(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

  • गाढवांची कहाणी

    सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, त्याच्या पाठीवर टाकलेला भार इमानेइतबारे वाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी आढळणारा हा ‘गरीब बिचारा’ प्राणी उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिला आहे.

  • नॅटुफिअन बासऱ्या

    वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे.

  • अल्पायुषी कडी

    शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.

  • विषारी जहाज!

    व्ही-१३०२ हे युद्धकालीन टेहळणीसाठी वापरलं गेलेलं एक जर्मन जहाज होतं. दारूगोळा, तोफा व इतर शस्त्रास्त्र, इत्यादींनी सुसज्ज असणारं हे टेहळणी जहाज म्हणजे मुळात मासेमारीसाठी बांधलेलं जहाज होतं. सन १९२७ साली तयार झालेलं हे ४८ मीटर लांबीचं, २९२ टन क्षमतेचं जहाज अगोदर ‘जॉन मान’ या नावानं ओळखलं जायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, त्याचं रूपांतर टेहळणी करणाऱ्या जहाजात केलं गेलं. दिनांक १२ फेब्रुवारी १९४२ रोजी ब्रिटिश विमानांनी या टेहळणी जहाजावर हल्ला करून त्याला बुडवलं. तेव्हापासून गेली आठ दशकं हे जहाज, त्यावरील स्फोटकं, इंधनासाठी वापरला जाणारा कोळसा व इतर सर्व सामग्रीसह नॉर्थ सी या समुद्राच्या तळाशी चिरनिद्रा घेत आहे. हे जहाज जिथे सापडलं आहे, तिथे समुद्राची खोली तीस-पस्तीस मीटरच्या आसपास आहे. हे जहाज उजव्या बाजूला कलंडलं असून, त्याच्या डाव्या बाजूला बॉम्बमुळे एक मोठं भोक पडलं आहे.

    दीर्घ काळ पाण्याखाली असलेल्या या जहाजाच्या परिसरात अनेक सजीव मुक्तपणे विहरताना पाणबुड्यांना आढळले आहेत. मासे, खेकड्यांसारखे कवचधारी प्राणी, विविध मृदुकाय प्राणी, अशा अनेक सजीवांचं हे निवासस्थान झालं आहे. इथे अनेक सागरी वनस्पतीही वाढल्या आहेत. या सगळ्या सागरी जीवांना जरी हे एक चांगलं निवासस्थान लाभलं असलं तरी, त्या ठिकाणी विविध सूक्ष्मजीवाणूंची अनपेक्षित स्वरूपाची वाढ झाली असण्याची मोठी शक्यता संशोधकांकडून व्यक्त केली गेली. सूक्ष्मजीवांची अशा प्रकारची वाढ ही तिथल्या परिसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचं दर्शवते. याच पार्श्वभूमीनुसार, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, या जहाजातून पाण्यात शिरलेल्या विविध रसायनांचा आणि तिथे आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा एकमेकांशी असलेला संबंध अभ्यासला.

    जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, इथल्या गाळात जमा झालेले विविध धातू आणि सेंद्रिय रसायनं, यांचं प्रमाण मोजलं. तसंच त्यांनी या गाळात कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीवाणू आढळतात आणि ते किती प्रमाणात आढळतात, त्याचाही शोध घेतला. या गाळाशिवाय जहाजावरच्या, नांगरासह इतर पोलादी भागांवर कोणते सूक्ष्मजीवाणू वास्तव्याला आहेत, तेही त्यांनी शोधून काढलं. या संशोधनासाठी लागणारे सर्व नमुने, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणबुड्यांकरवी गोळा करून घेतले. जहाजाच्या परिसरातल्या गाळातले विविध ठिकाणचे जे नमुने गोळा केले गेले, त्यांत जहाजाच्या दोन्ही बाजू, तसंच जहाजाचा पुढचा भाग आणि मागचा भाग, अशा सगळीकडील नमुन्यांचा, समावेश होता. तसंच हे नमुने जहाजापासून वेगवेगळ्या अंतरापर्यंतचे होते – अगदी जहाजाच्या जवळच्या गाळातले ते जहाजापासून ऐंशी मीटर अंतरापर्यंतच्या गाळातले. हे सर्व नमुने गाळाच्या पृष्ठभागापासून सुमारे पंधरा सेंटिमीटर खोलीवरून घेतले गेले. जहाजाच्या नांगराच्या व इतर भागांच्या पृष्ठभागावर जमा झालेल्या थरांचेही नमुने गोळा केले गेले. या सर्व नमुन्यांतील रसायनांचा शोध हा रासायनिक विश्लेषणाद्वारे तर, जीवाणूंचा शोध हा जनुकीय विश्लेषणाद्वारे घेतला गेला.

    या नमुन्यांच्या विश्लेषणातून अनेक लक्षवेधी निष्कर्ष निघाले. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जहाज बुडून ऐंशी वर्षं उलटली असली तरी, त्यातून प्रदूषक अजूनही बाहेर पडत आहेत. जहाजात जिथे कोळसा साठवला होता, त्या भागातील गाळाच्या नमुन्यांत निकेल, तांबं आणि अर्सेनिक या मूलद्रव्यांच्या क्षारांचं प्रमाण सर्वाधिक होतं. यातील अर्सेनिक हे मूलद्रव्य कोळशातून बाहेर पडत असण्याची शक्यता आहे. जहाजाजवळच्या काही ठिकाणच्या गाळातलं धातूंचं प्रमाण, हे धातू पोलादाच्या गंजण्यामुळे वा जहाजाला दिलेल्या रंगाद्वारे पाण्यात मिसळले जात असण्याची शक्यता दर्शवत होतं. तसंच गाळाच्या नमुन्यांत टीएनटीसारख्या स्फोटकांपासून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाणही लक्षणीय होतं. जहाजापासून जसं दूर जाऊ तसं, या धातूंचं आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत गेलं.

    जहाजाच्या वेगवेगळ्या भागात सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही वेगवेगळं असल्याचं दिसून आलं. तसंच काही विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण, हे त्यात्या ठिकाणच्या धातूंच्या आणि सेंद्रिय पदार्थांच्या वाढत्या प्रमाणानुसार वाढत असल्याचं आढळलं. जहाजाच्या विविध भागांवर जमलेल्या थरांत, गंधकाचं रासायनिक स्वरूप बदलू शकणाऱ्या डीसल्फोबल्बससारख्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण गाळातील प्रमाणापेक्षा अधिक होतं. गंधकांशी संबंध असणाऱ्या या सूक्ष्मजीवाणूंचा पोलादाच्या गंजण्याशी थेट संबंध असतो. त्याचबरोबर जिथे स्फोटकांतून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अधिक आहे, तिथे या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणाऱ्या ऱ्होडोबॅक्टरेसी आणि क्रोमॅटिएसी या प्रकारांतील सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून आलं आहे. जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून, जहाजावर आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा, जहाजातून बाहेर पडणाऱ्या विविध धातू आणि सेंद्रिय पदार्थांशी संबध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    या बुडालेल्या जहाजाच्या परिसरात सापडलेल्या सूक्ष्मजीवाणूंचं हे अस्तित्व, बुडालेल्या जहाजातून बाहेर पडणारे धातू आणि सेंद्रिय पदार्थ आजही – म्हणजे आठ दशकांनंतरही – इथल्या सागरी जीवनावर परिणाम घडवत असल्याचं दर्शवतं. हा परिणाम जरी अतितीव्र नसला, तरी तो भविष्यातही घडतच राहणार आहे. तसंच नॉर्थ सी समुद्राच्या परिसरात बुडवल्या गेलेल्या जहाजांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या प्रदूषकांच्या परिणामाचा गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. नॉर्थ सी रेक्स हा प्रकल्प अशा सर्व संशोधनातल्या निष्कर्षांची सर्वांगानं दखल घेण्याचा प्रयत्न करतो आहे. इतकंच नव्हे तर, या प्रकल्पाद्वारे लवकरच काही शिफारशी केल्या जाण्याची शक्यता आहे. यातली एक शिफारस असू शकेल ती, नॉर्थ सी समुद्राच्या तळाशी असलेली ही ‘विषारी’ जहाजं समुद्राच्या बाहेर काढण्याची! कारण समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या जहाजांतून बाहेर पडणारे पदार्थ पूर्णपणे नष्ट होण्यास अजूनही दीर्घ काळ लागणार आहे. त्यामुळे ही घातक जहाजं जर पाण्याच्या बाहेर काढली नाहीत, तर हे सागरी प्रदूषण असंच चालू राहणार आहे!

    -छायाचित्र सौजन्य : (सागरी विज्ञानातील सीमा) / (Flanders Marine Institute)

    चित्रवाणीः विषारी जहाज

  • हिमनद्यांचा इतिहास

    पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.

  • पहिले घोडेस्वार?

    घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा.

  • नवं सौरचक्र

    सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात.

  • बर्फाखालची नदी

    अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत.

  • हिऱ्यात ‘दडलेलं’ खनिज

    पांढरट पदार्थ कसले आहेत हे कळल्यानंतर, या हिऱ्यातले काळे पदार्थ काय असावेत, याची उत्सुकता आता निर्माण झाली होती. काळे पदार्थही अर्थातच क्ष-किरणांद्वारे अभ्यासले जात होते. आश्चर्य म्हणजे, काळ्या पदार्थांच्या या विश्लेषणात, हे पदार्थ आतापर्यंत निसर्गात न सापडलेलं एक खनिज असल्याचं आढळलं. परॉवस्काइट या गटात मोडणारं हे खनिज, कॅल्शियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे.

  • पहिला भक्षक?

    सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अ‍ॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अ‍ॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे.