नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.
बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी सरदार शिद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणवीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणवीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’