पाकिस्तान : माझी साहसयात्रा
Category:
लेखसंग्रहमी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो.
मला काही बेनझीर ओळखत नव्हत्या, ओळखणार तरी कशा ? पण भारतीय वृत्तपत्रातून तेही पुण्यातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. दरवाजावर असलेल्या दारवानाने माझी चौकशी केली. बेनजीर यांच्या सचिवाने त्याला ‘इंडिया’तून एक गेस्ट येणार आहेत हे सांगितलेले असल्याने त्याने मला आत सोडले. मी मागे वळून पाहतो तो रकिब पूनावाला मला अच्छा करत दरवाजात उभे होते. तासाभरात येतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या लाल रंगाच्या सुझुकी मोटरसायकलवर टांग टाकलीसुद्धा.