माझ्या व्यवस्थापकीय जीवनातील अजून एक अनुभव. एके दिवशी माझ्या विभागातील एक अधिकारी, निलयशी गप्पा मारत असताना त्याने मला एक फार इंटरेस्टिंग आणि मस्त प्रश्न विचारला. असा प्रश्न बहुतेक व्यवस्थापकांना कधीनाकधी पडतोच. तो प्रश्न असा “कनिष्ट अधिकाऱ्यांना बहुतेक वेळा एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्यायला फार त्रास का होतो? त्यांच्या मते तर त्यांचा विचार सरळ सोपा आणि बहुतेक वेळा कंपनीच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना एकतर हवे तसे यश येत नाही किंवा ते प्रयत्न पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. हा अनुभव खूप वेळा खरोखरच हताश करणारा असतो.”
थोडा विचार करून मी निलयला म्हणालो की मला सुद्धा मी तरुण असताना असा अनुभव खूप वेळा आला आहे. आता तू विचारतोच आहेस तर मला असाच एक प्रसंग आठवतो आहे. प्रथमच एका विभागाचा प्रमुख [manager] झाल्यावर, उद्दिष्टे योग्य वेळात आणि प्रमाणात पूर्ण करण्यासाठी मला अजून दोन कनिष्ट अधिकाऱ्यांची गरज वाटत होती. माझ्या मते तसे झाल्यास आमच्या विभागाची कामगिरी नक्कीच सुधारली असती.
नियमाप्रमाणे मी त्यासाठी आमच्या मनुष्यबळ विभागाकडे अर्ज पाठवला. पण त्यावर काहीच प्रतिसाद आला नाही. माझ्या मनात अशी कुशंका डोकावू लागली की आमचे वरिष्ठ अधिकारी खरोखरच कंपनीच्या ध्येयांकडे आणि कामगिरीकडे गंभीरपणे बघत आहेत की नाहीत. ह्या प्रवृत्तीचे मला थोडे आश्चर्य ही वाटले.
मी जेव्हा वाट बघून कंटाळलो तेव्हा ही माझी मागणी धसास लावण्यासाठी मी माझ्या वरिष्ठांची भेट मागितली. आमच्या कामात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे होणारा कामावरील परिणाम ह्याबद्दलची माहिती संकलित करून मी माझ्या भेटीची पूर्व तयारी केली होती. ह्या सर्व तयारीमुळे मला तरी असे वाटत होते की माझी ही दोन ज्यादा अधिकाऱ्यांसाठी असलेली निकड नक्कीच पूर्ण केली जाईल.
प्रत्यक्ष भेटीस गेल्यावर मी माझ्या मागणीचा पुनरुच्चार करून त्यासाठी लागणारी माहितीही पुरवली. जरा हसतहसत माझ्या वरिष्ठाने मला विचारले “राम, कंपनीच्या मनुष्यबळ ठरविण्याच्या प्रक्रियेची आणि मुल्यांची तुला पूर्ण समज आली आहे का?” त्यावर मी स्तंभित होऊन विचार करू लागलो की माझ्या साध्यासुध्या मागणीचा आणि कंपनीच्या मुल्यांचा काय संबंध असावा.
कदाचित माझ्या वरिष्ठांना त्यादिवशी थोडा मोकळा वेळ असावा. माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्यांनी मला सांगितले, “राम, तुझी मागणी बरोबर आहे. परंतु त्याच बरोबर एखादा नवीन माणूस नेमण्याआधी आम्हाला शंभर वेळा विचार करावा लागतो.
तुझ्या मागणीच्या मागील कारणे, ज्यान्वये तुझे काम सोपे होईल आणि तुझ्या विभागाची कामगिरी सुधारेल ती कारणे तू उधृद केली आहेस. त्यापलीकडे जाऊन, तू मागितलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा कंपनीला पडणाऱ्या दर महिना एकूण खर्चाचा तू विचार केला आहेस का, का फक्त तुला दिसणाऱ्या फायद्यांचाच विचार केला आहेस? तसेच ह्या निर्णयामुळे भविष्यात नवीन घेतलेल्या माणसांच्या वाढत जाणाऱ्या खर्चाचा पण विचार केला आहेस का? तुला माहीतच आहे की आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण आदर करतो तसेच आपल्या कंपनीच्या धोरणाप्रमाणे [पॉलीसीप्रमाणे] कोणत्याही कर्मचाऱ्याला आपण कामावरून कमी करत नाही.
नवीन कर्मचाऱ्यांना दरवर्षी पगारवाढ द्यावी लागते, त्यांच्या प्रशिक्षणावर पण खर्च करावा लागतो शिवाय योग्यवेळी त्यांची बढतीची अपेक्षा पण पूर्ण करावी लागते. ह्याचाच अर्थ असा की एक नवीन कर्मचारी नेमला की फक्त आत्ताचा विचार न करता कंपनीला भविष्यात कित्येक लाख रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. कदाचित तुझी नवीन कर्मचाऱ्यांची गरज काही दिवसांनी नाहीशी होऊ शकते पण त्यानंतर हे खर्च मात्र वर्षानुवर्ष चालूच रहातील.”
माझ्या डोक्यात विचार शृंखला चालू झालेली पाहून ते पुढे म्हणाले “राम, मला असे दिसते की तू सध्यातरी तुझ्या समोर आत्ता असलेल्या समस्या आणि त्यांचे निराकरण ह्यांचाच विचार करतो आहेस. वरिष्ठांना मात्र सतत ह्या समस्यांचाच नव्हे तर भविष्याचा आणि कंपनीच्या फायद्याचा सर्वांगिण विचार करावा लागतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे कनिष्ठ कर्मचारी हे फक्त समोर असलेल्या वस्तूंचा आणि प्रक्रियांचा विचार करत असतात तर वरिष्ठांना मात्र सतत त्यामागे लागणाऱ्या दूरगामी खर्चाचा विचार करावा लागतो. तू कदाचित ह्या नवीन दोन माणसांचा महिन्याच्या पगाराचा विचार करत असशील तर आम्हाला मात्र भविष्यकाळात ह्या दोन माणसांसाठी लागणाऱ्या कित्येक लाख रुपये खर्चाचा विचार करावा लागतो.”
एव्हाना माझे डोळे पूर्ण उघडले होते आणि नवीन मिळालेल्या ज्ञानामुळे माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटले. साहेब पुढे म्हणाले,”राम तुला असे वाटत असेल की हे सर्व ठीक आहे, पण माझी समस्या तर अजून तशीच आहे. हो, हेही खरे आहे की आपण सर्व बाजूंचा विचार केल्यावर काही वेळा आपल्याला नवीन कर्मचारी ही घ्यावे लागतात.
तसे पाहिले तर नवीन कर्मचारी घेणे हे फार सोपे असते, पण नक्कीच दरवेळी ते आवश्यक नसते. मी असे सुचवतो की तुझ्या विभागातल्या काही अनावश्यक कृती कमी करता येतील का ते बघ आणि शिवाय तुझ्या टीममधील लोकांच्या कामाची जरा वेगळी विभागणी करून आणि काही कामे एकत्र करून तुझी ही नवीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता जाते आहे का ते पण बघ. काही कनिष्ठ कर्मचारी तर जास्त जबाबदारी अंगावर घेण्यास खुशीने तयार असतात. बघ प्रयत्न करून नाहीतर मी आहेच येथे मदतीला.”
पुढे साहेब म्हणाले,” तुझ्यापण हे सुद्धा लक्षात आले असेल की कोठलेही नवीन मशीन घेण्यापूर्वी आपण असेच विचार मंथन करतो. एखाद्या असलेल्या मशीनची उत्पादन क्षमता ८०% पेक्षा जास्त वापरात येत असल्याशिवाय आपण जास्तीच्या मशीनवर खर्च करण्याचा विचारही करत नाही. काही वेळा तांत्रिक दृष्ट्या गरजेमुळे एखादे नवीन मशीन घ्यावे लागले तर ती गोष्ट वेगळी.
कंपनीतील प्रत्येक माणूस, वस्तू आणि प्रक्रिया यांचे मागे काहीनाकाही खर्च असतो. माणूस, वस्तू आणि प्रक्रिया हे पैशांचे दृश्य रूप असते. म्हणूनच पैशांचीही भाषा समजणे हे सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचे असते.”
निलय, तुला पण आश्चर्य वाटेल की माझ्या सर्व सहकाऱ्यांशी स्पष्टपणे चर्चा केल्यावर आणि त्यांची सहमती घेतल्यावर आम्हाला खरोखरच जास्तीच्या कर्मचाऱ्यांची गरज राहिली नाही. मी आणि माझे विभागीय सहकारी ह्यांना जन्मभर लक्षात राहील अशी वस्तू आणि पैसे ह्यांच्या भाषेबद्दल शिकवण मिळाली होती. निलयच्या चेहेऱ्यावर शंका समाधानाचा आनंद मला स्पष्ट दिसला होता.
******
एकत्र येणे ही सुरुवात असते, एकत्र राहणे महत्वाचे असते आणि एकत्रपणे काम केल्यानेच यश मिळते.