(पूर्वप्रसिद्धी – ‘जनमंगल’ दिवाळी अंक २०२४)
लहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’.
पुण्यात श्री. प्रकाश आणि श्रीमती सुनंदा चव्हाण या दांपत्याच्या पोटी ४ जानेवारी १९७७ रोजी ‘नितीन’चा जन्म झाला. चमकदार डोळ्यांच्या नितीनला ‘स्मिता’ नावाची एक बहीणदेखील होती. या चव्हाण परिवारातील अनेक पिढ्यांनी सैन्यात सेवा दिली आहे. वडील प्रकाश हे देखील सैन्यात कार्यरत होते आणि त्यांनी काश्मीरसह भारतातील विविध भागांत आणि श्रीलंकेतही सेवा बजावली आहे. घरात एवढा मोठा सैनिकी वारसा असल्याने नितीनला लहानपणापासूनच सैन्याची आवड लागली. पुण्यामधील ‘सेंट जोसेफ’ शाळेत त्याने दहावीपर्यन्त शिक्षण घेतले. शिक्षणाबरोबरच खेळ आणि इतर उपक्रमांमध्येही त्याला रस असे. फुटबॉल आणि बॉक्सिंगमध्ये नैपुण्य असलेला नितीन चांगला धावपटू देखील होता. चांगल्या गुणांनी दहावी पास झाल्यावर पुण्याच्या विख्यात ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त त्याने प्रवेश घेतला.
एव्हाना सैन्याबद्दलची त्याची आवड आसक्ती आणि ध्येयवेडात रूपांतरीत झाली होती. वडिलांप्रमाणे ‘आर्मी मॅन’ होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो जिवापाड मेहनत घेऊ लागला. फर्ग्युसनमधून १९९४ साली बारावी झाल्यावर खडकवासला, पुणे येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ अर्थात ‘एन.डी.ए.’ (NDA) मध्ये त्याने सहज प्रवेश मिळवला. इथेही सैन्यात शौर्य गाजवण्याची आणि देशसेवा करण्याची उत्कट महत्त्वाकांक्षा त्याच्या धमन्यांमधून रक्तासारखी धावत असे. त्यामुळे आपल्या स्वप्नांचा डोळस पाठलाग करताना, कठोर परिश्रमांना बुद्धीची जोड देत त्याने तीन वर्षांचा खडतर अभ्यासक्रम लिलया पूर्ण केला. १९९७ साली तिथून उत्तीर्ण झाल्यावर डेहराडून येथील ‘इंडियन मिलिटरी अकादमी’ (IMA) मध्ये प्रवेश घेतला. तेथील एक वर्षाचे प्रशिक्षण जोमात पूर्ण केल्यावर १ जून १९९८ ला अवघ्या २१ व्या वर्षी तो ‘लेफ्टनंट’ झाला आणि त्याची स्वप्नपूर्ती झाली.
१३ जून १९९८ रोजी नितीनची भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या विभागांपैकी एक असलेल्या ‘कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स’ या रेजिमेंटच्या ‘११५ इंजिनीअर्स’ युनिट मध्ये नियुक्ती झाली. हे रेजिमेंट दोनशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या ‘बॉम्बे सॅपर्स’ किंवा ‘बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप’चा भाग आहे. निष्ठा, शिस्त आणि मेहनत, ही या रेजिमेंटची गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. या रेजिमेंटने भूतकाळात अतुलनीय शौर्य गाजवून अनेक पदके आणि आदर मिळवला आहे. भारतातच नव्हे तर परदेशात बर्मा, कॉंगो सारख्या ठिकाणीही या युनिटच्या सैनिकांनी पराक्रम गाजवला आहे. सुरवातीलाच अश्या ऐतिहासिक युनिटशी संलग्न होणे नितीनसाठी अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी ठरले. नितीनची पहिली असाईनमेंट संपल्यानंतर लगेच त्याला जम्मू-कश्मीर भागात तैनात करण्यात आले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्याला बर्याच आव्हानात्मक ऑपरेशन्समध्ये सहभाग घेता आला. या मोहिमांद्वारे त्याला खडतर लष्करी जीवनाची आणि विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याची संधी मिळाली. त्याची पोस्टिंग अश्या ठिकाणी होती जो दहशतवादाचा सर्वात मोठा बालेकिल्ला होता. कारगिल युद्धात सपाटून मार खाल्यावरही पाक-पुरस्कृत दहशतवाद, फुटीरतावाद शिगेला पोहोचला होता. तेथे दगडफेकीच्या घटना, अतिरेक्यांशी चकमकी आणि दहशतवादी कारवाया अगदी सर्रास घडत. एका वर्षातील या आव्हानात्मक परिस्थितीतील कार्यानुभावाने नितीनला अधिक कार्यक्षम, धाडसी व अनुभवसंपन्न बनवले.
एक वर्षाच्या यशस्वी कार्यकौशल्यामुळे नितीनला बढती मिळाली आणि तो ‘कॅप्टन नितीन’ झाला. पदोन्नती झाली पण त्याबरोबर मोठी जबाबदारीही आली. १९९९ मध्ये कॅप्टन नितीनची तुकडी जम्मू काश्मीरमधील ‘राजौरी सेक्टर’मध्ये तैनात करण्यात आली. हे फार जास्त दहशतवादी प्रभावित क्षेत्र होतं. इथे नितीनला कायम आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि त्याला अनेकदा आपल्या ‘फिल्ड क्राफ्ट’ कौशल्याचा वापर करण्याची संधी मिळाली. दहशतवादाला आळा घालण्यासाठी नितीनचा चमू सर्वतोपरी प्रयत्न करत असे. पण हा विभाग भारत-पाक सीमेजवळ आहे, दहशतवादी स्थानिक असल्याने त्यांना सर्व मुलुख माहीत असे आणि त्यांना स्थानिक फुटीरतावादी नेत्यांच्या पाठिंबा असे. या सर्वांमुळे दहशतवादी रोज काही ना काही कुरापती काढून मग सहज सीमा ओलांडून पळून जात असत. अशातच दहशतवाद्यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला एका जिमवर दोन मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये जिममधील लहान मुलांसह सहा निरपराध लोकांचा मृत्यू झाला.
या घटनेने सामान्य जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला. यामुळे अतिरेक्यांना त्वरित शासन करणे, सरकार आणि सैन्याला गरजेचे झाले. लष्कराने अधिक मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. १३ सप्टेंबर १९९९ रोजी नितीन त्यांच्या कार्यक्षेत्रात गस्ती पथकाचे नेतृत्व करत होता. दुपारी १.४५ च्या सुमारास नितीनच्या चमूने राजौरी सेक्टरमधील ‘माझियारी स्कूल’जवळ पाच व्यक्तींना संशयास्पदरित्या फिरताना पाहिले. नितीनने थोड्याच वेळात परिस्थितीचा आढावा घेतला आणि डावपेच आखून आपल्या तुकडीची दोन गटात विभागणी केली. अतिरेक्यांना पकडण्यासाठी नितीनच्या तुकडीने वेगाने हालचाली केल्या. अतिरेक्यांनाही जवान आपल्या मागे लागल्याचे समजले आणि ते पळून जाऊ लागले.
बराच पाठलाग केल्यानंतर नितीन आणि त्यांच्या जवानांना मक्याच्या शेतात दहशतवादी दिसले. नितीनने त्यांना शस्त्र टाकून शरण येण्याचे आवाहन केले. पण त्याला न जुमानता अतिरेक्यांनी त्यांच्यावर उलट गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक सुरू झाली जी तासभर चालली. तेवढ्यात नितीनला आपल्या जवानांवर गोळीबार करणारे दोन अतिरेकी दिसले आणि त्यांना लवकरात लवकर नामोहरम करण्याची तातडी जाणवली. कारण अतिरेकी आणखी काही अंतर पुढे गेले असते तर त्यांना लपायला चांगली जागा मिळाली असती आणि तिथून त्यांनी आपल्या जवानांवर हल्ला केला असता तर मोठी मनुष्यहानी झाली असती. त्यामुळे नितीन त्वरित हालचाल करत वेगाने पुढे सरसावला आणि झपाट्याने अतिरेक्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या या अनपेक्षित धाडसी कृतीने अतिरेकी हैराण झाले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या चकमकीत नितीन गंभीर जखमी झाला. नितीनच्या सैनिकांना मात्र दरम्यानच्या काळात प्रतिहल्ला करण्यासाठी वेळ आणि योग्य पवित्रा घेता आला. तसेच त्यांच्या मदतीला सैन्याची आणखी कुमक आली आणि त्यांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण या दरम्यान अंगभर झालेल्या जखमांमुळे आणि अनियंत्रित रक्तस्त्रावामुळे नितीनची मृत्यूशी झुंज अपुरी पडली आणि तो हुतात्मा झाला.
भारतीय लष्कराच्या त्याग आणि शौर्याच्या थोर परंपरेला जागत कॅप्टन नितीनने वीरमरण पत्करले. सर्व धोका समोर दिसत असूनही आघाडीवर राहून त्याने आपल्या तुकडीचे नेतृत्व केले आणि सहकाऱ्यांचे मनोबल वाढवत स्वत: शहीद झाला. सैन्याने त्याच्या या बलिदानाची दखल घेत मरणोत्तर त्याचा आणि परिवाराचा उचित गौरव केला. ‘एकच दिवस जगलं तरी सिंहासारखं जगावं’, असं त्याचे वडील ‘प्रकाश चव्हाण’ अभिमानाने म्हणतात तेव्हा आपण कृतज्ञतेने व आदराने नि:शब्द, नतमस्तक होतो. जेव्हा आपण अश्या वीर माता-पित्याना भेटतो तेव्हा फक्त नम्रतेने त्यांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेऊ शकतो. खरोखर दुसऱ्यांसाठी स्वत: त्याग करण्यासाठी अत्युच्च मनोबल आणि धाडस हवे.
“मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे | देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे ||”, ह्या शौर्यगीताला कृतीत उतरवत नितीनने अवघ्या २२ व्या वर्षी देशासाठी संपूर्ण समर्पण केले. मराठमोळ्या नितीनचे हौतात्म्य आणि शौर्य हे भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्याच्या बलिदानाला या वर्षी १३ सप्टेंबरला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देश व समाजासाठी प्राणार्पण करणाऱ्या नितीनसारख्या असंख्य वीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे आणि या दिवाळीत त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या घरी एक तरी दिपक उजळावा हीच प्रार्थना. जय हिंद!!
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
– गुरुप्रसाद दि पणदूरकर