कार्यकाळ: २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०
जन्म: २३ डिसेंबर १९०२ मृत्यू: २९ मे १९८७
चौधरी चरणसिंह ३ एप्रिल १९६७ साली उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले. २५ फेब्रुवारी १९६८ साली त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर १७ फेब्रुवारी १९७० साली ते पुन्हा मुख्यमंत्री बनले.
भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंह यांची ओळख आहे. चौधरी चरणसिंह यांचा जन्म नूरपूर गावातील जाट परिवारात झाला. राममनोहर लोहिया यांच्या ग्रामीण सुधार आंदोलनात त्यांचा सहभाग होता. चौधरी चरणसिंह यांचे वडील चौधरी मीरसिंह यांनी चरणसिंह यांना नेहमीच नैतिक मूल्यांची शिकवण दिली. चरणसिंह हे सहा वर्षांचे असताना चौधरी मीरसिंह सहपरिवार नूरपूर येथून जानी खुर्द गावात. वास्तव्यास आले. याच परिसरात चौधरी चरणसिंह यांनी गावातील गरीब ‘शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगरा विश्वविद्यालय येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत १९२८ साली गाझियाबाद येथे वकिलीला सुरुवात केली. कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणावर त्यांचा विश्वास होता. काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनापासून प्रभावित होत चरणसिंह यांनी गाझियाबाद येथे काँग्रेस कमिटीचे गठण केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पगडा होता. मिठाच्या सत्याग्रहातील आंदोलनातील सहभागामुळे चौधरी चरणसिंह यांना सहा महिन्यांचा कारावासदेखील झाला. कारागृहातून परतल्यानंतर चौधरी चरणसिंह यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वतःला स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. १९४० साली त्यांना आंदोलनातील सहभागाबद्दल पुन्हा एकदा कारावास झाला. शेतकऱ्यांचा नेता अशी त्यांची ओळख बनली होती. १९५४ साली त्यांनी जमीन संरक्षण कायदा संमत केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.