गुपित

हा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आता निवृत्त झालेल्या शाळामित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा तरी क्लबवर निवांतपणे भेटतो. थोडंसं इकडचं तिकडच बोलणं आणि बिअरच्या फेऱ्यां झाल्यानंतर ग्रुपचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. कालीला फक्त रमच लागते. बाकीचे मित्र इतके चोखंदळ नाहीत.



“राकेश, या वेळी तुझी पाळी आहे एखादा मनोरंजक आणि संस्मरणीय अनुभव शेअर करायची.” काली हसत म्हणाला. भारतीय सशस्त्र दलातील एक कठोर माजी सैनिक असल्याने, काली क्वचितच उत्स्फूर्तपणे हसत असे. त्या दिवशी त्याचा मूड चांगला असावा. त्याच्या हास्याचे कारण तो गणपतीच्या शेजारी बसला होता हे असावे. गणपतीला, जो एक प्रख्यात डॉक्टर आहे, हसण्यासाठी कारणाची गरज लागत नाही. राकेशने हसत हसत आपला रोख गणपतीवर नेला, “गणपती आज मला जरा कंटाळा आला आहे म्हणून तू एखादी गोष्ट सांग. तुझ्या व्यवसायामुळे तुझ्याकडे खूप सांगण्यासारख्या कथा असतात. तुला माहिती आहे की मी केव्हाही माझे अनुभव सांगू शकतो कारण मी एकदा सुरुवात केल्यावर तुम्ही मला थांबवू शकत नाही. हा हा!”

हा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आता निवृत्त झालेल्या शाळामित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा तरी क्लबवर निवांतपणे भेटतो. थोडंसं इकडचं तिकडच बोलणं आणि बिअरच्या फेऱ्यां झाल्यानंतर ग्रुपचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. कालीला फक्त रमच लागते. बाकीचे मित्र इतके चोखंदळ नाहीत.

गणपती हसत म्हणाला, “ठीक आहे, मला थोडा वेळ द्या. पण राकेश पुढच्या वेळी तुझी सुटका नाही.” बिअरचे घोट घेत, गणपती कोठून सुरुवात करावी याचा विचार करू लागला.

“मित्रांनो, ठीक आहे. संबंधित व्यक्तींच्या गोपनीयतेसाठी मी या कथेतील सर्व नावे आणि स्थाने बदलत आहे. तुम्हाला माहिती आहेच की, मला माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून गोपनीयतेची काळजी घ्यावी लागते. ही कथा नवी दिल्लीत अनेक वर्षांच्या कालावधीत घडली आहे.”

गणपती, “दहा बारा वर्षांची प्रॅक्टिस झाल्यावर माझ्या व्यवसायाची घडी बऱ्यापैकी बसली होती. समाजामध्ये थोडेफार नावही झाले होते. खूप लोकांच्या ओळखीही झाल्या होत्या.” “मित्रांनो या कथेची सुरुवात झाली ती विवेक गुप्ता आणि पल्लवी पाठक यांच्या प्रेमकथेने. दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते, दोघेही कानपूरच्या चांगल्या सुखवस्तू कुटुंबांमधून आले होते. गुलाबी दिवसांचा हा काळ चालू असतानाच दोघांचे शिक्षण संपले. प्रेम मात्र चालूच राहिले कारण नंतर दोघांनाही नवी दिल्लीत चांगल्या नोकर्‍या लागल्या. अजून एका वर्षाने जरा स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी सहजीवनास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबातून आक्षेप येण्याचे काहीच कारण नव्हते. सर्व काही चांगले आणि आनंदात चालले होते. वैवाहिक जीवनातील सुरुवातीचे स्वर्गवत दिवस भराभर सरकत होते.”

राकेश, “गणपती, या कथेत नवीन काय आहे? प्रत्येक कॉलेजात अशा डझनभर कथा घडतात.”

काली, “राकेश, तू अजून दोन घोट घे. सब्रका फल मीठा होता है . जरा धीर धर.”

“ खरं आहे काली. तर पुढे सांगायचे म्हणजे, मूल होऊ देण्याची घाई करायची नाही, असे दोघांनीही ठरवले असावे. सुमारे 5 वर्षांनंतर मात्र इच्छा असून सुद्धा मूल नसल्याने, त्या सुखी कुटुंबात चिंतेची पाल चुकचुकू लागली. नातेवाईकांमध्ये पण तशी कुजबुज सुरू झाली. दोघांनीही मुलाची इच्छा असतानाही, दोघांनी ‘होतो कधीकधी असा उशीर’ अशी स्वत:ची समजूत करून घेतली.

अजून काही महिने प्रयत्न केल्यानंतर मात्र, अखेर विवेक आणि पल्लवीने वैद्यकीय तपासणीसाठी करून घेण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, या दीर्घ कथेत माझा प्रवेश येथे झाला. तेव्हापासून, मी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ उलगडणाऱ्या या कथेचा साक्षीदार झालो.”

अशाप्रकारे आमचे कुतुहल वाढवून गणपती काही काळ शांत झाला. कदाचित, तो झालेल्या घटना योग्य क्रमाने लावीत असावा. अखेरीस, तो पुढे म्हणाला, “दोघेही माझ्याकडे सल्ल्यासाठी आले. सुरुवातीला दोघेही एकमेकाकडे नेत्रकटाक्ष टाकून “तूच सांग” असे विनवीत होते. जरा आढेवेढे घेतल्यावर विवेकने त्यांची समस्या सांगीतली. माझ्या सल्ल्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर असे स्पष्टपणे समजले की पल्लवी पूर्णपणे निरोगी होती, तर विवेकच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या नगण्य होती. अधिक चाचण्यांवरून असे दिसून आले की लैंगिक भूक उत्तम असूनही, त्याला मूल होण्याची काहीही शक्यता नव्हती. त्या आनंदी दाम्पत्याला हा धक्का उध्वस्त करणारा होता.”

राकेश, “आत्ता कुठे गोष्टीत रस आला. मग पुढे काय झाले?” राकेशचे असेच आहे. त्याला बोलल्याशिवाय फार वेळ राहता येत नाही.

“पल्लवीला आई व्हायची तीव्र इच्छा होती. सुरुवातीला दोघांनाही धक्कातून सावरण्यास काही काळ लागला. अखेरीस संकोच बाजूला ठेवून, त्या जोडप्याने वीर्यदानातून गर्भधारणेसाठी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेसाठी पुन्हा माझी भेट घेतली. पल्लवीवरील निस्सिम प्रेमामुळे विवेकने चाचरत का होईना, होकार दिला होता. मात्र दोघानीही ते कानपूरपासून दूर दिल्लीत रहात असल्याने, ही गोष्ट आपापल्या घरच्या लोकांना कळू दिली नाही. संपूर्ण गुप्तता पाळून वीर्य रोपणापासून गरोदर राहण्यापर्यंत प्रतीक्षेचा काल संपला. हा काळ खरोखरच उत्कंठापूर्ण काळजीचा असतो. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद झाला. मला पण खूप बरे वाटले.”

“उत्तम प्रकृती असल्याने, पल्लवीने योग्य वेळी एका निरोगी मुलाला जन्म दिला. खूप वर्षांनी झालेल्या या बाळाच्या आगमनामुळे, दोन्ही कुटुंबातील आनंद वर्णन करण्यापलीकडे होता. त्यांनी प्रेमाने मुलाचे नाव विश्व असे ठेवले.”

थोडा वेळ आमची उत्कंठा वाढवून गणपती पुढे म्हणाला, “दुर्दैवाची गोष्ट अशी की हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांनी या आनंदी कौटुंबिक वातावरणावर पुन्हा काळे ढग दाटून येऊ लागले. विवेक काही कारणास्तव हळूहळू विमनस्क झाल्यासारखा दिसू लागला. त्याने आपल्या मुलाला स्पर्श करणे टाळण्यास सुरुवात केली. विश्व बरोबर खेळणे, त्याच्याशी बोलणे तर फार दूरची गोष्ट झाली. माणसाच्या मनाचा थांग कोणालाही लागणे अशक्य असते हे खरे. कोणत्याही परिस्थितीत विवेक विश्वकडे बघायच्याही मन:स्थितीत नसायचा.”

“वैवाहिक संबंधही उत्तरोत्तर बिघडत गेले. पल्लवीने संयमाने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. विवेक अनेकदा घरी दारू पिऊन उशिरा येऊ लागला. परिस्थिती बाहेरील लोकांसाठी हेवा वाटणारी असली तरी, विवेकला आतून ‘हे मूल माझे नाही’ हा विचार मनोमन पोखरत होता, जे तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. पल्लवी मला भेटून हताशपणे हे सर्व वेळोवेळी सांगत होती. कोणत्याही दृश्यमान तर्काच्या पलीकडे असलेल्या या नवीन परिस्थितीमुळे दोन्ही कुटुंबे हैराण झाली होती. या सर्व घडामोडींचा मी मूक साक्षीदार होतो.”

“दैनंदिन गैरसमज आणि नाराजी सुरू झाली. विश्व सामान्य मुलाप्रमाणे वाढत होता पण त्या जोडप्यामध्ये क्वचितच संवाद होत होता. पल्लवीसाठी आयुष्य असह्य झाले होते. तिलाही या अप्रिय परिस्थितीच्या खऱ्या कारणांबद्दल उघडपणे बोलता येत नव्हते. शेवटी तिने अत्यंत नाइलाजाने घटस्फोटासाठी अर्ज केला. विवेकची संमती अगदी सहज मिळाली.”

“मित्रांनो, लवकरच पल्लवी विश्वला बरोबर घेऊन वेगळी राहू लागली. मानवी मनाचे अद्भुत खेळ मी प्रत्यक्ष पहात होतो. मध्यंतरी त्याला असेही कळले की पल्लवीला एक विधुर व्यावसायिक राजकुमार माथूर भेटले आणि तिने त्याच्याशी लग्न पण केले आहे. राजकुमार यांनी विश्वला आपला मुलगा मानून, त्याला पित्याची उणीव न भासून देण्याचे मान्य केले होते. पल्लवीने अजूनही वेळोवेळी मला भेटून ही सर्व माहिती देत होती. तसेच ती तिच्या नवीन संसारात आनंदी असल्याचे स्पष्ट दिसत होते.”

“आश्चर्य असे की कालांतराने विवेकला परिस्थितीचा पश्चाताप होऊ लागला असावा. तो पण माझ्याकडे येऊन आपले मन मोकळे करू लागला. आपल्या मनाने आपल्याशी खेळलेल्या कहराचा त्याला पश्चाताप होऊ लागला. पण आता पूलाखालून बरेच पानी वाहून गेले होते. तो अजूनही तरुण होता आणि त्यामुळे त्याला सहवास आणि शरीरसुखाची उणीव गंभीरपणे जाणवू लागली.”

“मित्रांनो, या कथेचा दूसरा अध्याय येथून पुढे सुरू झाला. एके दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी, विवेकच्या लक्षात आले की त्याची एक कनिष्ठ सहकारी रश्मी अत्यंत अस्वस्थ आहे. काही दिवस तिला त्या त्रस्त अवस्थेत पाहिल्यानंतर, त्याला त्याची उत्सुकता आवरता आली नाही. त्याने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि विचारले, “रश्मी, तू गेले काही दिवस जरा त्रस्त दिसत आहेस. माझेच काही चुकत नाही ना?”

स्पष्ट दिसत असलेली तिची त्रस्त अवस्था नाकारत, ती म्हणाली, “नाही सर, तुमची काही चुकी नाही. मी अगदी मजेत आहे.”

“अग, मग हल्ली तू मध्येच शून्यात नजर लावून बसलेली असतेस. तुझ्या कामात मन नसल्याने तुझ्या हातून चुका होत आहेत.

हे बघ रश्मी, आपले काम बिनचूक होणे किती महत्वाचे असते हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही. तुला काहीतरी चिंता लागलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. शक्य असेल तर मी नक्कीच मदत करायचा प्रयत्न करेन.”

अखेरीस ती बोलती झाली, “सर, तुम्ही म्हणता तसे काही नाही. मला तुमचा स्वभाव माहीत आहे. हो, सध्या मी एक चिंतेत आहे, पण ती समस्या मी हाताळू शकेन असे मला वाटते. त्यातून लागलीच तर मी तुमची मदत नक्की मागेन. मी माझ्या वैयक्तिक समस्येचा कामावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेईन.”

विवेकने काही दिवस जाऊ दिले पण रश्मीच्या चेहेर्‍यावरील तणाव जराही कमी होत नसल्याचे जाणवत होते. पुन्हा एकदा अत्यंत सहानुभूतीपूर्ण आवाजात त्याने तिला विश्वासात घेतले. या वेळी मात्र तिचा मनावरील बंध तुटला आणि न रहावून ती हुंदके देऊ लागली. त्याने काही काळ तिच्या आवेगाला तसेच मोकळे होऊन दिले आणि तिने स्वतःला थोडे सावरल्यानंतर, विनंती केली, “रश्मी, तू जर प्रांजळपणे मला तुझ्या काळजीचे कारण सांगितलेस तर कदाचित मी तुला मदत करू शकेन. मला माहीत आहे की तू आपल्या या गावात एकटी रहात आहेस. तुझ्याशी विश्वासाने बोलण्यास कदाचित येथे कोणी नसेल.”

थोडा संकोच केल्यानंतर, खाली बघत ती हळूच म्हणाली, “सर, माझ्या प्रियकराने मला अचानक काही न सांगता सोडले आहे आणि नोकरीसाठी मध्य-पूर्वेला गेला आहे.”

थोडी सहानुभूती व्यक्त केल्यानंतर, विवेकने तिला सांगितले की, “हात्तेचा, एवढेच ना. अग, समाजात अशा खूप घटना घडतात. तो मुलगा तुझ्या लायकीचा नव्हता असे समज. काही दिवसानंतर, हे दुःख कमी होऊन, तुलाच सुटका झाल्यासारखे वाटेल. तू तरुण आहेस, दिसायला चांगली आहेस आणि योग्य वेळी तुला अधिक चांगला जोडीदार भेटेल. तू आता तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर.”

हा असा सल्ला मिळाल्यावर ती आणखीनच रडू लागली. “सर, आमचे कुटुंब अतिशय सनातनी आहे. मला सांगायला लाज वाटते की मला दिवस गेले आहेत. माझ्याकडे माझ्या घरच्यांना तोंड दाखवायलासुद्धा जागा उरलेली नाही.”

आता मात्र विवेकला चांगला धक्का बसला. तो त्यातून जरा सावरत असतांना, ती पुढे म्हणाली, “ सर, ही माहिती घरी समजल्यास, आमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल. शिवाय माझ्या लहान बहिणीचे लग्न जमणे खूप कठीण होईल.”

“बरं, आत्ताची स्थिती काय आहे? गर्भपाताचा विचार केला आहेस का?”

“सर, आत्ता चार ते पाच आठवडे झाले आहेत. मला गर्भपात करण्याची अजिबात इच्छा नाही. त्यापेक्षा, आत्महत्या करून मला आणि बाळाला एकदमच संपवण्याचा विचार माझ्या मनात सतत घोळत आहे.”

तसं पाहील तर, तिची ही दुर्दशा कळण्याआधीपासूनच विवेक रश्मीकडे आकर्षित झाला होता आणि तिच्याशी हा विषय कसा काढायचा याचा विचार करत होता. थोडा विचार करून, विवेक म्हणाला, “रश्मी, अविचाराने आणि घाईने कुठलेही पाऊल उचलू नकोस. आता मोकळेपणाने बोलल्यामुळे तुला जरा हलके वाटेल असेल. उद्या संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर आपण शांतपणे भेटू. मला जो उपाय सुचत आहे त्यावर चर्चा करून मग काय ते ठरव.”

यावेळेपर्यंत आम्ही सर्व मित्र गणपतीच्या गोष्टीत पूर्ण गुंतून गेलो होतो. राकेश गप्प होता यात सगळे आले.

“दुसऱ्या दिवशी तिला भेटल्यावर, त्याने तिला प्रामाणिकपणे सांगितले की तो तिच्याकडे आकर्षित झाला आहे. त्याने तिला त्याच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची प्रांजळपणे माहिती दिली ज्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे असलेल्या वंध्यत्वाचा समावेश होता.”

विवेक, “ माझी तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तुझ्या होणार्‍या मुलाला आपण आपल्या दोघांचे मूल म्हणून वाढवू. पण आत्महत्येचा विचार नक्की सोडून दे.”

रश्मी स्तंभित होऊन विवेकचे बोलणे ऐकत होती. तिचा तर तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिने विचारले, “ सर, पण तुम्हीच सांगीतले की दुसर्‍याचा असल्याने, तुम्ही या आधी तुमच्या पहिल्या मुलाचा मानसिक स्वीकार करू शकला नव्हता आणि त्यामुळेच तुमचे लग्न मोडले.”

विवेक, “मला झालेल्या पश्चात्तापाबद्दल आणि गेलेल्या काळामध्ये माझे विचार कसे बदलले आहेत याबद्दल मी काय बोलू? माझ्यावर विश्वास ठेव. मी झालेल्या घटना बदलू शकत नाही. पण एक उत्तम नवरा आणि बाप नक्की होऊन दाखवीन.”

त्यानंतर, एक दिवस विचार करून तिने लाजत होकार दिला. विवेकने ही चांगली बातमी मला धावत येऊन सांगितली.

“मित्रांनो, दोन्ही कुटुंबीयांना रश्मीच्या तत्कालीन आणि त्याच्या शारीरिक परिस्थितीची कल्पना नव्हती. काही दिवसांच्या विचारानंतर, रश्मी आणि विवेक यांनी घरच्यांच्या आशीर्वादाने फारसा गाजावाजा न करता एका साध्या सोहळ्यात लग्न केले. संबंधित सर्वांच्या आनंदात भर घालत, सुमारे सात महिन्यांनंतर, तिने एका अकाली वाटणाऱ्या परंतु अन्यथा सामान्य निरोगी बाळाला जन्म दिला. त्यांनी तिचे नाव श्वेता ठेवले.”

“मित्रांनो, विवेकची शारीरिक उणीव मला माहित असल्याने, विश्व आणि श्वेता यांच्या बाबतीतील सत्य ती दोन्ही जोडपी सोडून फक्त मलाच माहित होते. कालांतराने दोघांमध्ये खूप प्रेमळ बंध निर्माण झाले. त्यानंतर वेळोवेळी विवेक आणि रश्मी यांच्या सुखी संसारांची कथा मला त्यांच्याकडून कळत होती. पुढची वीस वर्षे उत्तम वैवाहिक आनंदात गेली आणि बघता बघता श्वेताचे रुपांतर एका सुंदर तरुण उत्साही महाविद्यालयीन मुलीत झाले.”

आत्तापर्यंत आम्हा सर्वांची उत्सुकता पूर्णपणे ताणली गेली होती.

गणपती पुढे म्हणाला, “या कथेतील पुढचा ट्विस्ट जवळपास एखाद्या चित्रपटासारखाच झाला. विश्व माथूर, श्वेता गुप्ताच्याच कॉलेजमध्ये तीन वर्षे पुढे शिकत होता. योगायोग बघा की काही काळानंतर, दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या सहजीवनाची स्वप्ने पहावयास सुरुवात केली. जन्मोजन्मी सहजीवनाच्या आणाभाका झाल्यावर दोघांनी आपला लग्नाचा विचार घरी सांगितला.

गुप्ता आणि माथूर कुटुंबीयांचा असा समज होता की विश्व आणि श्वेता वेगवेगळ्या आईची असली तरी ती भावंडे आहेत. त्यांनी विश्व आणि श्वेताच्या लग्नाला अनाचार म्हणून कडाडून तीव्र विरोध केला. खरे सत्य फक्त विवेक, पल्लवी, रश्मी आणि मला माहीत होते.”

“सुरुवातीला, विवेकचाही या लग्नाला खूप विरोध होता कारण नाहीतर त्याला त्याच्या कुटुंबीयांना, जवळच्यांना आणि श्वेताला हे दीर्घकाळ ठेवलेले शारीरिक गुपित सांगावे लागेल. पल्लवीने विश्वच्या जन्माचे रहस्य त्याच्या पालक वडिलांना सांगितले होते की नाही याची विवेकला कल्पना नव्हती. त्याच वेळी, विश्व आणि श्वेता एकमेकांवर किती प्रेम करतात ह्याची त्याला पूर्ण कल्पना आली होती. तो एक धर्मसंकटात पडला होता.”

“त्याच्या या विचित्र परिस्थितीत विवेक सल्ल्यासाठी माझ्याकडे आला. मित्रांनो, तुम्ही विवेकला काय सल्ला दिला असता? मी फक्त त्याला त्याच्या अंतर्मनाला योग्य वाटेल तसेच कर; असा सल्ला दिला.”

नंतर मला कळले की, विवेकने त्याचे आई वडील, राजकुमार आणि पल्लवी माथूर, रश्मी आणि दोन प्रेमिकांसोबत एक एकत्र मीटिंग बोलावली. शक्य तितक्या तपशिलात त्याने त्यांना सर्व घडामोडी, स्वतःमधील उणीव आणि वेळोवेळी त्याच्याकडून झालेल्या चुकीची वागणूक याची माहिती दिली. अखेरीस त्याने सर्वांना क्षमा करण्याचे आवाहन केले आणि ही बैठक पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची विनंती केली. या खुलाशांमुळे सर्वांनाच धक्का बसला होता, तरीही वीस वर्षांहून अधिक जुने असे हे कौटुंबिक रहस्य तसेच ठेवण्यास सर्वांनी सहमती दर्शविली. खरं तर, सुदैवाने, विश्व आणि श्वेताच्या हितासाठी, त्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक केले.”

विश्व आणि श्वेता यांनी त्यांच्या वडिलांचे मनापासून आभार मानले. विवेकने त्यांना अनावश्यक गैरसमजापासून अथवा ताटातुटीपासून वाचवले होते. आज विश्व आणि श्वेता खूप आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत, त्यांना दोन छान मुलेही आहेत.”

“मित्रांनो, विवेकने काय केले किंवा काय केले नाही याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाचे मत असू शकते. पण घडले हे असेच”, असे म्हणत गणपतीने आपल्या कथेचे कथन संपविले.

विश्वास दात्ये – ९८५००३५३६२
vishwasdatye@gmail.com

Author