सुलोचना दीदी अभिवादन

पडद्यावरचीच ओळख असलेल्या दीदींना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली ती 1988च्या सुमारास. तेव्हा आम्ही कलासरगम तर्फे ‘वसंतबहार’ या कार्यक्रमाची आखणी करीत होतो. तीन वसंतांपैकी स्व.वसंत प्रभूंचा सगळा तपशील जनकवी पी. सावळाराम आणि प्रभू कुटुंबीय यांच्याकडून थेट उपलब्ध होता.



पडद्यावरचीच ओळख असलेल्या दीदींना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली ती 1988च्या सुमारास. तेव्हा आम्ही कलासरगम तर्फे ‘वसंतबहार’ या कार्यक्रमाची आखणी करीत होतो. तीन वसंतांपैकी स्व.वसंत प्रभूंचा सगळा तपशील जनकवी पी. सावळाराम आणि प्रभू कुटुंबीय यांच्याकडून थेट उपलब्ध होता. स्व. वसंत देसाई यांच्या विषयी सांगणारे अनेक जण होते. मात्र, सुलोचनादीदींमुळे, अवलिया स्व.वसंत पवार समजले.

मात्र दीदींनी ‘वसंतबहार’ कार्यक्रम पाहण्याचा योग खूप उशिराने, म्हणजे थेट शतकमहोत्सवाला आला. दरम्यान डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा स्मृतिदिन घाणेकर परिवार आणि हितचिंतक दरवर्षी उत्साहाने साजरा करत. त्या सोहळ्याच्या निवेदन सूत्रसंचालनाची जबाबदारी दीदी, कांचनताईंनी कधीतरी मला दिली आणि पुढे सात-आठ वेळा तरी मी त्या कार्यक्रमाचा भाग झालो. दीदींच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या विशेष कार्यक्रमात निवेदनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. या साऱ्या कारणांमुळे दीदींचा काही सहवास लाभला, हे मी माझं भाग्य समजतो. दीदींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यानिमित्त प्रभाकर पेंढारकर, रमेश/सीमा देव, श्रीकांत मोघे, राजदत्त, अजय सरपोतदार, आशा काळे, महेश कोठारे अशा अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर आधारित चित्रफित पाहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया.