मैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं , मी पहिल्यांदा , मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली .
मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं .
ते पत्र फार वेगळं होतं .
मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं .
त्या पत्रातील भाषेची नजाकत , मांडणी आणि व्यक्त होणाऱ्या भावना विलक्षण होत्या .
यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते पत्र चक्क संगमेश्वरी बोलीतील होतं .
मी पत्राची तारीख बघितली .
८ मार्च २००८.
हा दिवस महत्वाचा होता .
रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात माझ्या त्रिदल या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता .
खल्वायन या संस्थेने पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्याचा भव्य दिव्य प्रकाशन समारंभ घडवून आणला होता .संपूर्ण नाट्यगृह तुडुंब भरलं होतं . विख्यात ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार होतं .( या एकूणच समारंभाविषयी पुन्हा केव्हातरी लिहीन , कारण खूप संस्मरणीय समारंभ झाला होता .)
तर त्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे दार उघडले तर दाराला हे पत्र लटकावून ठेवलेले आढळले . मी सही बघितली .
गिरीश बोन्द्रे . माझे ज्येष्ठ सुहृद .
रात्री केव्हातरी ते दाराला पत्र लावून गेले होते .
आज ते पत्र खास आपल्यासाठी .
संगमेश्वरी बोलीची किमया आपल्याला दिसेल .
अनेकांना संगमेश्वरी बोली शिकवणारा हा अवलिया . सकाळ मधून निवृत्त झाल्यावर झाडामाडात रमलेला .
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
