पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार.



निष्कर्ष आणि समारोप :

मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक (a must) वाटत नाहींत ; अर्थात् , असले, व त्यांमुळे जर सौंदर्य वाढलें, तर कांहींच हरकत नाहीं . मुख्य म्हणजे, काव्य मनाला भिडलें, त्यानें विचारप्रवृत्त केलें की, तें वाचकांच्या हृदयापर्यंत पोंचतें, आणि तेथें जीवित रहातें.

म्हणूनच ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके म्हणतात –

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हें.

  • ( एक भावगीत)

उर्दूचा एक शायरही हेंच वेगळ्या शब्दांत सांगतो –

हम तो मरकर भी किताबों में रहेंगे ज़िंदा

ग़म उन्हीं का है, जो मर जाएँ तो गुज़र जाते हैं ।

अखेरीस :

तुमच्यामाझ्यासाठी, Zen-Priest Tai Sheridan याचें चिंतन मार्गदर्शक ठरावें –

Until you relax

in the core of yourself,

it is impossible to

make peace with death.

या ओळींची तुलना याच काव्यातील एका अन्य कडव्याशी करावी, जें आधी ( भाग -२ मध्ये ) दिलेलें आहे.

In the still waters, golden light

may you imbibe the gentle truth

Relax, you are going to die.

मरण, जें टळणें अशक्य आहे, त्याचा मनोमन स्वीकार करणें , एवढेंच आपल्या हातात असतें ; आणि तसें केल्यानें आपलें जीवन सु-सह्य तर होईलच ; पण तें सु-फल होईल, सु-शांत होईल. मृत्यूविषयींच्या काव्यातून आपण एवढें शिकूं शकलो तरी पुरें.

(संपूर्ण)

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

Author