स्मरणगाथा : ४ 

पुस्तक पर्यावरण विषयावरचं होतं .

पण गोष्टीवेल्हाळ भाषा , अवतीभवतीच्या खोडकर , शंकेखोर आणि एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या मुलांचे यथार्थ वास्तववादी चित्रण त्यातून उमलत जाणारी , औत्सुक्यपूर्ण कथा , मनोरंजनाबरोबर मुलांच्या पर्यावरणीय जाणिवांचा मांडलेला विचार आणि कुतूहल वाढवणारी आशयघन लेखनशैली !
मुलांना आकर्षित करणारं मुखपृष्ठ .



समजा ,
तुम्ही लेखक किंवा लेखिका आहात .
तुमचं पहिलंच पुस्तक चांगलं झालंय .
तुम्हाला मानधन मिळालंय .
आणि प्रकाशक सांगतोय की आणखी काही लेखन करा , आपण तुमची सगळी पुस्तकं प्रकाशित करू .

तर तुम्ही काय कराल ?

हातातली सगळी कामं दूर ठेवून लेखनकामाठी करायला लागाल की चक्क लेखनसंन्यास घ्याल ?

तेच तर सांगतोय ना …

सांगायलाच हवं सगळं …

बरोबर २९ वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं होतं .

पुस्तक बालवाङ्गमय प्रकारातील होतं . त्याचं शीर्षक होतं :
सहलीत सापडलेला खजिना
आणि लेखिका होत्या :
सौ . ऋचा श्रीकृष्ण जोशी

पुस्तक पर्यावरण विषयावरचं होतं .

पण गोष्टीवेल्हाळ भाषा , अवतीभवतीच्या खोडकर , शंकेखोर आणि एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या मुलांचे यथार्थ वास्तववादी चित्रण , त्यातून उमलत जाणारी , औत्सुक्यपूर्ण कथा , मनोरंजनाबरोबर मुलांच्या पर्यावरणीय जाणिवांचा मांडलेला विचार आणि कुतूहल वाढवणारी आशयघन लेखनशैली !
मुलांना आकर्षित करणारं मुखपृष्ठ .

एव्हढं सगळं असताना लेखिकेनं चक्क लेखनसंन्यास घेतला .

लेखनासाठी मागणी होती , पुस्तक चांगलं चाललं होतं , नव्या पुस्तकासाठी प्रकाशकानं आग्रह धरला होता .

पण लेखिकेने लेखनसंन्यास घेतला होता .
कारण ,
समाजकार्य म्हणून असणारी अल्प मानधनाची नोकरी सांभाळून तिला मुलांना घडवायचं होतं .
मुलांवर चांगले संस्कार करायचे होते .
आदर्श गृहिणीची कर्तव्ये पार पडायची होती .

आणि लेखक असणाऱ्या नवऱ्याच्या शब्दांना शीर्षरेषा म्हणून खंबीरपणे पाठबळ द्यायचं होतं.

डेमी साईज मधील सुमारे साडेपाच हजार छापील पृष्ठसंख्या होईल इतकं , नवऱ्याचं लेखन आपल्या मोत्यासारख्या सुंदर अक्षरात मुद्रणप्रत म्हणून लिहायचं होतं.

मानधनातील धन हा शब्द अनेक वेळेला हरवल्यानं येणाऱ्या नवऱ्याच्या वैफल्याला हसतमुखानं सावरायचं होतं .

लेखक असणाऱ्या नवऱ्याच्या पुरस्कार समारंभांना , सत्कार समारंभांना उपस्थित राहून कौतुकसोहळा अनुभवायचा होता .
हे सगळं अगदी सहजस्वभावानं , आनंदानं करायचं होतं .

‘स्व’ ला विसरून !

यामुळंच तर डॉ. श्रीकृष्ण जोशी ला स्वतःची ओळख अधिक ठळक करता आली .

त्या कृतज्ञतेपोटी स्मरणगाथेतील ही चार अक्षरं , सौ . ऋचासाठी !

तिच्या लेखनसंन्यासाची ही चित्तरकथा , अविस्मरणीय आणि प्रेरणादायी !!!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
८९५१९०६७०१
२७ जुलै २०२५
————-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही .

Author