वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या; वांद्रे पूर्वेला उतरल्यावर उजवीकडच्या सरळ रस्त्याने चालत आल्यावर तुम्हाला काही अंतरावरच “श्री गणेश व दक्षिणमुखी हनुमान” तसंच शनिदेवतांच, मंदिर” दिसेल. मंदिराचं द्वार दक्षिणमुखी असल्यानं येथे दक्षिणमुखी हनुमानाची व शेजारीच शनीच्या मूर्तीचं दर्शन होतं.
मंदिराच्या मुख्य भागात गणपतीची सुबक मूर्ती असून तिची प्रतिष्ठापना १९८९ मध्ये मंदिर उभारणीच्या वेळेत करण्यात आली होती. त्यापूर्वी अर्थात, देऊळ उभारण्या अगोदर रस्त्यांच्या कडेलगत छोटेखानी देव्हार्यात गणपतीची मूर्ती होती; त्यामूर्तीचं रितसर विसर्जन करुन त्याजागेवर मंदिराची पायाभरणी करण्यात आली असल्याचं देऊळाचे ट्रस्टी सांगतात.
परंपरे प्रमाणे सकाळच्या प्रहरी व संध्याकाळी येथे आरती तर होतेच. पण भजनं, किर्तनं ही होत असतात. त्याचप्रमाणे गणेश जयंती, गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी, विनायकी, व अंगारकीला सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते.
— सागर मालाडकर