांना काय झालं? लौकर बोल-मुलगा की ‘
‘नाही हो! त्यांना मूल झालंच नाही महाराज; हे एक भले मोठे अंडे झाले आहे
फणसाएवढे ! हे पाहून त्या रडत होत्या आपणाला पाहून तर शुद्धच गेली त्यांची’
‘अन् मी हे अंडे बघूनच दोन्ही साखळ्या चुकून ओढल्या महाराज घाबरून!
खात्रीनं काही भुताटकी झाली! बाळ नाही तर अंडे! बाईला अंडे होते हे पाहूनच
घाबरले मी. क्षमा महाराज!’ दासी हात जोडून म्हणाली.
राजा पे-चौ आधीच तापट माणूस, त्यात हा असला विचित्र प्रकार पाहून तर
त्याच्या तळपायाची आग मस्तकात शिरली! खरं म्हणजे राजवैद्याला बोलावून
अंड्याची तपासणी तरी करायची ? राणीला शुद्धीवर तरी आणायचं ? पण छे !
भडक माथ्याच्या माणसाला संतापाच्या भरात कसले तरी भान असते काय ?
राजा पे-चौ ओरडला ‘उचला हे अभद्र अंडे माझ्या नजरेसमोरून अन् फेकून द्या नदीत ! अन् ही माझी राणी ! राणी कशाची? ही तर खास चेटकीण असली पाहिजे. माणूस
नाहीच ही बया. कारण कुठलीही स्त्री अंडे घालीत नसते माणसात !! उचला
हिला न् नदीत द्या फेकून बेशुद्धावस्थेतच.- ते अंडे अन् ही चेटकी,-दोन्ही जाऊ
देत दूर दूर वाहून !’ तो संतापाने थरथरत होता अगदी. म्हातारा माळी हातात
फुलमाळा घेऊन आला होता, तो हात जोडून म्हणाला, ‘थांबा महाराज ! शांत
व्हा. यांचा अन्याय काय यात ? देवाची करणी विचित्र असते पुष्कळदा, पण
त्याचे प्रायश्चित्त यांना नको. या तर किती सालस, सद्गुणी ! माझी मुलगी नुकतीच
देवानं नेली ! मी माझ्या घरी यांना नेऊ का ? मुलगी म्हणून वाढवीन. पाण्यात
फेकू नका हो या बापडीला-हात जोडतो मी. प्रधानानेही हे मान्य करण्याबद्दल
राजाची विनवणी केली.
राजा थोडा शांत झाला व म्हणाला, ‘बरं बरं ठीक, ने हे सोंग तुझ्या
झोपड्यात ! पण मी एकही नाणं देणार नाही या चेटकीसाठी तुला. आणि हिचं
तोंड मला परत दिसलं तर तुझं डोकं उडवीन थेरड्या ! याद राख.’
‘आणि प्रधानजी ताबडतोब हे नष्ट अंडे ब्रह्मपुत्रेत फेका. सकाळी गावात हे
सारं कळलं तर लोकात माझं हसू होईल, ते नको!’ परत राजा गरजला. राजा
बोले न् दळ हाले म्हणतातच; खरोखरच बेशुद्ध पण अप्सरेसारखी सुंदर राणी,
तिला उचलून माळ्याच्या झोपडीत एका कांबळ्यावर नेऊन ठेवण्यात आले.
अंडे धाडकन् पाण्यात फेकले गेले व निघाले वहात दूर दूर कुठेतरी ! राजा
बेअब्रतून वाचला व उदासवाणे दिवस काढू लागला. एकेकाचे नशिबच विचित्र,
दुसरे काय ?

इकडे अंडे पाण्यावर तरंगत होते. एखादा हलका भोपळा तरंगत राहावा तसे
ते पुढे पुढे प्रवाहात वाहात चालले. भयंकर वन्य प्रदेशातून नदीचा प्रवाह
चाललेला, तिकडे अंडे गेले व सूर्य किरणे त्यावर पडताच एका सकाळी ते
तडकले, आपोआप एक कोवळा सुंदर हाताचा पंजा अंड्याच्या फटीतून बाहेर
येऊन अंड्यावर चाचपडू लागला…
अन् काय योगायोग बघा ? त्याच वेळेला एक राक्षसीण सहज नदीवर
आलेली होती, काठावर बसून मासे पकडीत होती. तिने तो हात पाहिला.
पांढऱ्या सफेद अंड्यातून आता दुसरा हातही बाहेर आला, जणू पांढऱ्या सफेद
पांघरुणाखाली झोपलेल्या बाळाने दोन्ही हातच पांघरुणावर ठेवले बाहेर !
राक्षसीने क्षणात ओळखले, हे मानवाचे मूल आहे ! झटकन् पाण्यात उडी घेऊन
तिने ते अंडे सावरुन किनाऱ्यावर आणले व त्याला हातात घेताच अंड्याला
आतून लाथा मारीत चिमुकले दोन्ही पाय बाहेर आले व अंडे काटकन् फुटलेच
तिच्या हातात, बघते तर काय ? एक अपूर्व सुंदर, राजबिंडा असा मुलगा –
मानवाचाच खात्रीनं!
राक्षसीला खूप आनंद झाला. तिला मूलबाळ नव्हतंच; मनात ती म्हणाली,
‘मी याची आई होईन व याला मोठं करीन! माझं हे राक्षसीचं रूप पाहून बाळ
घाबरेल ! म्हणून मी साध्या मानवी स्त्रीचं रूप घेईन याच्यासाठी. इतका मोठा
वाडा आहे दोन बुरुजांचा, धनदौलत आहे, त्याला मालक कुणी नव्हता तो
राक्षसदेवांनी दिलाय ! बरं, नको वाटला तर खाऊन टाकू!!
मग खूप आनंदाने तिने बाळाचे पालन केले. अगदी एका साध्या मानवी व
सोज्वळ दिसणाऱ्या बाईचे रूप घेऊन. खरं म्हणजे ती बोलून चालून राक्षसी.
नरमांसभक्षणाची भयंकर आवड तिला, पण तिने मुलाच्या कधी ते दृष्टीसही पडू
दिले नाही ! त्या वाड्याच्या पिछाडीला सहा खोल्या होत्या, त्यामागे तिनं खूप
खूप उंच भिंत बांधून घेतली. त्या भिंतीवर काचांचे तुकडे व काटेरी वेली
लावल्या. कोण ओलांडणार ती? त्यापलीकडे एक छोटे पटांगण, ते राक्षसीणीचे
माणसं मारून खायचे गुप्त स्थान परत आपले सोज्वळ व मानवी बाईचे रूप
घेऊन हजर घरात!
बाळ मोठा होत होता. बोलून चालून तो राजपुत्र, त्यातही त्याची खरी आई
तर अति रूपसुंदर. तो थेट आईच्या रूपाचा राजबिंडा असा दिसे. त्याच्या
आईच्या हनुवटीवर गोंदल्याप्रमाणे एक हिरवट ठिपका होता जन्मखूण म्हणून-
तो सुद्धा याच्या हनुवटीवर तसाच ! राणी बिचारी माळ्याघरी राबत होती,
टाकलेली बायको असली तरीही, रोज हातांनी राजासाठी हारतुरे, गजरे, माळा
विणून पतीला पाठवीत होती. नवऱ्याने दिले होते तिला कष्ट ! पण ती त्याबद्दल
त्याला फुले देत होती, किती सद्गुणी पतिव्रता होती राणी ! माळी नेहमी डोळे
भरून ही तिची राजसेवा पाही. म्हणे, ‘मुली, तुझ्या या पतिनिष्ठेचं तुला एक ना
एक दिवस उत्तम फळ देव देईलच! विश्वास ठेव देवावर,’ राणी होय म्हणायची
अन् देवपूजेत दिवस काढायची.
दिवसांना काय ? ते उलटतच असतात- कुणी सुखात असो की कुणी
दुःखात असो! उन्हाळा येतो, धरणीला भाजून काढतो पण फळाफुलांची देणगी
घेऊन वसंऋतूही येतो बरोबर. पावसाळा येतो महापुराने अनर्थ करतो. पण
अनेक ठिकाणी जीवनाला जरूर ती धान्ये अमाप पिकवतो, वर्षा ऋतुला कोण
वाईट म्हणेल? शिशिराची थंडी. झाडाची पाने गळतात, सुकतात, पण त्या शुष्क
फांद्यातून पुन्हा कोवळे हिरवेचार अंकुर लवलवत हलकेच डोकावून पहातात. हे
सृष्टीचक्र चालूच ! अशीच अठरा ऋतुचक्रे उलटली, राजपुत्र आता मोठा झाला.

राक्षसीने त्याला योग्य शिक्षणही दिले होते. पण दोन गोष्टी बजावल्या होत्या.
राजपुत्र विचारी,
‘माँ, त्या उंच बुरुजात काय असतं?’
‘तेथे आता नाही काही. पूर्वी पहारेकरी रहायचे. पहारा नको?’
‘माझे वडील कोण होते आई? एवढा चारचौकी वाडा बांधला, मोठमोठ्या
दोन बुरुजांचा? श्रीमंत सावकार होते की, राजे?’
ती डोळे झाकून घेई. म्हणे, – ‘होते असेच, फार लौकर जग सोडून गेले,
नकोरे बाळ विचारू तसलं काही!! आठवणी येतात; मग वाटतं आपणही जीव
द्यावा- कशाला जगले ?
‘वा ! माझ्यासाठीच जगलीस मां. नको दुःख करूस. परत नाही विचारणार.
पण त्या बुरुजात काय आहे आता ?’
‘बेटा, का विचारतोस?’
‘छान आहेत. फार सुंदर बांधलेले. एकदा हिंडून बघावे वाटतं. तो डावा बुरुज
किती प्रमाणशीर बांधलाय’
‘नको नको. तिथं भुतं हिंडतात म्हणे. भुताटकीचा तोच बुरुज आहे उलट !
कधी कधी जायचं नाही! समजलास ? पोरा, खबरदार गेलास तर!’
कधी राक्षसणीचा आवाज इतका चढला नव्हता. मुलाला त्याचा चमत्कार
वाटला, तो आवाजही त्याला मायेचा वाटला नाही. हे काय विपरीत ? आईचा
आवाज असा…. जनावरासारखा कसा ? पण राजपुत्र विचारशील होता.
मनावर ताबा ठेवणारा होता. तो म्हणाला – ‘राहू दे मां. माझं चुकलं, माफ कर. ‘
मग राक्षसीणही शांत झाली. आवाज गोड झाला परत, म्हणाली,
‘बाळ उद्या मला काही कामाला एका गावी जाऊन यायचं आहे. वाड्यात
सकळीकडे हिंड. फक्त डावा बुरुज मात्र ‘
‘ध्यानात आहे माझ्या ते, परत नको सांगायला ! खुशाल जाऊन ये
कामाला- निश्चिंतपणानं.
राक्षसी खूष झाली. हे मानवाचं पोर फार समंजस ! पण हे आता फार चौकस
अन् फाजिल व्हायला लागलं. कसा मस्त झालाय् पोरटा ? अगदी खाऊन
टाकावासं वाटतं! काय गोड लागेल मांस याचं ? तिला नकळत तिच्या नजरेत
राक्षसी उग्र छटा उठली, तीही मुलाला समजली. पण त्याने काहीच दाखवले
नाही. मात्र आई दाखवते तशी मायाळू किंवा सालस नाही, तर इथे काहीतरी
पाणी मुरते आहे, अशी त्याची खात्री झाली. बस् ठरलं. काय आहे हा प्रकार !
अशी क्रूर का दिसली ? आवाज काय असा भसाडा निघाला एकदम ? याचा
तलास मला लावलाच पाहिजे अन् नक्की त्या डाव्या बुरुजातच लागणार !
निश्चितच मी आजच तिथे जाणार’, तो मनात म्हणत होता. पण बाह्यतः मात्र
म्हणाला, ‘मां! लवकर ये. मला घर खायला उठेल तू नसलीस म्हणजे!’
‘ मग मागल्या चार सहा खोल्याच्या या किल्ल्या घे. एकात सुंदर मासे आहेत
दुसऱ्यात किती तऱ्हाचे पक्षी ! तिसऱ्यात दुर्मिळ फुलं तर चौथ्यात जुनेनवे खेळ
आहेत… वाटेल तेवढे रंजन!’
‘होय. पण मी एकटा एकटाच ना?’
‘अरे, लौकर येईन बेटा, असं काय करावं ? मोठा झालाहेस की आता,
संभाळ वाडा. कुणा पाहुण्याला येऊ देऊ नको. जगात वाईट लोकही असतात
बरं ! जप. ‘ मायेचे नाटक सारे उत्तम करीत. डोळे पुशीतच राक्षसीण बाहेर
पडली. मुलानेही वाईट वाटण्याचे सोंग उत्तम वठवले होते, हे बिचारीला कळले
नाही!

ती निघून जाण्याचा अवकाश ! राजपुत्राने पहिली कोणती गोष्ट केली असेल
तर तो लपत छपत बुरुज चढू लागला. नको का म्हणते आई? माझ्या वडिलांचा
लाडका बुरुज होता तरी मी का तो नाही पहायचा? अन् दिवसा उजेडी कसली
भुताटकी होते तिथे ? अन् असलंच समजा भूत तर मला काय करणार आहे, बघू
तरी! मोठा धाडसी तरुण. तो चढायला भारी अवघड बुरुज चढून टोकावर गेला
तेव्हा आतून त्याला कण्हणे ऐकू आले. कुणी तरी अगदी केविलवाणेपणाने ‘हाय
देवा देवा ! पाणी ! पाणी’ असेही म्हणताना त्याने ऐकले. कुणाचा हा आवाज ?
इथे कोणी मनुष्य आहे काय ? होय मनुष्यच ! भूत ‘देवादेवा’ म्हणत नसते…
त्याने जोरात बाहेरचा अडसर ओढून दार उघडले. कोण असेल आत बरे ?
अंधार होता सारा. मग त्याने फटाफट तेथल्या बंद खिडक्या उघडल्या. पहातो
एक वृद्ध माणूस, अगदी मरू घातलेला, पाणी पाणी म्हणून तळमळतो आहे….
अन् उशाशीच तर तांब्याभांडे भरलेले- मग हा का घेत नाहीये? तो म्हणाला-
‘आजोबा, तुम्ही कोण? पाणी तर उशाशीच आहे तुमच्या.
‘बाळ, जवळ ये. नीट बघ. साखळ्यांनी माझे हातपाय खाटेला घट्ट
जखडलेले आहेत, मला हात हलवता तरी येतो कां ? तू पाजतोस का पाणी ?
देव तुझं कल्याण करील!’ त्याने पाहिले तो खरेच, त्याचे हातपाय घट्ट घट्ट जखडलेले. त्याने वृद्धाला तांब्यातून पाणी ओतून घेऊन पाजले व म्हटले, ‘थांबा, कुऱ्हाड आणून सगळ्या साखळ्या तोडतो मी तुमच्या आधी !” आता काय ? मी घटकाभराचा सोबती. मोकळं केलं न केलं तरी मला सारखंच. पण साखळ्या तोडायला नकोत. याची किल्ली तळमजल्यावरच्या कपाटात आहे. साऱ्या दोन्ही बुरुजांच्या किल्ल्या तिथे तर असतात.
‘थांबा! मी त्या आणतो आधी. ‘

‘थांब तूच. तू तान्हेल्याला पोटभर पाणी पाजलस, जीव शांत झाला. माझ्या
छातीत दुखतंय फार, तू किल्ल्या आणीपर्यंत कुणास ठाऊक जगतो का मरतो
मी फट्कन! तर’‘आजोबा बोलू नका, तुम्हाला श्रम होताहेत, खायला काही आणू का?
‘ते नंतर! हा बघ घाम येतोय. माझी घटका भरत आलीय बेटा. मला तुला
काही सांगायचं आहे-पहिली गोष्ट! तुझी आई माणूस नाही राक्षसीण आहे!’
तो ओरडला- ‘काऽऽ; य! आई राक्षसीण ? मी राक्षसाचा मुलगा ? खरंच?
म्हातारा म्हणाला -’ नाही, तू कुणाचा मुलगा; कोणाला ठाऊक नाहीये ! पण
माणसाचाच पोर आहेस एवढं खरं. तू पाण्यातून वाहात आलास
उपजल्याबरोबर अन् या बयेनं तुला तीरावरून पाहिलं. गोजिरवाणं बाळ ते फार
आवडलं तिला! होतासच तू तसा सुरेख राजबिंडा!’ हां ! मी रानातला शिकारी, मी झाडाआडून पाहिलं. तिनं तू घाबरशील म्हणून मानवी स्त्रीचं रूप घेतलं, तेही पाहिलं मी अन् तेवढ्यात मला तिनं बघितलं, ‘चला की घरी माझ्याशी लग्न करा, हा मुलगा वाढवू आपण’ असं गोड बोलली कारण- कारण’ ‘कारण- तुम्ही दिसायला छान असला पाहिजे त्यावेळी!’ ‘मोठा चतुर आहेस. होतोच मी तसा ! पण मी नाही म्हटलं. अरे, माझी
बायको छान होती, पोरं होती, लग्न झालेला माणूस!’ मी म्हटलं.
‘मी राक्षसिणीशी लग्न करणार नाही माफ करा!’ आणि बस्स ! एवढाच गुन्हा माझा! त्याबद्दल मला इथं तिनं कोंडलंय् बघ. अठरा वर्षं झाली! रोज येते! तुला खाऊन टाकते म्हणते !
‘काय ? काय बोलता हे ? माझी आई माणसं खाते ? मला हे कसं खरं
वाटणार? तुम्ही सारं ढोंग तर करीत नाही ना आजोबा ?’
‘खोटं? देवा शपथ, नाही! मरताना कुणी खोटं बोलतं का रे बाळ?’
‘पण मला विश्वास वाटत नाही-आई! माणसं मारून छे छे!’
‘असं ? मग या बुरुजाच्या मागल्या खोलीत जा. तुझ्या वाड्याच्या उंच
भिंतीपलीकडचं पटांगण बघ दिसतंय इथून, ते आधी बघून ये!’
त्याने त्या खिडकीतून खरेच दूरवर पाहिले. चहूकडे हाडांचे सांगाडे
पडलेले…. गिधाडं अजून झेपावताहेत ! तो कष्टाने म्हणाला, ‘ पण माझ्या
आईनंच मारलं या माणसांना हे कशावरून?’
‘बाबारे अठरा वर्ष बघत आलोय! परवा तुझ्या घरी कोण पाहुणे होते?’ सांग,
‘चीनचे लांब वेण्या घातलेले कुणी चार इसम ! मोठे थोर विद्वान वाटसरू
होते. प्रत्येकाला झगा वेगळ्या रंगाचा व ढिल्या तुमानी गर्द निळ्या ! गळ्यात
मोत्यांचे कंठेपण होते ‘‘मग पहा जाऊन. अजून तिथं ते मरत पडलेले असतील. वाटसरू खाणं हा तिचा आवडता धंदाच. खूप पाहिलंय रे! डोळे थकले बघून बघून! बेटा, तू जीव
घेऊन पळ… तुझीही त्या हाडकांच्या राशीत पडण्याची आता वेळ आलीय् !
पण मला बोलवत नाही. कळ येतेय रे ! आई गं.’
त्याने धावत जाऊन खालून किल्ल्या आणल्या व बेड्या साखळ्या
सोडल्या, परत पाणी पाजले. मग तो मायाळूपणाने म्हणाला.
‘बरं सांगितलंत, खालून मी थोडं अन्नही आणलंय. मऊ भात करून
ठेवलेला दिसला ! खाता कां ? भरवू कां ? निजा तुम्ही, मी जेवू घालतो-‘
त्याने चमच्याने त्याला ते अन्न खाऊ घातलं. तसा तो समाधानानं हसला व
कष्टानं म्हणाला,
‘जीव तृप्त झाला बाळ, आणि माझी शेवटची देणगी धनुष्य माझं, हे तुला घे!’
‘हां ! आजोबा असलं नका बोलू ! मी आलो त्याच दिवशी या घरी तुम्ही
आलात-आता मी निघालो की तुम्हीही चला. मी घेऊन जातो इथून-
म्हातारा हसला, वेडा कुठला. इकडे छातीतून जीवघेण्या कळा येतात अन्
आता जायचय मला देवाघरीच ! दिसत नाही का रे? एक ऐक, त्या किल्ल्यांच्या
जुङग्यात पलीकडच्या बुरुजाच्या खोल्यांच्या किल्ल्या पण आहेत. अन् त्यात
एक खोली धान्याची आहे. त्यात तांदुळाच्या पोत्यांत तीन चेंडू लपवलेले आहेत
ते घेऊन जा ! बया कुणाजवळ बोलत होती मैत्रिणीजवळ ते मी ऐकलंय. ते चेंडू
जादूचे, अन् कठीण प्रसंगातून जीव वाचविणारे जीव-
पुढचे शब्द उमटले नाहीत. कॉटवर उठून बसलेला तो वृद्ध एकदम
कोसळला व मरण पावला!
‘काय आपल्या आईची – नव्हे नव्हे, त्या राक्षसीणीची ही क्रूरपणाची
वर्तणूक? याला अठरा वर्ष इथे कोंडून ठेवलं बांधून.
वा ! काय छान धनुष्य आहे उशागती! मी हे घेऊन निघतोच. आता नकोरे
बाबा इथं राहणं, मरणच ते!
त्याने दुसऱ्या बुरुजात जाऊन ते चेंडू घेतले. दुसऱ्या पेटीत त्या कालच्या
पाहुण्यांचे मोत्यांचे कंठे दिसले! त्याने ते ओळखले. पण हात लावला नाही !
‘मला नको ते प्रेतावरचे हिरेमोती ! मी धनुष्य बाणाने शिकार करून जगेन !’ तो
मनात म्हणाला.
तेथून निघून जाण्यापूर्वी खरेच तो त्या उंच भिंतीपलीकडे पटांगणात गेला.
चार लांब वेणीवाल्या डोक्याच्या कवट्या त्याने ओळखल्या व ते भारी झगेही
त्याला आठवले जवळच आईचे ?- म्हणजे राक्षसीची एक ओढणी रक्तानं
भरलेली! आता कसली शंका ? जीव घेऊन पळावं झालं इथून.
तो त्या भयानक जागेपासून दूर पळत सुटला, दूर दूर गेला.
चालून चालून दमला बापडा. त्याने धनुष्याने एक हरण मारले होते. ते
शिजवून खावे म्हणून वाटत होते. पण कसे? जवळ चकमक नाही विस्तव
पेटवायला, की भांडेपण नाही. एका मोडक्या देवळात तो बसला चिंतेत. त्या
भरल्या रत्नभांडाराच्या घरातून त्यानं एक दमडीही उचलली नव्हती हेच
विशेष. पापाचा पैसा नकोच आपल्याला. हे सुरेख धनुष्य तर आहे मदतीला ?
‘ मी करू कां काही मदत?’ हळूच शब्द आले. त्याने पाहिले, एक पन्नाशीला
टेकलेली बाई. ती त्याचे धनुष्य लक्ष लावून पहात होती…. तो म्हणाला- ‘आजी !
मदत कराल तर एवढीच; मला हे हरण शिजवायला भाजायला विस्तव पेटवून
द्या! भांडं द्या एक.’
ती हसून म्हणाली- ‘मला आजी म्हटलंस ना एकदम? तर चल आजीच्या
घरी. हरणाचं सुरेख अन्न बनवून खाऊ आपण. मसाले घालीन मी छान छान,
येतोस?’
‘चल!’
‘पण आधी सांग, हे माझ्या नवऱ्याचं- नैची धनुर्धराचं-धनुष्य; अन् भाताही
त्यांचाच ! मी ओळखलं, कुठे मिळवलंस तू? आज अठरा वर्ष ते बेपत्ता आहेत
मुला. तू बारीक नजरेनं बघ, धनुष्याच्या आतल्या बाजूला अन् भात्याच्या
तळाशी नैची धनुर्धर ही अक्षरं खोदली होती आम्ही दोघांनी मिळून. बघ आहेत
कां? तुला ते भेटले होते का रे? मला विकत देतोस हे धनुष्य अन् भाता?’
त्याने पाहिले, धनुष्यभात्यावर नावे होती खरी नैचीची. अन् ही तर त्याची
बायकोच. त्याने सारी हकिगत तिला सांगितली व नवऱ्याची शेवटी आठवण
म्हणून ते धनुष्यबाण तिला बक्षीसच देऊन टाकले. तिचेच होते ना ते? पण मग
त्या बाईनेही न ऐकता त्याला वाटखर्चाला म्हणून पुष्कळच पैसे दिले.
मुलगा जेवून दूर निघाला. लांब अरण्यात एक देऊळ लागलं. लाकडी मूर्ती
फुटकी तुटकी झालेली, मूर्तीचं छोटे देऊळ ढासळलेलं, देव्हारा भोके पडलेला
मोडका ! त्याला वाईट वाटलं. तो शेजारच्या गावी गेला व गावप्रमुखांपुढे ते
वाटखर्चाचे सगळे पैसे ओतून म्हणाला‘बंधू, हे धनद्रव्य खर्च करा, मला वाटतं यातून मूर्तीची सर्व दुरुस्ती होईल व देऊळही ठीक होईल, द्रव्य यातून उरलेच तर देवाचा देव्हारा पण नवा घ्या करून. अहो, जो देव आपल्याला साऱ्या सुखसोई देतो, त्याची मूर्ती अशी का बरं दीनवाणी ठेवता ? तसंच द्रव्य उरेल तर मूर्तीचं आसनही नवं करावं.
देवळाला रंग यात बसेल तर जरूर द्यावा. माझी नाणी सुवर्णाची आहेत. तेव्हा जमेल.’
गावप्रमुख म्हणाले, ‘आपले नाव काय शेठजी ? ते कोरून ठेवू आम्ही
देवळाच्या चिऱ्यावर.’
‘त्याची काय जरूरी ?’ एक सामान्य मनुष्य असं वाटल्यास खोदा !
‘ठीक. आपण १५ दिवस येथे रहावे. पंधरा दिवसात हे काम पुरे होईल.
गावकरीही देवाचं काम म्हटल्यावर स्वतः होऊन मदतीचा हात देऊ लागतात.
हे पैसे पुष्कळ आहेत. सारं होईल यात’ पंधरवड्यात मूर्ती खरेच दुरुस्त झाली. तिला घासून पुसून नवा रंग दिला गेला. त्या मूर्तीचे डोळे त्याच्याकडे बघून हसताहेत असं त्याला वाटलं. चौथराही छान झाला. देऊळी दुरुस्त झाले होते, कसे टुमदार दिसत होते.
मग तो निघाला. एका गरीब दिसणारा माणूस येत होता. तो म्हणाला, ‘नवे
दिसता मित्र या भागात ? मी इथला माहितगार आहे. जाऊ या सोबती
सोबतीनं?’ ‘जाऊया. चल मित्रा,’ ते जाऊ लागले. मित्र रानाचा माहितगार. भूक लागली
की, चटकन् कुठूनतरी फळे पाडून आणी. नारळाच्या बेल्यातून पाणी आणी. गर्द
रान लागले की, तो बरोबर पायवाट सांगे. रमतरमत ते दोघे मित्र चाललेले. तोवर
पाठीमागून कर्कश आरोळी व धपाधप पावले ऐकू आली. पहातो तर काय
राक्षसीण मूळ रूपात धावत पाठीस लागली आहे. ती ओरडत होती कारट्या
तुला एवढं पोसलं, लुसलुशीत मांस खायला मिळावं म्हणून. तर तू माझ्याच
वस्तू चोरून पळवतोस? ती जवळ आली तशी सोबती म्हणाला,
‘अरे! तुझ्याजवळचा एक चेंडू मागे फेक! बघतोस काय?’
आँ? याला कसे कळले ? त्याने विचारले, ‘तू कोण?’
‘ते मग. आधी चेंडू फेक जोरात मागे !’
त्याने चेंडू जोरात मागे फेकला तर मोठाले पर्वत उत्पन्न झाले राक्षसीच्या
वाटेत ! ते ओलांडून आली ती दाढा करकर वाजवीत. तर दुसरा चेंडू फेकला
याने, तेव्हा घनदाट जंगल उत्पन्न झाले त्याच्या व तिच्यामधे. तेही ओलांडून
बया आलीच की. तर मग शेवटचा चेंडू याने फेकला तर त्या जंगलात फार मोठा
वणवा लागला. चहूकडे आगीच्या ज्वाळा ! त्यात सापडून राक्षसीण मरण
पावली! मग ते एका सुंदर राजधानीजवळ आले. राजपुत्राने विचारले, ‘तू कोण ते
अजूनही सांगितलं नाहीस बरं का!’ तो माणूस हसला न् म्हणाला, ‘सांगतो लवकरच. वेळ आलीच आहे ते सांगायची. पण आधी तुला येथल्या राजाकडे नेतो मी.’
‘पण कशासाठी? राजा कोण आहे इथे ?’
‘ते कळलेच आता. चला, हा बघ राजवाडा आलाच!’
राजा दुःखित मनाने बसला होता. त्यासमोर हे दोघे उभे राहिले. राजा
ताडकन् उठून उभा राहिला. राजपुत्राला बघून म्हणाला,
‘अरेच्या! हे तर रूप माझ्या रूपराणीचेच थेट! अगदी तस्सेच नाकडोळे, वा!
बाळ, कोणाचा मुलगा तू?
‘दुर्दैवाने मी कोणाचा मुलगा ते मला माहीत नाही महाराज. मी पाण्यातून
वाहात आलेल्या अंड्यातून जन्मलो व पाळलं मला एका राक्षसणीनं ! तेव्हा
काय सांगू?’ तो उदासपणे म्हणाला.
एकदम तो त्याचा सवंगडी म्हणाला, ‘तेच सांगायला आलो आहे राजा !
अठरा वर्षापूर्वी रूपाराणीच्या पोटी एक अंडे झाले त्यातून उत्पन्न झालेला हा
तुझाच पुत्र आहे व राक्षसणीच्या घरी वाढूनही अतिशय सद्गुणी परोपकारी असा
ह्याचा स्वभाव आहे. ईश्वराची लीला होती. ते अंडे म्हणजे रूपाराणीचा काहीएक
अन्याय नव्हता त्यात. तर आता तिला बोलाव व हा अंतरलेला पुत्र स्वीकार
करा आपण.’
‘पण तुम्ही कोण? हे सगळं तुम्हाला कसं माहीत?’
“मी कोण ? बघा, राजपुत्रा तुही बघ!’ तो मनुष्य अदृश्य झाला, त्याच्याजागी
ती रंगवलेली सुंदर मूर्ती दिसली व शब्द आले – ‘या राजपुत्राने ज्या पडझड
झालेल्या प्रतिमेची सुरेख दुरुस्ती करवली, ती माझीच मूर्ती होती. मीच तो
तेथला देव. याने सहज जाता जाता त्या मूर्तीची दुर्दशा बघून जवळचे सगळे द्रव्य
देऊन मूर्ती, आसन दुरुस्त केले. इतकेच नाही तर पडके देऊळही छान केले.
मला ही वृत्ती फार आवडली याची; म्हणून मी त्याचा मित्र झालो. मानवरूप
घेऊन अन् तुमची त्याची भेट करवली. चांगलपणाचे देवही चांगलेच बक्षीस देतो
सुखी व्हा !
पहाता पहाता आवाज थांबला व मूर्तीही अदृश्य झाली. राजाने धाव घेऊन
पुत्राला पोटाशी धरले व म्हटले, ‘बाळ! तू माझ्यासारखा अविचारी व अतितापट
नाहीस, तर तुझ्या आईसारखा विचारी व सद्गुणी आहेस याची मला धन्यता
वाटते ! चल, तुझ्या आईकडे जाऊ या. मला तिची क्षमा मागायची आहे! आणि
तुझं नावही मी आता अठरा वर्षांनी ठेवणार आहे. गुणवंतकुमार ! तसेच आहा
तुम्ही युवराज!’

Author