“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.
मी स्वतः एक संसारी माणूस आहे. विज्ञान आणि बुद्धीप्रमाण्य वादावर बऱ्यापैकी विश्वास आहे. सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहे. मंदिरांचे खेटे, नवस, उपासतपास, भविष्य, बाबा, खडे/माळा, धार्मिक कर्मकांडे, वास्तुशास्त्र यांच्या फंदात जराही पडलो नाही.
अशाच कृती ठरविल्या की ज्या पूर्णपणे सामान्य माणसाच्या कह्यात असतात. मी तो मार्ग शोधला, त्याप्रमाणे निश्चयपूर्वक आचरण केले आणि करीत आहे आणि त्याचे फायदेही अनुभवत आहे. तोच मार्ग आज तुमच्याबरोबर व्यक्त [शेयर] करू इच्छितो. कोणा वाचकाला अशा आचरणातून फायदा झाला तर चांगले वाटेल.
बराच विचार करता असे लक्षात आले की मुख्यत्वे करून तणाव निर्माण करणारी कारणे फारच कमी आहेत, ती अशी – स्वतःच्या तब्बेतीच्या तक्रारी आणि व्याधीमुळे वाटणाऱ्या चिंता मनावर दुष्परिणाम करणारे नकारात्मक विचार [ निराशा, लोभ, मत्सर, क्रोध, हतबलता इ. दुसऱ्या माणसांचे बोलणे अथवा वागणे आपल्या इच्छेप्रमाणे नसल्यामुळे होणारी उद्विग्नता स्वतःबद्दलच्या दुराभिमानामुळे दुसऱ्याकडून काहीही न शिकण्याची वृत्ती शक्य असतांनाही कायद्याचे / नियमांचे पालन न करणे काही हट्टी लोक तर तणाव आहे हे पण मान्यच करीत नाहीत. तर काही लोक त्या तणावावर झोपेच्या गोळ्या अथवा दारू असे वरवरचे उपाय करत आपलेच नुकसान करून घेतात.
मला पटलेला आणि मी अवसरत असलेला मार्ग –
आनंदी, उत्साही, निरोगी आणि परिपूर्ण जीवनासाठी, मी असे जगणार आहे –
- दररोज निश्चयपूर्वक ध्यान व सुयोग्य व्यायाम करेन
- विचार व बोलणे सकारात्मक ठेवेन
- कोणालाही हेतुपुरस्सर दुखः अथवा त्रास देणार नाही
- गरजू व वंचित व्यक्तींना माझ्या क्षमतेनुसार जाणीवपूर्वक मदत करेन
- मागितल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय, कोणालाही सल्ला / उपदेश देणार नाही
- इतर लोकांच्या विश्वास आणि श्रद्धांचा पूर्ण आदर करेन.
- इतर लोकांच्या हक्कांचा आदर करेन आणि माझ्या हक्कांचे संरक्षण करेन
- स्वतःहून कुठल्याही कायद्याचे वा नियमांचे उल्लंघन करणार नाही
आता थोडे विस्ताराने पाहू.
- योग्य ध्यान आणि व्यायाम केल्याने फायदा झाला नाही असे कधीही होत नाही. कुठलीही फालतू सबब न दाखविता, धीर आणि चिकाटी ठेवल्यास २ ते ३ महिन्यानंतर फायदे दिसू लागल्यावर स्वतःला रोज ढकलावे लागत नाही. काही काळानंतर तर ध्यान / व्यायाम केले नाही तर चुकल्यासारखे वाटते. वेळेचा यासारखा दुसरा सदुपयोग नाही. उत्साह वाढतो. आत्मविश्वास प्रबळ होतो.
- टीव्ही आणि वृत्तपत्रातील नकारात्मक गोष्टी कमी बघणे व वाचणे. या गोष्टींचे व्यसन जेव्हढे कमी करू तेव्हढे उत्तम. मोबाईल फोनचे खूप चांगले उपयोग आहेत त्यासाठी त्याचा अवश्य उपयोग करावा.. पण त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसलेले संदेश पहात बसणे आणि पुढे पाठवविणे याचे व्यसन कधी लागते हे सहसा कळत नाही. स्वखर्चाने, स्वतःचा वेळ घालवून स्वतःचे मन कलुषित करण्याचा यासारखा दुसरा उद्योग नाही.
व्यसनावर नियंत्रण आणणे नेहमीच अवघड असते पण शक्यही असते. जागरूकपणे विचार करून आचरण सुधारणे शक्य असते. आधी थोडे अवघड वाटते पण हळूहळू आपण आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो याचा अभिमान वाटू लागतो. सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींपासून शक्यतो दूर राहणे.
- दुसऱ्या व्यक्तीस हेतुपुरस्सर दुखः अथवा त्रास देणे हे दुधारी शस्त्रासारखे आहे. आपल्याही मनावर त्याचा तितकाच वाईट परिणाम होत असतो. आपण कितीही नाही म्हंटले तरी.
- आपल्या क्षमतेप्रमाणे गरजू व वंचित व्यक्तींना जाणीवपूर्वक जास्तीतजास्त मदत केल्याने मिळणारे अवर्णनीय आत्मिक सुख व समाधान हे फक्त अनुभवातूनच समजू शकते. यातून मिळणाऱ्या सकारात्मक उर्जेचे परिणाम तणावमुक्त होण्यास अत्यंत उपयुक्त होतात.
- वाढत्या वयाबरोबर माणसाला आपण जास्त शहाणे झालो आणि आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त असल्यासारखे वाटू लागते. प्रत्यक्षात कुणालाही फुकटचा सल्ला आवडत नाही. उपदेश करणारा नकळत दुसऱ्याच्या विचारक्षमतेला कमी लेखत असतो. विचारलेला नसतांना केलेला सल्ला / उपदेश हा लोकांना आपल्यापासून दूर करतो. गैरसमज निर्माण होतात. सल्ला मानला गेला नाही तर आपल्याला दुःख होते ते वेगळेच. वरिष्ठ नागरिकांच्या उद्वेगाचे हे एक प्रमुख कारण असते. हा मुद्दा अवघड आहे पण प्रयत्नाने जमतो
- प्रत्येक माणसाचे श्रद्धास्थान वेगळे असू शकते. आपले विश्वास दुसऱ्यावर कधीही लादू नयेत. आपल्याला पटत नसल्या तरी दुसऱ्यांच्या श्रद्धांची चेष्टा कधीही करू नये. माणसे दुरावतात आणि आपले तणाव वाढतात.
- आपल्या मनाप्रमाणे वागणे हा आपला हक्क आहे. नम्रपणा जराही न सोडता, कुठल्याही आग्रहाला बळी पडू नये. मग ते खाणे, भेटणे, जागणे असे काहीही असो. सुरुवातीला लोकांचे टोमणे ऐकायला लागतात पण नंतर तेच लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतात कारण तुम्हाला जे जमते ते त्याना जमत नसते.
- कायद्याचे अथवा नियमांचे उल्लंघन केल्याने दरवेळी बाह्य जगाकडून त्रास होईलच असे नाही. पण त्याचे धक्के अंतरात्म्याला नकळत बसत असतात. तुम्ही जगाला कितीही फसविले तरी स्वतःला फसवू शकत नाही. स्वच्छ मन ही शांत झोपेची सर्वात उत्तम किल्ली आहे. दुसऱ्या माणसाने तुमच्यावर कायद्याचे उल्लंघन लादले आणि हतबलतेतून तुम्हाला कायदा उल्लंघावा लागला अथवा तुमच्याकडून अजाणतेतून कायदा उल्लंघिला गेला तर स्वतःला दोष देवू नका. अशा परिस्थितीतसुद्धा तुमचे मन स्वच्छ राहू शकते.
वरील पैकी प्रत्येक मुद्दा पूर्णपणे आपल्या कह्यात असतो. सुरुवातीला काही मुद्दे व्यवहार्य वाटत नाहीत पण शांतपणे विचार केला तर त्याचे कारण आपल्याच मनात असते. आपणच पळवाटा शोधीत असतो. चुकीच्या समजुतींमुळे आपण चुकीची उदाहरणे पुढे करून आपल्या चुकीच्या वर्तनाची भलावण करतो. परंतू तणाव यायचा तो येतोच. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! काय बरोबर आणि काय चूक हे सांगणारे होकायंत्र प्रत्येकाच्या अंतर्मनात असतेच असते.
सुरुवातीपासून वरील सर्व गोष्टी सतत शक्य होतील अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. काही अपवाद वगळता, आपण काही महापुरुष नाही. सातत्त्याने हळूहळू प्रमाण वाढत जाते. जसजसा आत्मविश्वास वाढत जातो तसतसे तणाव कमी होत जातात. मी स्वानुभवातून खात्रीलायकपणे सांगू शकतो की वरील मार्ग निश्चितपणे आपले जीवन खूप प्रमाणात तणावमुक्त, आनंद आणि आरोग्यपूर्ण बनवू शकतो. चालून तर बघा या मार्गावरून. खूप मजा येते.
******
तुमच्या आसपासचे लोक जर आनंदित नसतील तर तुम्ही स्वतः पूर्णपणे कधीच निख्खळ आनंदी असू शकत नाही.
कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.