कल्पनाची ‘आयडिया!’
Category:
साहित्य - ललितकल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या समाधानातच स्वतःचा आनंद मानणारे होते. कल्पनाला किशोरने पसंत केले. रितीरिवाजानुसार लग्नकार्य पार पडले. चौघे आनंदाने राहू लागले. वर्षातील सणवार परंपरेनुसार पार पडले. काही दिवसांनी नव्याची नवलाई संपुष्टात आली आणि घरातील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही. कामापुरतंच एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. कल्पना हुशार होती. तिनं एका रविवारी किराणा दुकानातून एक छोटं रिकामं खोकं आणलं. त्यावर रंगीत कागद चिकटवून ते पॅकबंद केलं. त्याच्या वरच्या बाजूला एक काॅईन बाॅक्ससारखी दोन इंचाची चीर पाडून ठेवली.