आग्यामव्हळाचा तडाखा अन वानरायचा भडका……!!!
Category:
कथा साहित्य - ललितसोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.
