नातं आणि मैत्री

नातं’ आणि ‘मैत्री’ दोनही दोन अक्षरी शब्द आहेत. बाराखडीतील एकही अक्षर आणि एकही मात्रा दोन्ही मध्ये सारखी नाहीत. पण तरीही हे दोनही शब्द खूप जवळचे आहेत. ह्या दोनही शब्दातील ‘नातेच’ खूप मजेशीर आहे. यांच्या अर्थाची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते की, त्याला काही सीमाच नाही हे समजतच नाही.



नातं’ आणि ‘मैत्री’ दोनही दोन अक्षरी शब्द आहेत. बाराखडीतील एकही अक्षर आणि एकही मात्रा दोन्ही मध्ये सारखी नाहीत. पण तरीही हे दोनही शब्द खूप जवळचे आहेत. ह्या दोनही शब्दातील ‘नातेच’ खूप मजेशीर आहे. यांच्या अर्थाची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते की, त्याला काही सीमाच नाही हे समजतच नाही. या दोन्ही मध्ये ‘उपकार’ आणि ‘कर्तव्य’ यांची आठवणही नसते.
‘नातं’ हे जन्माने निर्माण होते. ते रक्ताने जोडलेले असते तो एकमेकांवरचा नियतीने दिलेला हक्क असतो. आम्हाला हा नातलग हवा किंवा हा नको असे आम्ही म्हणूनच शकत नाही. ते जसे आहेत तसे त्यांच्या चांगल्या वाईट स्वभावासकट आम्ही नकळत मान्य केलेले असतात.
या उलट ‘मैत्री’ ही सहवासाने जमलेली असते. बऱ्याच अंशी एकमेकांची विचारधारा आवडी निवडी या जुळलेल्या असतात ती एक ‘वेवलेंग्थ’ (wavelength) जमलेली असते. तो एक ‘ऋणानुबंध’ असतो, मागच्या जन्माचे काही ‘धागेदोरे’ असतात, ते आम्हाला जवळ आणतात नाहीतर लाखो करोडो माणसांमधून आपली ठराविक माणसांशीच मैत्री का होत असेल?
पूर्वीच्या काळी कुटुंब मोठी असायची. बहीण भावंड खूप होती. एकत्र कुटुंब पध्दती होती. त्यामुळे त्यांना मित्र मैत्रीणींची फारशी उणीव भासत नसेल. मामा, मावशी, काका, काकी, आत्या, आजी, आजोबा सगळेच भरपूर होते. या नात्यांच्या गोतावळ्यात आपण जगातले सगळे व्यवहारही शिकत होतो. अगदी बहीण भावंडांच्या लहानपणाच्या भांडणात स्वतःला हवी असलेली वस्तू कशी मिळवायची याचेही शिक्षण मिळत होते. घरातला
कुठलाही चांगला, वाईट, लहान, मोठा प्रसंग सगळे मिळून निभावून नेत असत. त्यामुळे कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगी कुटुंबा बाहेरच्या माणसांची गरज किंवा मदत लागत नव्हती. कुठलीही गोष्ट ‘शेअर’ करण्यासाठी मित्र मैत्रिणींची गरजही नव्हती.
आजकालच्या दिवसात तर छोट्या कुटुंब पध्दतीमुळे एकच मुलगा किंवा एकच मुलगी या प्रकरणामुळे भाऊ बहीण, काका, मामा, मावशी, आत्या ही सगळी नातीच संपायला लागली आहेत. आईच्या भावाला ‘मामा’ म्हणतात आणि बाबांच्या बहिणीला ‘आत्या’ म्हणतात हे समजायला शाळेतील पुस्तकातल्या धड्यांची गरज पडेल. अशा जिवाभावाच्या नात्यांच्या कमतरतेमुळे माणसाच्या आयुष्यात एक ‘पोकळी’ निर्माण झाली आहे.
आयुष्य हे एक मोठे ‘चक्र’ आहे. निर्माण झालेल्या पोकळीशी त्याचा काहीही संबंध नसतो. ते आपल्या गतीप्रमाणे चालूच राहते. कधीतरी घरात लहान मुलांचे वाढदिवस असतात कोणाचे तरी लग्नकार्य असते, कधीतरी घरात दुखणी येतात कधीतरी कोणा जिवाभावाच्या माणसांचे या जगातून निघून जाणे हे चालूच असते. या सारख्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगी तुमच्याडे कितीही ऐश्वर्य असेल पैसा असला तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची गरज असते. त्या वेळेस नातेवाईक कमी असल्यामुळे किंवा असले तरी पोटापाण्याच्या व्यवसायामुळे देशी विदेशी लांब राहात असल्या कारणाने ‘मनुष्यबळाची’ खूप मोठी उणीव भासते.
सहाजिकच ही ‘पोकळी’ वेळ प्रसंगी उभे राहिलेल्या मित्र मैत्रिणींकडून भरून निघते आणि हे मैत्रीचे नाते दाट होते. ‘मैत्री’ हे पण एक नात्यासारखेच बंधन आहे. त्यातही प्रेम आहे. जिव्हाळा आहे. वेळोवेळी एकमेकांवर चिडणे, रुसणे सगळे आहे. पण या जगात जगण्याचा तो ‘आधार’ आहे. काहीही झाले तरी आपण एकटे नाही याचा तो एक विश्वास आहे.
आपल्या जीवनात अशा कितीतरी गोष्टी घडत असतात की त्या कोणाजवळ तरी ‘शेअर’ कराव्या असे आपल्याला वाटते. प्रत्येक गोष्ट तुम्ही आई वडिलांजवळ तर ‘शेअर’ करु शकत नाही त्यासाठी बरोबरचे भावंड किंवा अगदी जवळचा ‘मित्र’ हवासा वाटतो. आम्ही बायकांना तर नवरा बायकोत भांडण जरी झाले तरी मैत्रीणीकडे सांगायचे असते. त्यासाठी खूप विश्वासाच्या मैत्रीणीची गरज असते.
आजकाल तर मुले ही कुठे परदेशात असतात. काही नाही तरी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात त्यामुळे ‘आई वडिलांना ‘ सुध्दा समवयस्क मैत्रीची जरुरी निर्माण झाली आहे. असे समदुःखी एकत्र जमा झाले की त्यांच्या ‘मैत्रीचा ओलावा’ खूपच जास्त असतो आणि बऱ्याच वेळा ते पण एकमेकांच्या आधारावर आयुष्य जगताना बघायला मिळते.
‘मनुष्य’ एकटा जगूच शकत नाही. त्याला ‘नातेवाईक’ आणि ‘मित्र’ या दोघांच्याही सहवासाची जरुरी असते. ‘नातेवाईक’ हा कुटुंबाशी निगडीत असतो. नात कुटुंबाला महत्व द्यायला शिकवते. तर ‘मैत्री’ची परिभाषा नाही. तिला कुटुंब, जात, धर्म कसलेही बंधन नाही. ती आपल्याला ‘माणुसकी’ शिकवते. आपल्याला एकमेकांची गरज आहे अशा वेळेस ही दोन्ही नाती, आपण सगळे मिळून ही आयुष्याची नौका पार करु शकतो याचा विश्वास देतात.
महाभारतातल्या ‘कृष्ण-सुदामाच्या’ गोष्टीत ‘मैत्री’ असावी तर अशी, त्याच महाभारतात ‘कौरव-पांडवांच्या’ गोष्टीतून ‘नातं’ असे नसावे ही शिकवण असावी असे मला वाटते.
माणसांची काय गंमत असते कितीतरी वेळा आपण ऐकतो की भावा भावांचे नाते अगदी मित्रासारखे आहे किंवा बहिणी बहिणी अगदी मैत्रीणींसारख्या आहेत. बरेच वेळा हे पण ऐकतो की आम्ही मित्र आहोत पण आमचे नात्यासारखे संबंध आहेत. एकंदरीत ‘मैत्रीशी’ ‘नाते’ जुळले आणि ‘नात्याशी’ ‘मैत्री’ जुळली तर तो आयुष्यातील अनेक चांगल्या अनुभवातील एक ‘चांगला’ अनुभव असतो ( अशा काही गोष्टी प्राण्या पक्षांतही दिसून येतात. त्यांच्यात देखील ‘नात’ किंवा ‘मैत्री’ असावी. मी काही गोष्टी बघितल्या आहेत. एका पक्षाचे ‘पिलू’ घरट्यात होते आणि तो ‘पक्षी’ घरट्याबाहेर बहुतेक चारा आणण्यासाठी गेला होता. इतक्यात तिकडे एक मांजर आली आणि आजुबाजूच्या इतर पक्षांनी इतका आरडा ओरडा (किलबिलाट) केला की तो पक्षी तर परत आलाच, पण मांजरही पळून गेले.
दुसरी एक गोष्ट मी बघितली होती एका कुत्र्याची ‘पिल्ले’ खायला कोल्हा आला होता आणि त्या कुत्र्याने भुंकणे सुरु केल्यावर क्षणार्धात इतकी कुत्री आली की कोल्हा पण पळून गेला. बाकी तर गायींनी वासराला दूध पाजणे, मांजरीची पिले लपवणे हे तर आपण सामान्यपणे बघतच असतो. थोडक्यात माणसासारखीच प्राण्यापक्षांनाही सहवासाची जरूरी आहे. ते काय किंवा आपण काय सहवासाशिवाय या जगातील आपला प्रवास पूर्ण करु शकत नाही.
ह्या सगळ्यात ‘मनुष्य’ हा नशिबवान असावा की आम्हाला या ‘विश्वकर्त्याने’ ‘नातलग’ आणि ‘मित्र’ असे तगडे साथीदार दिले आहेत. आहोत ना आपण भाग्यवान? मला स्वतःला ‘मित्र’ आणि ‘ नातलग’ या दोघांचाही खूप चांगला सहकार मिळालेला आहे. ते माझ्या आयुष्यातले खूप चांगले क्षण आणि अनुभव आहेत.

Author