श्रीमान बाळासाहेब खुशालराव – ऐसपैस

बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हा गृहस्थ गावांत सर्वांना माहीत आहे. हे गृहस्थ माहीत असण्यासारखेच आहेत. गावांत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, त्यांना छत्रपति शिवाजीमहाराज कोण हेही माहीत नाही असे खुशाल समजावे. या गावातल्या लोकांना एक वेळ गांधी माहीत नसले तरी चालेल.



सुप्रसिद्ध विनोदी लेखक वि. आ. बुवा यांची ही कथा १९६४ मध्ये ‘हंस’ मासिकात प्रकाशित झाली होती. व्यास प्रतिभा दिवाळी अंक २०१५ मध्ये ती पुनर्प्रकाशित झाली होता. त्यातूनच साभार.


बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हा गृहस्थ गावांत सर्वांना माहीत आहे. हे गृहस्थ माहीत असण्यासारखेच आहेत. गावांत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, त्यांना छत्रपति शिवाजीमहाराज कोण हेही माहीत नाही असे खुशाल समजावे. या गावातल्या लोकांना एक वेळ गांधी माहीत नसले तरी चालेल. नेहरू माहीत नसले तरी खपून जाईल. पण बाळासाहेब माहीत नाही असे कधीही होणार नाही. अशी ही असामी आहे. केवळ बाहेरगावच्या लोकांना हा महापुरुष माहीत नाही. एवढी किरकोळ अडचण दूर करण्यासाठीच हा प्रयत्न आहे.

बाळासाहेबांचे नाव बाळासाहेब नाही. वडिलांचे नांव खुशालराव नाही आणि आडनावही ऐसपैस असे नाही. बाळासाहेबांचे खरे नांव अनंत आहे. वडिलांचे नांव केशव आहे आणि आडनांव खळदकर आहे. थोडक्यात म्हणजे अनंत केशव खळदकर हे त्यांचे खरे संपूर्ण नाव आहे. कागदोपत्री हेच नांव आहे. लहानपणी शाळेंत, ‘अंत्या! गाढवा! अंगठे धरून उभा रहा, वगैरे शिक्षांच्या वेळीहि त्यांचे अनंत हे नावचं वापरले जात होते. त्यांची बायकोहि, पुण्याच्या जवळ स्टेशन आहे खडकी, अनंतरावांची आहे मी भलतीच लाडकी, असेच उखाण्यांतून नाव घेतांना म्हणते. वडिलांचे नावही खुशालराव नसून केशवरावच आहे. केशवरावसुद्धा केशवराव म्हणूनच उभ्या गावाला माहीत होते. त्यांचे आडनाव खळदकर हे तर कैक पिढ्या चालू आहे.

असे असूनहि अनंत केशव खळदकरांचे बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हे नाव कसे पडले? कदाचित ते खुशालराव ऐसपैस नावांच्या गृहस्थाला दत्तक गेले असावेत असे तुम्हाला वाटेल. परंतु दत्तक वगैरे गेले नाहीत. मग हे नाव कसे पडले? तेच सांगतो. अनंतरावांची वडिलोपार्जित इस्टेट तशी जेमतेमच आहे. घराचे भाडे दरमहा दीडशे रुपये येते. थोडीशी शेती आहे.

त्यामुळे आर्थिक परिस्थिती साधारणच आहे. असे असूनहि अनंतरावांच्या बोलण्याचा नोकझोक एखाद्या श्रीमान् बाळासाहेबासारखा असतो. म्हणून लोक त्यांना श्रीमान् बाळासाहेब असे म्हणतात. बाळासाहेब नोकरी वगैरे करीत नाहीत. नुसते खुशालचेंडूप्रमाणें हिंडत असतात. म्हणून लोकांनी त्यांना खुशालराव हेंहि एक नांव बहाल केले आहे. बाळासाहेब गप्पा मारायला बसले की असे कांही अघळपघळ आणि ऐसपैस बोलतात की, विचारायची सोय नाही. त्यांच्या या ऐसपैस बोलण्यावरूनच लोक त्यांना ऐसपैस या नांवाने संबोधतात. अशा प्रकारें बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हे संपूर्ण नवीन नांव त्यांना चिकटलें आहे.

असे हे बाळासाहेब आहेत. उद्योगधंदा काहीहि करीत नाहीत. झकपक कपडे करून नुसते हिंडत असतात. त्यांचे वय आता पस्तीस आहे. शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले आहे. गोरा रंग आणि नजरेत भरणारें व्यक्तिमत्त्व या दोन गोष्टी त्यांना निसर्गानेच दिल्या आहेत. परमेश्वर नेहमी गंमतच करीत असतो जी माणसें आळशी असतात, थापाडी असतात, बनवाबनवी करणारी असतात, त्यांना तो असे काही झकासपैकी व्यक्तिमत्त्व बहाल करतो की विचारू नका. बघा पाहिजे तर! तुमच्या ओळखीचेसुध्दा काहीं लुच्चे, थापाड, गोरेगोमटे आहेत की नाही? आणि जीं माणसे जंटलमेन आहेत ती मात्र दिसायला अगदीच खत्रूड असतात. परमेश्वराची ही एकाला एक द्यायचें आणि दुसऱ्याला दुसरेच द्यायचे ही संवय केव्हा जाणार आहे कुणास ठाऊक! पण आता त्याची ही सवय जाणें शक्य नाही. आता परमेश्वराचे वयही खूप झालेले आहे. आतां या वयांत संवयी बदलणे अशक्य आहे.

तर सांगायचा मुद्दा हा की, बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व दुसऱ्यावर छाप टाकणारे आहे. बोलण्याची कलाहि त्यांना अवगत आहे. म्हणजे काय, तर बैठकीत बसले असतां मिठ्ठासपणे एखादें आख्यान लावून ते खुलवून सांगण्याची कला त्यांना जमली आहे.

हेहि त्यांचे एक भांडवल आहे. नोकरीधंदा काहीच नसल्यामुळे त्यांना निवांतपणाहि खूप मिळतो. अशा वेळी त्यांच्या डोक्यात अनेक नामांकित कल्पना स्फुरत असतात. त्या कल्पनाच ते आम्हां मंडळींना खुलवून सांगत असतात. आम्ही ऐकून घेत असतो. कारण त्यामुळे आमची करमणूक होत असते.

बाळासाहेबांचे बहुतेक प्लॅन्स ऐसपैस असतात. सगळी एस्टिमेट्स लाखाच्या घरांतली असतात. सगळ्या गोष्टी ते लौकच करणार असतात. फक्त पावसाळा, पर्मिट वगैरे किरकोळ अडचणी असतात. एरवी सगळं काही तयार असते. पैशाचा तर प्रश्नच नसतो. बाळासाहेबांच्या दृष्टीने पैसा म्हणजे अगदीच मायनर बाब आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यांत ‘पैशाची अडचण’ हे शब्दच येत नाहीत. पैशाची आपल्याला ददात नाही या भूमिकेतूनच सर्व गोष्टी बोलल्या जातात. अशा या बाळासाहेबांचा अस्सल परिचय मी आतां करून देणार आहे.

एके दिवशी सकाळी ते माझ्याकडे आले. बाळासाहेबांना गांवातल्या सगळ्या लोकांच्या चहाच्या वेळा माहीत आहेत. त्याप्रमाणें ते माझ्या चहाच्या वेळी आले. खुर्चीवर रेलून बसले.

“काय बुवा, काय म्हणतंय् तुमचं साहित्य? ” बाळासाहेबांनी माझीच एक सिगरेट लंपास करीत म्हटले.

“चाललंय नेहमीप्रमाणं.” मी म्हणालो.

“तुमच्यासारख्या लेखकांना कसं निवान्त घर पाहिजे.’ बाळासाहेब म्हणाले, “अगदी काम् अँड क्वाएट! म्हणजे लेखनात डिस्टर्ब होणार नाही.” बाळासाहेब म्हणाले.

“बरोबर आहे.” मी म्हणालो.

“अहो, काही नाही तरी हल्ली या रेडिओचा सगळ्यांत मोठा उपद्रव होऊन बसला आहे.” बाळासाहेब म्हणाले, “मोठ्यांदा रेडिओ लावला की उपद्रव होतो.”

“चालायचंच! माणसाला सगळ्याच सुखसोयी थोड्याच मिळतात? रेडिओ ही चीज काही चुकवू म्हटलं तरी चुकवता येणार नाही हल्ली! आफ्रिकेच्या जंगलांत जरी आपण वैतागून रहायला गेलो तरी तिथल्या एखाद्या पिग्मीच्या हातातसुद्धा ट्रॅझिस्टर रेडिओ असणार! हे असंच चालायंच असं म्हणून गप्प बसायचं झालं.” मी म्हणालो.

“ते काही नाही बुवासाहेब. मी तुमच्या रहाण्याची व्यवस्था करतो. मी एक नवीन बंगला बांधायला घेणार आहे. कामाला लौकरच सुरुवात होईल. हल्ली काय, हा पावसाळा आहे ना, त्यामुळं थांबलोय्, बंगला झाला, की त्यातला काहीं भाग मी तुम्हाला रहायला देणार आहे.”

“थँक्यू!” मी म्हणालो, “पण बाळासाहेब, मराठी लेखकाला बंगल्याचं भाडं कसं परवडणार?”

“बुवा, तुम्ही या बाळासाहेबांना अजून ओळखलेलं दिसत नाही.” बाळासाहेब प्रेमळ त्वेषाने म्हणाले, “मी तुमच्याकडून भाड्याचे पैसे घेऊन ठेवू कुठल्या बँकेत? भाडं वगैरे काही नाही.

तुम्हीं आमच्या बंगल्यांत फुकट येऊन रहायचं. तुम्ही फक्त नॉमिनल दरमहा एक रुपया भाडं द्यायचं.”

आमच्यावर फारच कृपादृष्टी ठेवतां हं तुम्ही.” मी म्हणालो.

“कसली कृपा न् काय! किरकोळ गोष्ट आहे.” बाळासाहेब म्हणाले, “तुम्हां लेखकांना मोठमोठे शब्द वापरायची संवय आहे झालं!”

तरीही कृपादृष्टीच आहे ही.” मी म्हणालो, “हल्ली जागेची टंचाई कोण आहे! पागडी आणि डिपॉझिट यासाठी हजारों रुपये मोजावे लागतात.”

“पण मी मात्र तुम्हांला तशीच जागा देणार आहे.” बाळासाहेब म्हणाले, “मी फार मोठी योजना आखली आहे. वीस एकर जमिनीवर मी माझी प्रॉपर्टी तयार करणार आहे. संबंध स्कीम तयार आहे.”

“वीस एकर म्हणजे फार मोठी जमीन झाली!” मी आश्चर्याने म्हणालो, “काय काय प्लॅन आहे? ”

माझा हा प्रश्न ऐकून बाळासाहेबांनी माझ्याच टेबलावरचा एक फुलस्केप कागद घेतला आणि हातांत पेन घेऊन कागदावर प्लॅन काढायला सुरुवात केली. बाळासाहेब म्हणाले, “या कागदाची एरिया वीस एकर आहे असं समजा. धिस इज् नॉर्थ. धिस्, ईस्ट.”

“म्हणजे नकाशांतल्याच दिशा म्हणा ना.” मी म्हणालों.

“हो. मध्यभागीं या इथं हा दोन एकरांचा हा चौकोन पहा.

इथं बंगला बांधणार आहे मी.”

“दोन एकरांवर बंगला? ” मी विचारले.

“येस! बंगला म्हणजे बंगला झाला पाहिजे! बांधायचं ते बांधून साडेचार खोल्यांचं खुराडं बांधणं मला पसंत नाही. ऐसपैस वावरतां आलं पाहिजे. नाहीतर चाळींतली भाड्याची डबलरूम काय वाईट आहे? काय? बरोबर आहे ना मी काय म्हणतों तें? “

“तुम्ही नेहमी बरोबरच बोलतां.” मी म्हणालो. “कसं बरोबर बोललांत बरं!” बाळासाहेब म्हणाले, “या दोन एकरांवर हा बंगला झाला. हे पूर्वेकडे बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार राहील.”

“बरोबर आहे!” मी म्हणालो, “घर नेहमी पूर्वाभिमुख असावं. लाभदायक असतं.”

“म्हणूनच मी पूर्वाभिमुख बांधणार आहे.” बाळासाहेब म्हणाले, “पश्चिमेला ही बाग. या चौकोनात फुलझाडे आणि फळझाडे लावणार आहे. दक्षिणेला भाजीपाला वगैरे लावणार आहे. उत्तरेला क्रीडांगण करणार आहे आणि पूर्वेला फ्रंट एंटरन्स आहे. बंगल्यापासून कंपाउंडच्या गेटपर्यंत पोर्च, लॉन, कारंजे आणि रंगीबेरंगी फुलांची झाडे लावणार आहे. हा आपला ढोबळ आराखडा झाला.”

“फारच भव्य योजना आहे.” मी म्हणालो.

“आपल्याला सगळं कसं ऐसपैस असलं म्हणजे बरं वाटतं.

म्हणून तर प्रशस्त बंगला बांधणार आहे. एकदम प्रशस्त !” बाळासाहेब म्हणाले.

“बंगल्यात कोणकोण रहाणार आहेत? ” मी विचारले.

“माझी फॅमिली आणि तुमची फॅमिली. दॅटस् ऑल्! कंप्लीट एक मजला मी तुम्हाला देणार आहे.” बाळासाहेब म्हणाले.

“सबंध मजला म्हणजे फार जागा झाली. आम्हांला तीन खोल्या बस्स झाल्या.” मी कर्मदरिद्रीपणा दाखवून म्हणालो, “आम्हांला करायच्या काय जास्त खोल्या न् एवढी मोठी ऐसपैस जागा? “

“तुम्हांला सगळा मजला वापरावाच लागणार!” बाळासाहेब मला गोड तंबी देत म्हणाले, “तुम्ही सगळा मजला कसा वापरीत नाही ते मी बघणारच आहे.”

“हे मात्र टू मच झालं हं बाळासाहेब!” मी म्हणालों.

“तुमच्यासाठी मी हे करणारच आहे.” बाळासाहेब म्हणाले, “शिवाय प्रॉपर्टीच्या प्रिमायसेसमध्यें तुम्ही वाटेल तिथं बसू शकतां. जागेचा वापर वाटेल तसा करूं शकाल.”

“बंगला अप्रतिम होणार असेल!” मी म्हणालो.

“बंगल्याच्या डीटेल्सच सांगतो. म्हणजे बंगल्याची नीट कल्पना येईल.” बाळासाहेब म्हणाले आणि त्यांनी दुसरा फुलस्केप कागद पसरून पेननं रेघोट्या ओढायला सुरुवात केली.

“हा बंगल्याचा चौथरा. पांच फूट उंचीच्या चौथऱ्यावर सगळा बंगला बांधणार आहे. त्यामुळे बंगल्याला पक्केपणा येऊन शिवाय बंगला उठावदार दिसेल. बंगल्याला चारही बाजूंनी दहादहा फूट रुंदीचा व्हरांडा ठेवणार आहे हा असा.” असे म्हणून बाळासाहेबांनी दहा फूट रुंदी दाखवणाऱ्या चार रेघा मारल्या. ते पुढे म्हणाले, “हा बंगल्याचा मुख्य दिवाणखाना. पन्नास बाय पन्नास फुटांचा असेल. दिवाणखान्याच्या या बाजूला चार खोल्या, या बाजूला चार खोल्या आणि या बाजूला चार खोल्या असतील.” असे म्हणून त्यांनी पूर्व सोडून सगळ्या दिशांना चार-चार चौकोन काढले. प्रत्येक दोन खोल्यांतून हा चार फुटांचा पॅसेज असेल. या खोल्यांच्या पलीकडे हे किचनरूम. हा इथं डायनिंग हॉल. ही स्टोअररूम. या इथं बाथरूम-टेन बाय टेनची. हे संडास. हे वॉशबेसिन इथं येईल. ही कपडे धुण्यासाठी स्पेशल खोली. ही कपडे वाळत टाकण्याची स्पेशल खोली. आता या बाजूला या. हे दहा बाय दहाचं देवघर इथं येईल. नंतर ही रीडिंग रूम. इथे निवांतपणे वाचत बसावं. ही खोली रेडिओसाठी. ही मी साउंडप्रूफ करून घेणार आहे. रेडिओ लावल्यावर रेडिओचा आवाज जरासासुद्धा बाहेर येणार नाही.”

“मग ज्यांचं रेडिओ सिलोन किंवा विविध भारती ऐकल्याशिवाय अन्नग्रहण करायचं नाहीं असं कडक व्रत आहे त्याचं कसं होणार? ” मी विचारले.

“त्यांनी या खोलीत बसून परमपवित्र हिंदी गाणी ऐकावीत.” बाळासाहेब म्हणाले, “रेडिओस्टेशनवरचे स्टुडिओ कसे साउंडप्रूफ असतात, तशी ही रूम मी करणार आहे. ही स्टडीरूम. इकडे या सहा बेडरूम्स. इकडच्या या बाजूला चार खोल्या पाहुण्यांसाठी आहेत. ही खोली स्त्रियांच्या प्रसाधनासाठी. इथं कपाटांत पातळं, ब्लाऊज वगैरे वस्तू बायका ठेवतील. याशिवाय त्यांची वेणीफेणी, इतर नट्टापट्टा काय असेल तो त्या या खोलीत करतील. ही खोली पुरुषांच्या वेशभूषेसाठी आणि दाढी करण्यासाठी. प्रत्येक कामासाठी अशी सेपरेट रूम ठेवली म्हणजे दगदग नाही. खरं आहे की नाही? ”

खरं असणारच.” मी काहीतरी म्हणायचें म्हणून म्हणालो. “फारच सुंदर बंगला होणार असं दिसतंय.”

“प्रत्यक्ष बघाल तेव्हा कळेलच.” बाळासाहेब म्हणाले. “फार आदर्श बंगला होणार आहे.”

“वरच्या मजल्यावर काय-काय असणार आहे? ” मी

विचारले. “तोही असाच भव्य असणार काय? “

“ऑफ कोर्स!” बाळासाहेब म्हणाले, “डिट्टो ग्राऊंडफ्लोअरसारखाच! पन्नास बाय पन्नासचा दिवाणखाना, इतर रूम्स, सगळं-सगळं आत्ता सांगितल्यासारखंच.”

“वरच्या मजल्यावर कोण-कोण रहाणार?” मी विचारलें.

“फक्त तुम्ही आणि तुमची फॅमिली.” बाळासाहेब म्हणाले, “खालच्या मजल्यावर मी आणि माझी फॅमिली. बस्स!”

“पण एवढा प्रचंड मजला काय करायचा आहे? ” मी म्हणालो, “या मजल्यावर जी प्रचंड गच्ची तयार होईल त्या गच्चीवर चांगलं रेसकोर्स तयार होईल, नाहीतर मस्तपैकी क्रिकेटचं स्टेडियम बांधतां येईल.”

“मी त्याचाही विचार करून ठेवला आहे.” बाळासाहेब म्हणाले, “गच्चीच्या या निम्म्या भागात मी ओपन-एअर थिएटर करणार आहे.” असे म्हणून बाळासाहेबांनी माझ्या टेबलावरचा आणखी एक फुलस्केप कागद घेतला आणि त्या कागदावर प्लॅन काढायला सुरुवात केली. बाळासाहेब पुढे म्हणाले, “हे इथं स्टेज. स्टेजच्या मागं ही ग्रीनरूम. या बाजूला कपडेपट. ही खोली स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी. ही झाली स्टेजची मागील बाजू. पुढं हा एवढा पॅसेज. मग इथून खुर्च्या सुरू.”

“मागल्या रांगांच्या दिशेनं तुम्हाला गच्चीची लेव्हल उंच उंच करीत न्यावी लागले.” मी उगीच आपली एक किरकोळ म्हणून शंका विचारली.

“तसं काही करण्याची गरज नाही.” बाळासाहेब म्हणाले. “मी निराळ्या पद्धतीच्या खुर्च्या करून घेणार आहे. पहिल्यांदा सरसकट प्लेन गच्चीवर खुर्च्या मांडायच्या. प्रत्येक रांगेला नंबर ठेवायचा स्टेजजवळील एक नंबरची रांग आहे तशीच राहील. नंबर दोनच्या रांगेजवळ गच्चीच्या छोट्या भिंतीवर विजेचे बटन असेल. ते बटन दाबलं की दोन नंबरच्या रांगेजवळचं बटन दाबलं की तीन नंबरची रांग दोन इंच उंच होईल. चार नंबरच्या रांगेजवळचं बटन दाबलं की ती रांग तीन इंच उंच होईल. याच क्रमानं मागली प्रत्येक रांग एकेक इंच अधिकअधिक उंच होत जाईल. मग मागली रांगेतल्या प्रेक्षकांनाही स्टेज स्पष्टपणे दिसेल. कार्यक्रम झाल्यावर खुर्च्या काढायच्या. पुन्हा संपूर्ण गच्ची प्लेन. मग ही गच्ची क्रिकेट-ग्राउंड म्हणून वापरता येईल. याशिवाय गच्चीचा आणखी एक उपयोग मी करणार आहे.”

“आणखी काय करणार आहांत? ” मी उत्सुकतेने विचारले.

“ही गच्ची.” बाळासाहेब कागदावरील चौकोनावरून भराभर बोट फिरवून म्हणाले, “बंगल्याप्रमाणेच गच्चीचा एरिया पण दोन एकर आहे हे तुमच्या ध्यानात आलं असेलच. गच्चीच्या चारी बाजूंना ही तीन फूट उंचीची भिंत असेल. गच्चीचा जिना या भिंतीच्या वरून खाली आलेला असेल म्हणजे गच्चीचं दारसुद्धा र भिंतीच्या उंचीच्या वर असेल.”

“असं कशासाठी?” मी भाबडेपणानें विचारले.

“सांगतो.” भिंतीवर पाइपांच्या रेघोट्या ओढीत बाळासाहेब म्हणाले, “दहा-दहा फुटांवर चारी बाजूंना हे पाण्याचे पाच इंची पाइप्स असतील. हे सगळे पाइप्स एकदम सुरू केले की अर्ध्या तासांत अडीच फूट खोलीचे पाणी गच्चीवर साचेल. मग ही गच्ची नं म्हणजे पोहण्याचा तलाव होईल.”

“वंडरफुल आयडिया आहे!” मी थक्क होऊन म्हणालो.

“गच्चीचा मी आणखीही उपयोग करणार आहे.” बाळासाहेब म्हणाले, “हा मेन कॉक उघडला की सगळं पाणी निघून जाणार. पुन्हा तलाव जाऊन गच्ची तयार. गच्चीचा आणखी एक उपयोग म्हणजे टेरेस गार्डन म्हणूनही तिचा उपयोग करायचा. खाली पाव-पाव एकराचं लॉन म्हणजे हिरवळ करायची आणि तो प्रत्येक पाव एकराचा तुकडा क्रेननें उचलून गच्चीवर आणून ठेवायचा. आठ तुकडे एकाला लागून एक ठेवले की मस्तपैकी लॉन तयार होईल. मऊ मऊ गवताची मखमली हिरवळ! अशी मस्त दिसेल म्हणतां!”

“पण जमिनीवर हिरवळ असलेले पाव एकर जमिनीचे तुकडे न उचलायचे कसे?” मी विचारले.

“तीच तर आयडिया आहे! पाव एकराचे लाकडी वाफे तयार करायचे. त्यात माती घालून लॉन तयार करायचं आणि तो वाफाच क्रेननं वर आणायचा. “

‘थोडक्यात म्हणजे ही गच्ची, गच्ची कम् ओपन-एअर थिएटर कम् क्रिकेट ग्राउंड कम् स्विमिंग पूल कम् लॉन होणार आहे म्हणा की!” मी म्हणालो.

“करेक्ट!” बाळासाहेब म्हणाले.

“पण बाळासाहेब गच्चीवर लॉन कशाला हो? ” मी आपली एक शंका बावळटपणे विचारली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, “पावसाळा संपला आहे. सगळीकडे निसर्ग हिरवागार दिसत आहे. संबंध सृष्टि टवटवीत दिसत आहे. बंगल्याभोवतीची बाग हिरवीगार दिसत आहे. शरद ऋतु सुरू झाला आहे. शरद ऋतूंतील चांदणी रात्र आहे. चांदणं दुधासारखं पांढरंशुभ्र पडलं आहे. थंड वारा झुळुझुळू वहात आहे. सगळीकडे कसं शांत शांत आहे. अशा वेळीं गच्चीवरच्या मखमली हिरवळीवर माझ्या घरची माणसं, तुमच्या घरचीं माणसं, माझ्या मित्रांच्या घरचीं माणसं, तुमच्या साहित्यिक मित्रांच्या घरचीं माणसं मिळून शंभरएक लोक जमले आहेत. मखमली हिरवळीवर मी शंभर लोकांना थाटाची मेजवानी देत आहे. मसाले भात, भजी, बासुंदी, चटण्या, कोशिंबिरी, पापड, भाज्या वगैरे रुचकर अन्नाचा सुगंध थंड वातावरणात दरवळला आहे. त्यांतच उदबत्त्यांचा सुगंध मिसळल्यामुळं सगळं वातावरण धुंद झालं आहे. बागेतल्या रातराणीचा वास वाऱ्याच्या झुळुकीबरोबर येत असल्यामुळं वातावरण आणखीच सुगंधित झालं आहे. सर्व मंडळी गप्पागोष्टी करीत स्वादिष्ट जेवणावर ताव मारीत आहेत. तुमचे साहित्यिक मित्र काव्य-शास्त्र-विनोद करीत आहेत. गप्पांमुळं आणि काव्यशास्त्रविनोदामुळं जेवण तब्बल दीड तास चाललं आहे. मग जेवण झाल्यावर सर्वांनी त्रयोदशीगुणी विडे खाल्ले आहेत. सर्व पुरुष गोल्डफ्लेक सिगारेटचे झुरके घेत हिरव्या गार मखमली हिरवळीवर लोळत पडले आहेत. खाली पहावं तर मऊमऊ हिरवळ. बाजूला बघावं तर धुंद वातावरण आणि मादक चांदणं. वर बघावं तर रजनीनाथ चंद्र निरभ्र आकाशांतून आपली प्रेयसी पृथ्वी हिच्या हिरव्यागार सौंदर्याकडे पहात आहे. अशा रम्य आणि धुंद वातावरणांत पुरुषमंडळी गोल्डफ्लेकची पाकिटावर पाकिटे फस्त करीत आहेत. त्यांच्या बायका ‘इश्श! किती त्या सिगरेटी ओढायच्या!’ म्हणून आपापल्या नवऱ्यांचा गोड आणि लटका निषेध करीत आहेत. मग एखादा नवरा आपल्या पत्नीला म्हणेल, “तुझ्यापेक्षा या सिगरेटीला माझ्या ओठांचा सहवास जास्त वेळा मिळतो म्हणून तुला सिगरेटचा हेवा वाटतो असं दिसतंय.” तेव्हा सगळीकडे हंशा पिकेल आणि त्याची पत्नी लाजून आणि लटक्या रागानं म्हणेल, “चला! चहाटळ कुठले! चावट आहांत तुम्ही! अशा प्रकारे मध्यरात्र उलटून गेली तरी गप्पागोष्टी चालल्या आहेत. पहाटे पहाटे पेग तर येत चालल्यामुळे हळूहळू प्रत्येकजण त्या हिरवळीवरच झोपी गेला आहे. पहाटे थंडी वाजेल याचीही शुद्ध नाही. अशा वेळी मी आणि माझी बायको घरातून रग आणून अनुक्रमें पुरुषांच्या आणि बायकांच्या अंगावर पांघरेल. सगळीजण गुलाबी स्वप्नांच्या विमानांत बसून कुठेतरी दूरदूर गेली आहेत. तेथे एक परी भेटते. दुसरी परी भेटते. पऱ्यांचेच राज्य असते. त्या स्वप्नांतून परत येऊच नये असं वाटतं. सकाळी जाग येते ती गुलाबी स्वप्नाच्या टवटवीत आठवणीसहितच. अहाहा! गच्चीवरच्या मखमली हिरवळीवर असं मधुर काव्य भरलं आहे बुवासाहेब! म्हणून मी गच्चीवर हिरवळ करणार आहे.”

बाळासाहेबांच्या वर्णनशैलीवर मीही खूष झालो. एखाद्या कवीप्रमाणे त्यांनी वर्णन केले होते आणि मीही धुंद झालो होतो. बाळासाहेब नेहमी कल्पनेच्या साम्राज्यांत वावरत असतात हे मला माहीत होते. पण त्यांच्या कल्पनेचा काव्यविलास मला आज प्रथमच पहायला मिळाला होता. बाळासाहेबांच्या कल्पनेतील ही रम्य गच्ची जगात कोठेतरी असेल काय याचा मी विचार करू लागलो. अरबी भाषेतील सुरस गोष्टींत किंवा गुलबकावलीच्या कथेत अनेक रम्य आणि अद्भुत वर्णने आहेत; पण बाळासाहेबांची कल्पनाशक्ति उस्सेभी जादा है, हे मला आढळून आले.

बाळासाहेब गच्चीवरून खाली येण्यापूर्वी बाळासाहेबांना आणखी काही शंका विचारण्याचे मी ठरविले आणि त्यांना विचारले, “बाळासाहेब, एक शंका आहे.’

“विचारा ना.” बाळासाहेब म्हणाले. “तुमच्या या स्टेजवर गाण्याची मैफल चालू आहे. सगळे श्रोते तल्लीन होऊन या इथं खुर्च्यावर बसून ऐकत आहेत आणि अचानकपणे अवकाळी पाऊस आला तर सगळ्या मैफलीवर अक्षरशः पाणी पडून रंगाचा बेरंग होईल. त्यासाठी काही व्यवस्था केली आहे की नाही तुम्ही? “

“बुवासाहेब, तुम्ही तर कमालच करता!” बाळासाहेब म्हणाले. “इतकी महत्त्वाची गोष्ट मी कसा विसरेन? ” असे म्हणून बाळासाहेबांनी गच्चीच्या प्लॅनचा कागद समोर ठेवला आणि त्यावरून बोट फिरवीत ते म्हणाले, “ही गच्चीची भिंत. या भिंतीत वॉटरप्रूफ पडदे गुंडाळून ठेवलेले आहेत. या पडद्यांना स्प्रिंगची ॲरेंजमेंट असेल. पाऊस येतो असे दिसले की लगेच स्प्रिंगची कळ दाबायची. मग गुंडाळलेला पडदा उघडलेल्या छत्रीच्या अर्धवर्तुळाकृति कापडाप्रमाणे आपोआप वर येईल. समोरच्या भिंतीतूनहि दुसरें अर्धवर्तुळ येईल. वर्तुळ म्हणजे नुसते गोल नाही बरं का. सिलिंड्रिकल गोल. समजा, एक प्रचंड पाइप घेतला आणि तो उभा कापल्यावर निम्मा पालथा भाग गच्चीच्या वर ठेवला आहे असं समजा. तेव्हा जो आकार येईल तशा आकाराचे वॉटरप्रूफ रूफ ताबडतोब तयार होईल. हे सगळं एक मिनिटाच्या आंत होईल. तेंहि श्रोत्यांना डिस्टर्ब न करता. आपण पाऊस आल्यावर छत्री जितक्या चटकन आणि सहज उघडतो, तितक्या सहज हैं सगळं होईल. मला वाटतं, आता आपण गच्चीवरून खाली येऊ या.” असे म्हणून बाळासाहेब खाली आले. अर्थात् मीहि खाली आलो. खाली येणे म्हणजे काय तर गच्ची म्हणून रेघोट्या ओढलेला कागद बाळासाहेबांनी बाजूला ठेवला आणि मी रहाणार असलेल्या मजल्याचा कागद टेबलावर पसरला. पुन्हा बाळासाहेबांची बोटाची फिरवाफिरव आणि पेनने काढलेले चौकोन हा अप्रतिम उद्योग सुरू झाला.

“हा कंप्लीट मजला तुमचा.” बाळासाहेब संबंध कागदाला बोटाने चौकोनी प्रदक्षिणा घालीत म्हणाले, “हा तुमचा दिवाणखाना हे इथं सोफा सेटस् असतील. मला वाटतं, पंचवीस सोफासेटस् पुरे होतील. होतील ना पुरेसे? ”

“करायचेत काय पंचवीस? दोन पुरे झाले. एक आम्हाला आणि एक कुणी आले-गेले तर. फार झालं तर आणखी दोनचार फोल्डिंग खुर्च्या ठेवूं या म्हणजे झालं.” मी कर्मदरिद्री कंजुषपणाने म्हणालो.

“डर्टी आयडिया!” बाळासाहेब म्हणाले, “या सुंदर दिवाणखान्यात फोल्डिंग चेअर्स? दिवाणखान्याची सगळी ब्यूटीच खलास होईल. फोल्डिंग चेअर्स ठेवायला माझा बंगला म्हणजे काय मुंबईच्या चाळीतलं दरिद्री खोलीचं खुराडं आहे काय? ”

“बरं तर खुर्व्यांची आयडिया कॅन्सल करू या.” मी म्हणालो, सोफासेटच ठेवू या.”

“राईट!” बाळासाहेब म्हणाले, “पंचवीस सोफासेटस् हे असे ठेवायचे. प्रत्येक सोफासेटवर मखमलीच्या कापडाचं कव्हर असेल. दिवाणखाना एअर-कंडिशन्ड असणारच. कारण संपूर्ण बंगलाच एअर-कंडीशन्ड करणार आहे मी. इव्हन संडास! तर काय सांगत होतो-‘

“मखमलीची कव्हर्स.” मी म्हणालो.

“बरोबर आहे!” बाळासाहेब म्हणाले, “प्रत्येक सोफासेटपुढे एकेक टीपॉय. अस्सल शिसवीच्या लाकडाचा. त्यावर एकेक चांदीचा अॅशट्रे आणि गोल्ड फ्लेकची दोनदोन पाकीटं.”

“पण मला गोल्डफ्लेक् महागात पडेल. आम्ही आपले पिवळाहत्तीवाले लेखक.” मी म्हणालो.

“यू नीड नॉट वरी!” बाळासाहेब म्हणाले, “माझा नोकर दररोज पाकिटं आणून ठेवील, माझ्या खर्चानं. तुमच्याकडे मोठमोठे साहित्यिक आल्यावर काय पिवळा हत्ती आणि चार मिनार त्यांना येणार?”

“बरेचजण खरंच चार मिनार ओढतात.” मी म्हणालो.

“पण या बाळासाहेबांच्या बंगल्यात येऊन साहित्यिक चार मिनारच ओढून गेले असे जर बाहेर कळलं तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील ना.”

“तुमची जर अशी नाचक्की होणार असेल तर मग गोल्डफ्लेकचीच पाकिटं ठेवली पाहिजेत.” मी म्हणालो.

“आता कसं बोललात!” बाळासाहेब म्हणाले, “या कोचावर आचार्य अत्रे बसले आहेत. या कोचावर पु.ल. देशपांडे बसले आहेत, इथे पु. भा. भारे बसले आहेत. इथे अनंत काणेकर बसले आहेत, इथे महादेवशास्त्री जोशी, इथं ग.दि. माडगूळकर, इथं व्यंकटेश माडगूळकर, इथे शंकर पाटील, इथं मिरासदार, इथं गंगाधर गाडगीळ, इथे अरविंद गोखले, इथं शांता शेळके, इथं वसुंधरा पटवर्धन, इथं ना.सी. फडके, इथं वि.स. खांडेकर, इथे रणजित देसाई, इथं रमेश मंत्री, इथं जयवंत दळवी, इथं मधु मंगेश कर्णिक, इथं ज्ञानेश्वर नाडकर्णी, इथं माधव मनोहर, इथं कुसुमाग्रज, इथे वसंत बापट, इथं मंगेश पाडगावकर, इथं विंदा करंदीकर-‘

“इथे आधीच आचार्य अत्रे बसले आहेत” मी बाळासाहेबांच्या कक्षात आणून दिले..

‘असं झालं काय? मग विंदा करंदीकर इथं बसतील.”

“अर्रर्रर्र!” मी एकदम म्हणालो, “पण इथं शांताबाई शेळके बसल्या आहेत.”

“सॉरी!” बाळासाहेब म्हणाले, “म्हणजे पंचवीस सोफासेटस् कमी पडणार असं दिसतंय. अन् तुम्ही म्हणत होता, दोन पुरे. आणखी पंचवीस म्हणजे टोटल पन्नास सोफासेटस् विथ वेल्वेट कव्हर्स इथं असलेच पाहिजेत. म्हणजे विंदा करंदीकर, श्रीकृष्ण पोवळ, अ.वा. वर्टी, इंदिरा, बाळ गाडगीळ, बाळ सामंत, उमाकांत ठोमरे, शं.ना. नवरे, वसंत सबनीस, काकासाहेब गाडगीळ, दत्तो वामन पोतदार, श्री. क्षीरसागर, अनिल, ग.त्र्यं. माडखोलकर, वामन चोरघडे, सुमती क्षेत्रमाडे, स.गं. मालशे, इंद्रायणी सावकार, बाळ गांगल वगैरे झाडून सगळे साहित्यिक आरामात बसतील. एअर कंडिशन्ड दिवाणखान्यात मऊ-मऊ मखमली कोचावर गोल्डफ्लेकचा आस्वाद घेतघेत आणि गरमागरम कॉफी पीत, मधेच सैंडविच आणि टोस्ट खातखात तुम्हा साहित्यिकांच्या मैफली होऊन जाऊ द्यात.

मी आपला तुमच्या शेजारी बसून रसिक श्रोत्यांची भूमिका घेईन. महिन्यातून एकदा सगळ्या साहित्यिकांना मस्तपैकी जेवण द्यायचं बरं का! एक जेवण तुमच्या दिवाणखान्यात, एक जेवण माझ्या दिवाणखान्यात, एक जेवण बागेत, एक जेवण गच्चीवर, एक जेवण हिरवळीवर, एक जेवण आंबराईत, एक जेवण बंगल्यातल्या तळ्याभोवती अशी बारा ठिकाणी बारा जेवण होतील.’

“पण या साहित्यिकांना प्रत्येक महिन्याला यायला कसं जमेल?” मी म्हणालो, “शिवाय काही साहित्यिक बाहेरगावी रहातात.”

“आपण त्यांना मोटारीत घालून आणायचं. मी पाच मोटारी ठेवणार आहे. त्या आपण दोघांनी कॉमन वापरायच्या आहेत. या बंगल्यात साहित्यिकांच्या काव्यशास्त्र-विनोदाच्या फैरीवर फैरी झडल्या पाहिजेत.” “बाळासाहेब, तुम्हाला काही अशक्य नाही बुवा! तुम्ही मनात आणाल ते करू शकाल.” मी म्हणालो. “कसं बोललात बरं!” बाळासाहेब म्हणाले आणि कागदावर बोट फिरवीत म्हणाले, “इथं तुमची साउंडप्रूफ खोली. या खोलीत बसून तुम्ही चिंतन करायचं; तुमच्या साहित्याच्या विचारांची आखणी आणि जुळवाजुळव करायची. ही खोली मुद्दाम बागेच्या दिशेला ठेवली आहे. समोर विविध रंगांच्या फुलांनी नटलेली ही बाग, तलावातील कमळे आणि हंस वगैरे पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमची प्रतिभा जागृत होऊन तुम्हाला लेखनाची स्फूर्ति यायला लागेल.”

असे म्हणून बाळासाहेबांनी आपले बोट दुसऱ्या रेषांकित चौकोनावर ठेवले. ते पुढे म्हणाले, “ही तुमची लिहिण्याची खोली. इथं हें अॅडजस्टेबल टेबल असेल आणि खुर्चीहि अॅडजस्टेबल असेल. त्यामुळं लिहितांना तुमच्या पाठीला, मानेला किंवा कमरेला कळ लागणार नाही. नुसती पायानं कळ दाबली की टेबल आणि खुर्ची यांची पोझिशन पाहिजे तशी अॅडजस्ट करून घेता येते. या इथं टेबलावर फ्लॉवरपॉट असेल. त्यात आमचा माळी दररोज ताजी, टवटवीत आणि सुगंधी फुले भरून ठेवील. इथं भारी किंमतीच्या उदबत्त्या लावायच्या, या कोपऱ्यांत अगदी छोटा पंखा असेल. त्या पंख्याच्या नाजुक वाऱ्यानं फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध तुमच्याकडे येईल. त्यामुळे लिहीत असतांना तुमचं मन प्रसन्न होईल. आता ही तुमची रीडिंग रूम. इथं वर्तमानपत्र आणि मासिकं असतील. शेजारच्या या रूममध्ये तुमची लायब्ररी असेल.”

“माझ्याकडे एवढी पुस्तकं नाहीत.” मी म्हणालो. “पुस्तके मी तुम्हांला डोनेशन म्हणून देणार आहे.” बाळासाहेब म्हणाले, “तुम्ही आणि मी मिळून निरनिराळ्या बुकडेपोंत जाऊ या. आणि तिथं तुम्ही पहिल्या लॉटमध्ये एकदम पांच हजार पुस्तक घ्या. गोदरेजकडे मी पुस्तकांच्या कपाटांची ऑर्डर देणारच आहे.

सगळी पुस्तकं आपण लॉरीत भरून आणू या. बंगल्याच्या मेंटेनन्ससाठी नेहमी मटेरियल लागणारच आहे. त्यासाठी मी एक टाटा मर्सिडिजची लॉरीच विकत घेणार आहे. या बाजूच्या सगळ्या खोल्या तुमच्या पाहण्यांसाठी. इकडच्या खोल्या तुमच्यासाठी बाथरूम, संडास, कपडे धुण्याची खोली, कपडे वाळविण्याची खोली, डायनिंग हॉल, किचन, स्टोअररूम, सगळं काही खालच्या माझ्या मजल्यासारखंच. बाथरूममध्ये शॉवर बाथची आणि गरम पाण्याची सोय असेल. प्रत्येक खोलीत ट्यूब लाइट असेल. याशिवाय, निळा, हिरवा, गुलाबी रंगांचे दिवे असतील. पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या रंगाचा लाइट लावावा. तुमच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर शाकुंतल, उत्तररामचरित, विक्रमोर्वशीय वगैरे नाटकांतील निसर्गरम्य चित्रांची मोठमोठी ऑइलपेंटची चित्रें रंगवली जातील. प्रत्येक पेंटिग भिंतीच्या साइझचं असेल. एका चित्रांतील वनश्रीच पुढल्या भिंतीवर चालू होईल आणि प्रसंग मात्र दुसऱ्या नाटकांतील असेल. त्यामुळे सबंध दिवाणखानाभर जणू काय एक रम्य उपवन आहे असे वाटेल आणि प्रत्येक भिंतीवर मात्र प्रत्येक नाटकांतील दृश्य असेल. दिवाणखान्याच्या छताला आभाळाचा रंग दिला जाईल. तुम्ही दिवे मालवून कोचावर पडा आणि छताकडे पहा. त्यापूर्वी एक स्विच ऑन करा. लगेच छतावर पौर्णिमेचा चंद्र दिसेल. अर्थात् हा कृत्रिम दिव्याचा चंद्र असेल. खोलीभर चांदण्यासारखा मंद प्रकाश पडेल. चंद्र प्रकाशित झाल्याबरोबरच छतावर विजेच्या बारीक दिव्यांच्या चांदण्याहि लुकलुकू लागतील. त्या चांदण्याच्या प्रकाशांत तुम्ही एका भिंतीवर दुष्यन्त-शकुंतलेचं प्रेम पहा. दुसऱ्या भिंतीवर राम आणि सीता यांची दिव्य प्रीति पहा. दुसऱ्या भिंतीवर राम आणि सीता यांची दिव्य प्रीति पहा. तुमच्या सारख्या लेखकांना अशा रम्य वातावरणांत ठेवलं म्हणजे तुम्ही भव्य-दिव्य लिहू शकाल. नाहीतर हल्लींचे लेखक, “मी आठ-बावन्नच्या लोककला लोंबकळत चाललो होतो.” असल्या दरिद्री कल्पनांच्या गोष्टी खरडतात. म्हणून मी ठरविलं आहे की, तुम्हांला माझा निम्मा बंगला द्यायचा आणि तुम्हाला क्लासिकल साहित्य लिहायला लावायचं.”

“तुमच्या सारख्याची कृपा असल्यावर काय अशक्य आहे? ” मी म्हणालो.

“बरं का बुवासाहेब, बंगल्यांत बसून कंटाळा आला की खाली यायचं. सबंध बंगल्याभोवती मी पाण्याचा प्रवाह ठेवणार आहे. त्यांतून बोटिंग करा किंवा बागेत आरामशीरपणे हिंडा. बागेत मी छोटासा झरासुद्धा ठेवणार आहे. एखादा सिंह, एखादा वाघ, एक हत्ती, एक उंट, इतर काही प्राणी आणि पक्षी. मोर तर मी पन्नासएक बाळगणार आहे. मोराची आपल्याला भारी आवड आहे. तुम्ही आपल्या आंबेवनात मोराचा नाच बघत बसा. तिथं कंटाळा आला की बंगल्यातल्या तलावाच्या काठीं बसा. तिथंहि प्रफुल्ल झालेली कमळं आणि तलावांत ऐटीनं पोहणारे हंस तुमचं मनोरंजन करतील. तुम्ही त्या वातावरणांत रमून जाल.”

अशा प्रकारे श्रीमान बाळासाहेब खुशालराव ऐसपैस यांनी आपल्या संकल्पित बंगल्याचा प्लॅन मला सांगितला. तूर्त पावसाळा आहे म्हणून; नाहीतर एव्हाना कामाला सुरुवातसुध्दा झाली असती. बराच वेळ झाला होता. बाळासाहेब घड्याळाकडे पहात म्हणाले, “अरेच्या! बंगल्याचा प्लॅन सांगता सांगता तीन तास निघून गेले की! मला आतां एका स्टुडिओंत जायचं आहे. दिलीपकुमार आणि वैजयंती मालेबरोबर एका पिक्चरसाठी काँट्रॅक्ट करायचं आहे. त्याचं डिस्कशन करायचं आहे.”

“पण ती मंडळी मुंबईला रहातात.” मी म्हणालो.

“मी मोटारनं जातोय. मी मोटार विकत घेणार आहे. तूर्त ट्रायलसाठी आपल्या देवीचंदशेठची गाडी नेणार आहे. रनिंगला बरी असली तर तीच तूर्त घेणार आहे. बरं आहे बुवासाहेब! मी निघतो.” असे म्हणून बाळासाहेब निघाले. जाताजाता परत मागे येऊन ते मला म्हणाले, “बुवासाहेब, एक पांच रुपये द्या हो. जाताजाता हापूसचे आंबे एक डझन घेऊन जातो. मी येतांना पैसे आणायला गडबडीत विसरलो.” असे म्हणून श्रीमान् बाळासाहेब खुशालराव ऐसपैस यांनी माझ्याकडून पांच रुपये नेले. एक कप चहा, तीन फुलस्केप कागद आणि पाच रुपये, यांच्या मोबदल्यांत मी वर वर्णन केलेल्या बंगल्यांत कधी रहायला जायला मिळणार आहे याची वाट पहात आहे.

दरम्यान बाळासाहेब एक प्रचंड म्हणजे अतिप्रचंड असें आलीशान हॉटेल काढण्याच्या प्लॅनमध्ये गुंतले होते. नंतर ते सिनेमाचा स्टुडिओ काढण्याच्या कामात मग्न होते. पाठोपाठ प्रचंड डिपार्टमेंटल स्टोअर्स काढण्याच्या प्लॅनमध्ये ते फार बीझी होते. बाळासाहेबांच्या मागे असा प्रचंड कामांचा व्याप आहे. प्रत्येक प्लॅन बंगल्याच्या प्लॅनप्रमाणेच भव्य आणि जगांत अद्वितीय असा असतो. “पैसा कुठून आणणार एवढा,” असा प्रश्न विचारल्यावर ते लगेच तुच्छतेचा अभिनय करून म्हणतात, “हू केअर्स फॉर मनी? ” असे हे श्रीमान् बाळासाहेब आहेत. जागेची वगैरे अडचण असल्यास त्यांना भेटा. माझ्याप्रमाणेच तुम्हांलाही ते एखादा मोठा कोरा करकरीत फ्लॅट देतील.

सुप्रसिद्ध विनोदी लेखक वि. आ. बुवा यांची ही कथा १९६४ मध्ये ‘हंस’ मासिकात प्रकाशित झाली होती. व्यास प्रतिभा दिवाळी अंक २०१५ मध्ये ती पुनर्प्रकाशित झाली होता. त्यातूनच साभार.

Author