
मुंबईच्या आद्य सात बेटांपैकी परळ हे एक मोठे बेट. या बेटावर कोळी आणि भंडारी समाजाची वस्ती होती. 1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे. सध्या ही मूर्ती आर्कीऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया- ASI यांनी प्राचीन संरक्षित वारसा म्हणून घोषित केल्यामुळे या मूर्तीचे दर्शन भाविकांना वर्षभर घेता येत नाही. नवरात्रात मात्र भाविक या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. परळ गावातील (परळ व्हिलेज ) बारादेवी नावाच्या एका अतिशय लहानशा मंदिरात ही मूर्ती आहे.
ही मूर्ती प्रसिद्ध जर्मन इंडोलॉजिस्ट सर हेन्रक झिमर यांनी शिवस्वरूप म्हणून अभ्यासली होती. काही पुरातत्त्व संशोधकांनी ही मूर्ती ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन घडवते असे मत व्यक्त केले. या मूर्तीचे निरीक्षण केले असता मध्यभागी असलेले प्रमुख शिल्प आणि बाजूने असलेली 11 उपशिल्पे असा पट पाहिला तर त्याचे साधर्म्य एलिफंटा केव्हज आणि गुजरातच्या शामलजी केव्हज यामधील शिवस्वरूपाशी साधर्म्य राखून आहे असे आढळते.
इतकी अत्यंतअत्यंत दुर्मिळ मूर्ती परळ गावामध्ये कशी, याचे उत्तर आपल्याला 1931 सालच्या इतिहासात सापडते. त्यावेळच्या परळ गावातील रहिवाशांनी त्यांना सापडलेली ही मूर्ती म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे असे मानले. त्यामुळे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मूर्ती हलविण्यास विरोध केला. इंग्रजांनी या मूर्तीला हातही लावू नये म्हणून देवीची पूजाअर्चा ताबडतोब सुरू केली. आणि म्हणून परळ गावामध्ये आज एका अतिशय साध्या देवळात आजही ती मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात या मूर्तीची एक रिप्लीका आहे. ती आपल्याला कायम बघता येते.
जर्मन पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेंद्रिच झिमर यांनी ही मूर्ती पाहिली त्यावेळेला त्यात ब्रम्हा विष्णू आणि महेश दर्शविले असावेत असा त्यांनी तर्क केला. या मूर्तीची पूजाअर्चा देवी स्वरूप म्हणून केली जात असली तरी ही खरे तर शिवमूर्ती आहे. आर्किऑलॉजीच्या भाषेत या मूर्तीला ” परेल शिवा ” किंवा “परेल रिलीफ” असे संबोधिले जाते.
नवरात्रीचे नऊ दिवस मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्राचीन शिल्पांची माहिती मी इथे पोस्ट करणार आहे. तो वारसा पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं मला खूप वाटतं आहे. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त share करावी अशी नम्र विनंती आहे.
Thank you Oriental Institute of ancient studies, Thane.
प्राच्यविद्या संशोधन मंडळ, ठाणे.
Ankur Kane सर.
– अलका सुहास जोशी
