“यावर्षी महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टी झाली. आपण नेहमीप्रमाणे हवामान बदलालाच दोष दिला. पण एके दिवशी स्वप्नात नारद मुनी भेटले आणि त्यांनी या अतिवृष्टीमागचं खरं कारण सांगितलं — जे पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हतं!” काय घडले ते जाणण्यासाठी थेट इंद्रच्या दरबारात जाऊ या:
इंद्रदेव(दाढी वाढलेल्या नारदांकडे पाहत): काय बातम्या आहेत जंबुद्वीपाच्या? ही दाढी अशी का वाढवलीस नारदा? त्या दाढीवाल्यांसारखी दाढी वाढवून तुला काही जंबुद्वीपाचं राज्य मिळणार नाही!
नारद (हसत): देवराज, थट्टा करू नका. आषाढ गेला, अर्धा श्रावणही संपत आला, पण भरतभूमीवर पावसाचा थेंबही नाही पडला. नद्या कोरड्या पडल्या आहेत, विहिरी आटल्या आहेत. पावसा अभावी पीक जळून खाक झालंय. अजून उशीर झाला, तर कोट्यवधी पशुपक्षी आणि माणसं तहानेने व्याकूळ होऊन मरतील. आता सांगा, जिथे प्यायला पाणी नाही, तिथे दाढी करायला कुठून मिळणार? अनेक दिवस झाले, आंघोळही केलेली नाही. अंगाला वास येऊ नये म्हणून फक्त फॉग मारून दरबारात आलोय. वरुणदेवांचे वादळचालक नेहमीप्रमाणे कामात दिरंगाई करत आहेत. एकदाच कठोर कारवाई करा त्यांच्यावर — नरकात धाडा त्यांना!
इंद्रदेव (चकीत होऊन): हे काय ऐकतोय मी, नारदा! यावेळी तर तुमच्या सल्ल्यानुसारच वरुणदेवांना मी आदेश दिला होता, सर्व वादळचालकांनी उन्हाळ्यातच भारतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी तरीही एवढी दिरंगाई? बोलवा रे, वरुणदेवांना!
(वरुणदेव दरबारात प्रवेश करतात)
इंद्रदेव (कडक आवाजात): वरुणदेवा, पावसाळा अर्धा संपला तरी तुम्ही भरतभूमीवर वादळांचे टँकर पाठवले नाहीत. काय प्रकार आहे हा?
वरुणदेव (नम्रपणे): महाराज, क्षमा असावी. अजून वादळी टँकर भारतात पाठवू शकलो नाही.
इंद्रदेव: पण का?
वरुणदेव: त्याला जबाबदार आहेत, नारद ऋषीच. मी नको म्हणत असतानाही त्यांच्या सल्ल्यानुसार वादळचालकांना भारतात पाठवलं. ते थेट इंद्रप्रस्थ नगरीतील एका भव्य, हिरव्या रम्य परिसरात वसलेल्या विद्यापीठात उतरले. तिथे त्यांची भेट झाली “आझादी गँग”शी. तिथे कट कारस्थान शिजले. मग काय स्वर्गात परत आल्यावर “हमें चाहिए काम से आज़ादी”, “हमारा शोषण बंद करो”, “नियम से काम करेंगे, ओवर टाईम नहीं करेंगे”, “जितना काम, उतना दाम” अशा घोषणा देत, लाल झेंडे घेऊन माझ्या महालाबाहेर ठिय्या दिला त्यांनी! मी कितीही समजावलं की स्वर्गात प्रत्येकाने आपलं कार्य लोक कल्याणासाठी करावं, पण कुणी ऐकायलाच तयार नाही.
इंद्रदेव: (थोडा वैतागून): मग मागण्या तरी काय आहेत त्यांच्या?
वरुणदेव: महाराज, ते म्हणतात, सोमरसाचा कोटा वाढवा. तो मिळाल्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीत. शिवाय, अजून एक मागणी आहे…
इंद्रदेव: थांबा वरुणदेवा, एकदाच सर्व सांगा, आणखी काय काय हवंय त्यांना?
वरुणदेव: ते म्हणतात, वादळवाडीत भारतातून आलेल्या बी-ग्रेड अप्सरांचं नृत्य होतं. त्यांच्या वाडीतही महिन्यातून एकदा तरी रंभा, उर्वशी यांचं खास नृत्य व्हावं, अशी मागणी आहे.
इंद्रदेव:(काही क्षण विचार करून, कपाळावर हात मारत): कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मी त्यांच्या मागण्या मान्य करतो. सोमरसाचा कोटा वाढवून तात्काळ वितरित करा आणि वादळचालकांना भरतभूमीवर पावसाचा बॅकलॉग पूर्ण करायचे आदेश द्या. मग रंभा-उर्वशीचं नृत्य ठेवू वादळवाडीत ठेऊ!
वादळचालकांच्या मागण्या पूर्ण होताच, त्यांनी सोमरसाच्या बाटल्या गटागट रिकाम्या केल्या आणि पावसाचा कोटा पूर्ण करण्यासाठी भरतभूमीवर पावसाचा मारा सुरू केला. नशेत झिंगलेल्या अवस्थेत कुठे किती पाऊस टाकतोय याचं भान त्यांना उरले नाही. त्यांना डोळ्यांसमोर दिसत होती फक्त नृत्य करणार्या रंभा आणि उर्वशी.
वादळचालकांच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात एकच हाहाकार माजला. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या नगरी पाण्यात बुडाल्या. शेती उध्वस्त झाली, गुरं-ढोर वाहून गेली. शेकडो लोक थेट स्वर्गात पोहोचले. पण वादळचालकांनी दोन महिन्यांचा बॅकलॉग आठवड्यातच पूर्ण केला आणि आता गेल्या वर्षाचा बॅकलॉगही पूर्ण करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत…..