गॅदरींग….
Category:
कथा साहित्य - ललितकॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.