संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर – जीवन चरित्र

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत. त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं.



काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत.

त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं. त्यांची सोंगाड्या ही भूमिका, त्यांच्या वगनाट्यातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या भूमिका, कर्णमधुर गाणी आणि संगीत महाडिक साहेबांनी अजरामर केली. ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत जसे राजेश खन्ना व अमिताभ बच्चन सुपरस्टार होते. त्याच पद्धतीने तमाशा क्षेत्रात मास्टर दत्ता महाडिक हे सुपरस्टार होते.

महाडिक साहेबांचा जन्म 4 ऑक्टोबर 1928 रोजी उरुळी कांचन येथे झाला. त्यांच्या आई मुक्ताबाई या धुण्या भांड्यांचे काम करत असत. परंतु लवकरच दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस महाडिक अवघे पंधरा वर्षाचे होते.

दत्ता महाडिक यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आर्यभूषण थिएटर’मध्ये काम केले. त्यावेळी ‘गंगाराम सातारकर संगीत बारी’ चे प्रयोग आर्यभूषणमध्ये सुरू होते.

इतर कामं करता करता हळूहळू दत्ता गाणं कान देऊन ऐकू लागला. गंगाराम सातारकरांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी छोट्या दत्ताला कोरससाठी पाठीमागे उभे केले. कोरससाठी उभं राहिलं की दत्ता संगीत वाद्य न्याहाळत असे. दत्ता हळूहळू कडं हातात घेऊन वाजवू लागला, मग मात्र गंगाराम सातारकरांनी दत्ताला संगीताचे प्राथमिक धडे दिले.

परंतु त्यावेळेस मराठी चित्रपट सृष्टी नावारूपाला आल्यामुळे संगीतबाऱ्यांचे महत्त्व कमी झाले.

त्यानंतर मग सन 1945 साली दत्ता महाडिक यांनी दत्ता ओवेकर सह जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशा प्रवेश केला. परंतु पाच सात वर्षातच हा तमाशा बंद पडला.

त्यानंतर महाडिक साहेब हे माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदणेकर यांच्या तमाशा मंडळात दाखल झाले. त्यावेळी तेथे चंद्रकांत ढवळपुरीकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, हे दिग्गज कलाकार काम करत होते. त्यांच्यामध्ये दत्ता महाडिक यांनी सोंगाड्या हे पात्र आजारावर केले. त्यांना गाण्याचा छंद असल्यामुळे संगीताच्या बाबतीत सुद्धा तमाशा त्यांच्यामुळे प्रगल्भ झाला.

त्याच सुमारास सन 1952 मध्ये वडझीरे येथील एक तमाशा कलावंत रामचंद्र अटक यांच्या ‘राधाबाई’ या मुलीशी दत्ता महाडिक यांचा १९५२ साली मंगरूळ पारगाव येथे विवाह झाला.

सन 1962 मध्ये माधवराव नगरकर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे दत्ता महाडिक व चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी नव्यानेच निर्माण झालेल्या मास्टर तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मध्ये प्रवेश केला. तेथे त्या दोघांनी दोन वर्ष काम के

परंतु चंद्रकांत ढवळपुरीकर यांना स्वतःचा तमाशा फड काढायचा होता. त्यासाठी त्यांनी दत्ता महाडिक यांना घेऊन मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव पडवळ हा तमाशा फड काढला. परंतु एक वर्षभरातच त्यांना हा फड बंद करावा लागला.
त्यानंतर सन 1965 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक यांच्यासह नवीन तमाशा फड सुरू केला. आणि याचेच नाव मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर.

या तमाशामध्ये मात्तबर व दिग्गज अभिनेते ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक, विष्णू चासकर, फकीर भाई केसनंदकर, गेनभाऊ आंबेठाणकर असे एकाचढ एक कलाकार तयार केले.

त्यांचे संत ज्ञानेश्वर माझी माऊली, संत तुकाराम, गवळ्याच्या रंभा, सुडाने पेटली लावणी, अशी अनेक वगनाट्य उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे दत्ता महाडिक यांचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भक्त पुंडलिक, सुडाने पेटली लावणी, गुंडानं हेरलं पाखरू, भिल्लांची टोळी, रक्तात भिजला बांगला, महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्या मधील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी सुद्धा या सर्व वगनाट्य मध्ये खलनायकांच्या भूमिका तितक्याच ताकदीने रंगपटावर सादर केल्या. चंद्रकांत ढवळपुरीकर हे वगसम्राट होते.

ज्यावेळी ते संत तुकाराम हे पात्र साकारत होते. त्या काळात त्यांनी मद्यपान किंवा नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज केले होते. त्यावेळी प्रत्येक कलाकार स्टेजवर चढताना दत्ता महाडिक यांच्या पाया पडून मगच स्टेजवर जात असे.

चंद्रकांत ढवळपुरीकर हे फक्त तिसरी इयत्ता शिकून देखील त्यांचा गणित विषय हा पक्का होता. त्यावेळी तमाशाचा लाख, लाख रुपयांचा हिशोब ते चुटकी सरसा करीत असत. तमाशाचा सारा हिशोब ते बघत असत. अत्यंत काटकसरीने आणि नेटक्या नियोजनामुळे त्यांचा तमाशा नेहमीच फायद्यात असे. त्यावेळेस तमाशाचे संपूर्ण आर्थिक नियोजन, व सर्व हिशोब चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याकडे असे. त्यामध्ये दत्ता महाडिक यांनी कधीच लक्ष घातले नाही.

ते हिशोबाच्या वेळेस दत्ता महाडिक यांना महाडिक साहेब अशी हाक मारत. व ढवळपुरीकर महाडिक साहेबांना हिशोब सांगत. परंतु महाडिक साहेबांचे या हिशोबाकडे अजिबात लक्ष नसायचे. त्यांचे लक्ष वगनाट्याची रिहर्सल चाललेल्या कलाकारांवर असायचे. ते म्हणायचे, ढवळपुरीकर तुम्ही हिशोब करा. मला त्यामध्ये रस नाही. मी कलाकारांकडून रिहर्सल करून घेतो. असे म्हणून ते तेथून निघून जात असत. इतका विश्वास त्यांचा ढवळपुरीकर यांच्यावर होता. दत्ता महाडिक यांना साहेब ही पदवी चंद्रकांत ढवळपुरीकर यांनीच दिली होती.

परंतु पुढे सन 1982 मध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले आणि त्यांची ही जोडी फुटली.

दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर हे दोघेही १९७०–८० च्या काळात तमाशा क्षेत्रातील खूपच लोकप्रिय आणि प्रयोगशील कलाकार होते. त्यांची जोडी काही काळ उत्कृष्ट रंगभूमीवर गाजली. मात्र सन १९८२ मध्ये या दोघांचा फड (तमाशा मंडळ) वेगळा झाला.

यामागची कारणे प्रामुख्याने खालीलप्रमाणे सांगितली जातात :

कलात्मक मतभेद:

दोघांचेही कलाविष्कार दमदार होते, पण तमाशाच्या मांडणीबाबत, विषय निवडीबाबत आणि प्रेक्षकांना काय द्यावे याबाबत त्यांच्या दृष्टीकोनात मतभेद वाढू लागले.

महाडिक साहेबांना त्या तमाशामध्ये जास्तीत जास्त संगीताला प्राधान्य द्यायचे होते. व तमाशाचा एक वेगळाच बाज निर्माण करायचा होता. परंतु वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांना मात्र हे मान्य नव्हते. ते त्यांच्या पारंपारिक जुन्या वळणावर ठाम होते. त्यामुळेही त्यांच्यात मतभेद निर्माण झाले.

व्यवस्थापन व आर्थिक कारणे:

तमाशा हा मोठा फड चालविण्याचा उद्योग असल्यामुळे त्यात मोठा आर्थिक खर्च असतो. आर्थिक व्यवस्थापनात व उत्पन्नाच्या वाटणीमध्ये तणाव निर्माण झाला.

नाव व लोकप्रियतेतील स्पर्धा:

तमाशा फडामध्ये कोण आघाडीवर आहे, कोणाचा आवाज व अभिनय प्रेक्षकांना जास्त भावतो, याबाबत दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्येच स्पर्धा वाढली. त्यामुळे फड दोन गटांत विभागला गेला.

स्वतःचा ठसा उमटवण्याची जिद्द:

दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर या दोघांनाही स्वतंत्रपणे कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवायची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र फड स्थापन करून आपापला मार्ग निवडला.

दत्ता महाडिक पुणेकर : स्वतंत्र फडानंतरची कारकीर्द

सन १९८२ मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर दत्ता महाडिकांनी स्वतःचा स्वतंत्र फड उभारला.

लोकनाट्य शैलीला नवे स्वरूप दिले:

पारंपरिक तमाशामधील वगनाट्ये, लावण्या, संवाद या गोष्टी अधिक नाट्यमय आणि सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या पद्धतीने त्यांनी सादर केल्या.

सामाजिक विषयांचा आग्रह:

त्यांच्या फडात केवळ मनोरंजन न होता शिक्षण, व्यसनमुक्ती, स्त्री-सशक्तीकरण, अन्यायाविरोधी भूमिका यासारखे सामाजिक संदेश देणारे प्रयोग रंगले.

संगीतात प्रगल्भता:

गंधर्व-परंपरेचा प्रभाव असलेल्या त्यांच्या गायकीने तमाशाला दर्जा दिला. त्यामुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबरच शहरी रसिकांचाही मोठा ओढा त्यांच्या फडकडे राहिला.

पुरस्कार व गौरव:

त्यांच्या या योगदानामुळे त्यांना अनेक सांस्कृतिक पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे, सन १९९२ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते “संगीतरत्न” हा बहुमान मिळाला.

चंद्रकांत ढवळपुरीकर : स्वतंत्र प्रयोग:

दुसरीकडे, ढवळपुरीकर यांनीही स्वतंत्र फड काढून काही वेगळे प्रयोग केले.

शुद्ध तमाशा परंपरेवर भर:

ते अधिक पारंपरिक तमाशा पद्धतीवर ठाम राहिले. जास्त सामाजिक सुधारणा न आणता त्यांनी लावणी-गाणी व पारंपरिक रंगतदार वगनाट्ये जपली.

अभिनय आणि संवादांची ताकद:

त्यांचा आवाज आणि संवादफेक खूपच लोकप्रिय होती. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे फडही तुफान गाजत राहिले.

प्रेक्षकांची निष्ठा:

काही प्रेक्षक महाडिकांचे सामाजिक भान असलेले प्रयोग पाहत, तर काही ढवळपुरीकरांची परंपरा व रंगतदार विनोद यांचा आनंद घेत अशा प्रकारे दोन्ही फडांना स्वतंत्र चाहतावर्ग मिळाला.

नवीन पर्वाची सुरुवात:

सन 1982 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक यांच्यामध्ये विकृष्ट आले. आणि ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक यांना तमाशा फडातून बाजूला केले. त्यावेळी दत्ता महाडिक यांच्याकडे काही कलाकार सोडले तर काहीच नव्हते.

त्यावेळी काही हितचिंतकाच्या मदतीने दत्ता महाडिक यांनी गुलाबराव बोरगावकर यांच्याबरोबर स्वतंत्र्य तमाशा फड काढावा असा विचार पुढे आला. परंतु तमाशा फड काढण्यासाठी दत्ता महाडिक यांच्याकडे भांडवल नव्हते. परंतु काही हितचिंतकांनी त्यांची बेल्हा येथील गटकळ शेठ यांच्याशी गाठ घालून दिली. गटकळ शेठ यांना दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांची तमाशातील लोकप्रियता माहीत होती.

त्यांनी तीन वर्षाच्या परतफेडच्या बोलीने दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांना 3 लाख 40 हजार रुपये देऊ केले. त्याचप्रमाणे गुलाबराव बोरगावकर यांच्या मुलाने 40 हजार रुपये दिले. अशा तऱ्हेने सन १९८२साली दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर हा लोकप्रिय तमाशा उभा राहिला. आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा अंदाज खोटा ठरला.

बेल्हे येथील सावकार गटकळ यांनी दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगावकर यांना 3 लाख 40 हजार रुपये दिले होते. ही रक्कम तीन फेडायची होती. परंतु या जोडीने 3 लाख 40 हजार हे रक्कम अवघ्या चार महिन्यातच फेडून मोकळे झाले. इतका तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय झाला होता.

एकदा तर मुंबईला दत्ता महाडिक यांच्या राहुटी मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर त्यांच्या चार-पाच बिगारी लोकांना घेऊन आले. आणि ते दत्ता महाडिक यांना अर्वाच्य भाषेत बोलू लागले. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या तमाशाला लोक येत नाहीत. सर्व तिकीट लोक तुमच्या तमाशाचा काढतात. यामध्ये तुम्हीच काहीतरी काळबेरं केलं असलं पाहिजे. ते महाडिक साहेबांना मारण्याच्या विचारानेच आले होते.

महाडिक साहेबांना मारण्यासाठी चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी हातातले घड्याळ आणि गळ्यातली चैन खिशात ठेवली आणि महाडिक साहेबांच्या अंगावर धावून आले. तेवढ्यात महाडिक साहेबांच्या तमाशातील कलावंत निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर यांनी चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा हात धरला आणि त्यांना तेथेच सुनावले. त्यानंतर ढवळपुरीकर आपल्या पोरांना घेऊन निघून गेले.

मा.गुलाबराव बोरगावकर:

माधवराव नगरकर यांच्या तमाशात जेव्हा दत्ता महाडिक काम करत होते. त्यावेळी गुलाबराव बोरगावकर त्या तमाशामध्ये कनातीचे बांबू रोवणे, स्टेज उभा करणे, अशी कामे करत असत. त्यांना दत्ता महाडिक यांचा सोंगाड्या हे पात्र खूप आवडायचे. या पात्रावर ते तेव्हा मनापासून प्रेम करायचे. हळूहळू त्यांनीही तमाशा मध्ये काम करायला सुरुवात केली व ते विनोद सम्राट म्हणून उदयाला आले.
त्यांनी त्यानंतर गुलाब माने सह गुलाबराव बोरगावकर या नावाचा तमाशा फड सुरू केला.
सन 1982 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर व दत्ता महाडिक ही जोडी फुटली. आणि त्यानंतर दत्ता महाडिक यांनी गुलाबराव बोरगावकर यांना घेऊन मास्टर दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर हा तमाशा फड निर्माण केला.

सन 1982 ते सन 1984 पर्यंत दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांनी तमाशाच्या सादरीकरणात अनेक प्रयोग केले. बी.के. कवठेकर यांची तत्कालीन परिस्थितीवर केलेली गाणी दत्ता महाडिक यांच्या उत्कृष्ट संगीत आणि उडत्या चाली यांनी महाराष्ट्राला वेड लावले तर गुलाबराव बोरगावकर यांनी तत्कालीन राजकारण, तत्कालीन दैनंदिन जीवनातील घटना आणि भूतकाळातील घटना यांची सांगड घालून अजोड विनोद निर्मिती केली आणि उभ्या महाराष्ट्राला हास्यसागरात बुडवले.

दत्ता – गुलाब या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाचा असा काही धुराळा उडविला की तमाशा रसिक हसून हसून गडबडा लोळले. दत्ता – गुलाब यांचं अफलातुन टायमिंग, परस्पर समन्वय, शाब्दिक कोट्या, वर्तमान आणि भूतकाळ यांची सांगड घालून केलेले विनोद यामुळे रसिकांनी या जोडगोळीला अक्षरश: डोक्यावर घेतले.

परंतु नियतीला हे मान्य नव्हतं म्हणून की काय? दिनांक 18 जानेवारी 1984 च्या पौष महिन्यात दत्ता महाडिक सह गुलाबराव बोरगावकर यांचा तमाशा ओतूर येथून म्हसा येथे जात असताना गुलाबराव बोरगावकर यांना मुरबाड येथे पहाटे साडेचारच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आणि महाराष्ट्राचा हा विनोद सम्राट काळाच्या उदरात गडप झाला.

परंतु त्यांची कला मात्र नियतीला गडप करता आली नाही. अजूनही गुलाबराव बोरगावकर यांचे विनोद लोक तितक्याच उत्स्फूर्तपणे मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतात.

दत्ता महाडिक यांच्या तमाशा कारकिर्दीमध्ये अनेक नट उदयाला आले. त्यांनी इतरत्र तमाशात न जाता दत्ता महाडिक यांना शेवटपर्यंत साथ दिली.

फकीरभाई केसनंदकर:

फकीर भाई केसनंदकर हे दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये सन 1982 च्या सुमारास आले. त्यांचा गण, बतावणी, सवाल-जबाब यामध्ये उत्कृष्ट अभिनय करत असत. प्रत्यक्ष वगनाट्य मध्ये देखील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असत. त्यांनी असे घराणे नष्ट करा मधील त्यांची सीआयडी पोलीसाची भूमिका विशेष गाजली. शिवाय ते उत्कृष्ट विनोदाचे बादशहा देखील होते.
गण गाताना किंवा मुजरा गाताना त्यांनी गेनभाऊ आंबेठाणकर यांना तोडीस तोड साथ दिली. काही लोक फक्त गेनभाऊ आणि फकीरभाई यांचा गण आणि मुजरा ऐकायला येत असत. त्यांच्या आवाजाला अविट गोडी होती.

विष्णू चासकर:

विष्णू चासकर हे देखील सुरुवातीच्या काळापासून दत्ता महाडिक यांच्याबरोबर होते. त्यांनी माधवराव नगरकर, तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि नंतर दत्ता महाडिक यांच्या बरोबरीने काम केले. त्यांनी सुद्धा गण, गवळण, बतावणी सवाल-जबाब आणि वगनाट्य यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ते विनोदाच्या बाबतीत गुलाबराव बोरगावकर यांच्या खालोखाल काम करत असत. त्याने सुद्धा दत्ता महाडिक यांना शेवटपर्यंत साथ दिली. नाही म्हणायला त्यांनी सुद्धा स्वतंत्र तमाशा फडाची निर्मिती केली होती. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही लवकरच तमाशा बंद करावा लागला. आणि पुन्हा दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये ते सामील झाले.

गेनभाऊ आंबेठाणकर:

गेनभाऊ आंबेठाणकर हे सुद्धा महाडिक साहेबांच्या बरोबरीचे कलाकार होते. त्यांनी सुद्धा तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि नंतर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मध्ये काम केले.
गण म्हणावा तर गेनभाऊ आंबेठाणकर यांनीच. त्यांच्यासारखा गण तमाशा मध्ये कुणालाच म्हनता येत नव्हता.
काय तो आवाज ! काय ती तान! काय ते सुर आहाहा ! आजही आंबेठाणकर यांचा गण ऐकला की कान तृप्त होतात.
गेनभाऊ आंबेठाणकर हे उत्कृष्ट विनोदी कलाकार होते. ते गणगवळण, बतावणी, रंगबाजी व प्रत्यक्ष वगनाट्या मध्ये प्रमुख भूमिका करत असत.

अजूनही गेनभाऊ आंबेठाणकर हयात आहेत. ते त्यांच्या काळातील आठवणी अजूनही सांगत असतात.

रमेश खुडे:

रमेश खुडे हे अगदी अलीकडचे दत्ता महाडिक यांच्या तमाशातील कलाकार. अगदी लहानपणापासून ते दत्ता महाडिक यांचे फॅन होते. ते दत्ता महाडिक यांचा तमाशा पाहण्यासाठी सायकलवर वीस ते पंचवीस किलोमीटर जात असत. त्यांनी दत्ता महाडिक शिवाय दुसरा कोणताच तमाशा त्यावेळी पाहिला नव्हता.
त्यांचा दत्ता महाडिक यांच्या तमाशा सन 1985 मध्ये प्रवेश झाला. आणि त्यांनी संधीचे सोने केले. ते दत्ता महाडिक यांच्याप्रमाणेच स्टेजवर अप्रतिम गाणी सादर करत असत. विविध भूमिका ते प्रभावीपणे अजूनही तितक्याच समर्थपणे करत असतात. आजही दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये रमेश खुडे यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आहे.

तमाशा पंढरी नारायणगाव मध्ये तमाशाची सुपारी देताना रमेश खुडे तमाशात आहेत का? याची विचारणा करूनच तमाशा ठरवला जातो.

जनार्दन वायदंडे ढोलकी वादक:

जनार्दन वायदंडे यांनी सुरुवातीपासून दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये ढोलकी वाजवण्याचे काम केले. ते अतिशय उत्कृष्ट ढोलकी वादक होते. संगीतरत्न दत्ता महाडिक यांची गाणी जर कोणी आजरामर केली असतील तर ती वायदंडे यांच्या ढोलकीने असेच म्हणावे लागेल. महाडिक साहेबांचा वायदंडे हा अतिशय आवडता कलाकार होता. दत्ता महाडिक यांना त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. गण आणि मुजरा त्याचप्रमाणे दत्ता महाडिक यांची गाणी वायदंडे यांच्या ढोलकीने अजरामर झाली.

रंगा लाखे पेटी मास्तर:

रंगा लाखे हे दत्ता महाडिक यांच्या तमाशा पेटी मास्तर होते. ते आणि गेनभाऊ आंबेठाणकर एकाच वेळी महाडिक साहेबांच्या तमाश्यात दाखल झाले. प्रथम त्यांना तत्कालीन पेटी मास्तर कांबळे हे पेटीच्या जवळ सुद्धा फिरकू देत नसत. परंतु संत तुकाराम हा वाघ आणि फॉर्मत असताना कांबळे मास्तर हे गावाला निघून गेले. त्यानंतर महाडिक साहेबांनी रंगा मास्तर यांना पेटी वाजवायला शिकवले. महाडिक साहेब हे रंगा मास्तर यांचे गुरु होते.
त्यानंतर रंगा मास्तर यांनी खूप मेहनत करून पेटीवर अनेक गाणी बसवली. त्यांनी पंधरा दिवसात आठ गाणी पेटीवर बसवली. त्यांना सर्व लोक रंगा मास्तर म्हणूनच हाक मारीत असत. रंगा मास्तर हे उत्तम लेहरा वाजवायचे. आजच्या पिढीला लेहरा म्हणजे काय हेही माहित नसेल.
ज्यावेळी कांबळे मास्तर पंधरा दिवसानंतर परत तमाशा मध्ये दाखल झाले तेव्हा रंगा मास्तरचे पेटीवरचे वाद्यकाम ऐकून ते आश्चर्यचिकित झाले.
रंगा मास्तर यांनी पेटीवर वाजवलेलं
तरी लंगड उडून मारते तंगड हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
रंगा मास्तर सांगतात. ज्यावेळी महाडिक साहेब जरी लंगड उडून मारतय तंगड हे गाणे स्टेजवर म्हणत असत. त्यावेळेस त्यांच्यावर प्रेक्षकांकडून पैशाच्या नोटांचा अक्षरशा पाऊस पडत असे.
रंगा मास्तर सांगतात. महाडिक साहेबांनी मला संगीत शिकवलं, संगीताच्या जागा कशा भरून काढायच्या हे शिकवलं. परंतु महाडिक अण्णा गेल्यानंतर माझे हात पाय गळाले. मी त्यानंतर पेटी वाजवण्याची बंद केले. कोणत्याही तमाशात गेलो नाही. ही एक महाडिक साहेबांना वाहिलेली श्रद्धांजलीच होय. महाडिक साहेबांकडे त्यांनी 26 वर्षे पेटी वाजवली.

शशिकला शुक्रे:

शशिकला शुक्रे ह्या इयत्ता अकरावी म्हणजेच मॅट्रिक शिकलेल्या पहिल्या तमाशातील कलाकार होय. त्या दत्ता महाडिक यांच्या तमाशात सन 1979 मध्ये दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांचे पती हे दत्ता महाडिक यांच्या तमाशाचे मॅनेजर होते. शशिकला शुक्रे यांना कोणत्याही प्रकारचा अभिनय येत नव्हता. त्यांना महाडिक साहेबांनी अभिनय शिकवला असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी फक्त वगनाट्य मध्ये काम केले. पायात चाळ बांधले नाहीत.

मास्टर दत्ता महाडिक यांची अनेक गाणी त्यावेळी महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी एक नवीन उच्चांक केला

रेडा देतुयां धार, टुबामधी जलामलं पॉर
कुणी कुणाला नाय बोलायचं
मांजरावानी राहयाचं, हे असंच चालायचं
पोरी घालतात फराक लांडा
रस्त्याने चालतात हलवीत गोंडा
वारा येता, फराक उडता
साऱ्या गावाला दर्शन घडायचं.
कुणी कुणाला नाय बोलायचं
हे असंच चालायचं

त्यावेळेस जगात नवीनच टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग चालू होता. तत्कालीन परिस्थितीवर केलेले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय म्हणावे लागेल.

बाप्या का बाई, कळना काई
नीतीला मोडून ढुंगणाचं सोडून डोईला गुंडाळलं
हरी ओम हरी दुनिया नाही बरी
पाप चाले नाना परी आज भूमीवरी
यांनी वेशीला टांगून लाज
केले शरीर उघडे आज
उघड्या शरीराचा अंदाज
घेण्या टपले तिरंदाज
ओठात शिळ, मिशीला पिळं
हे जगच भंजाळलं
नीतीला मोडून ढुंगणात सोडून डोईला गुंडाळलं
हरी ओम हरी दुनिया नाही बरी
पाप चाले नाना परी आज भूमीवरी
तत्कालीन स्त्रियांच्या वाढत्या फॅशनवर विडंबनात्मक तयार केलेले बी.के. कवठेकर यांनी लिहिलेले गाणे दत्ता महाडिक यांच्या संगीत आणि गायनाने आजही ते तितकीच उद्बोधक वाटते.

अशाच एका फॅशनचे दुसरी गाणे

फॅशनच फ्याड, लागलीया गॉड
जगाच्या पुढं, पडलय कोडं
घरचीन सोडलं लुगडं
होते फॅशन भलतच लफडं
होते फॅशन भलतच लफडं
माप अंगावर देतीया बाई
त्यात टेलरचा दोष नाही
कधी लाईट अचानक जाई
माप दुसरंच हातात येई
हाताला घावलं, मार्गाला लावलं
होते फॅशन भलतच लफडं
होते फॅशन भलतच लफडं

अजून एक गीताचा नमुना

दिस आल्यात कसं व रांगडं
आंधळं म्हणतयां, फुटलं तांबडं
चापसून हातानं, चालतंय बेतानं
उरफाट घालून आंगड, तरी लंगडं
कसं उडून मारतय तंगडं
येतो उन्हाळ्यात नदीला पूर
बर्फ पेटलायां निघतोया धूर
कापडं पोरींची घालतात पोरं
सासुबाईला सुनेचा घोर
बहिर कानानं, भलतच ऐकून
हातरुण आलया घोंगडं
तरी लंगडं कसं उडून मारतय तंगड

ज्याप्रमाणे हिंदी हिंदी चित्रपट सृष्टीत ऑल टाइम ब्लॉकबस्टर शोले सिनेमाचे संवाद लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे तिरंगा आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातील संवाद लोकप्रिय झाले तितकेच मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या वगनाट्याचे, रंगबाजीचे, बतावणीचे आणि सवाल जवाबाचे संवाद लोकप्रिय झाले. त्याच्या लोकनाट्यातील गाणी तर अजूनही सदाबहार म्हणावी लागतील. इतकी ती आजही लोकप्रिय आहेत.

त्यावेळी मा.दत्ता महाडिक साहेबांच्या वगनाट्याच्या, सवाल-जबाब, रंगबाजी आणि बतावणीच्या कॅसेट निघाल्या. या कॅसेटनी महाराष्ट्रभर मोठा धुमाकूळ घातला. आणि दत्ता महाडिक यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमू लागले. दत्ता महाडिक हे तमाशा सम्राट होते, ते तमाशा सृष्टीचे अनभिशिक्त सम्राट होते.

ज्याप्रमाणे राजेश खन्ना हे चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. त्याचप्रमाणे दत्ता महाडिक पुणेकर हे सुद्धा तमाशासृष्टीतील पहिले सुपरस्टार होते.

काही रसिक तर महाडिक साहेबांचे इतके चाहते होते की ते दत्ता महाडिक यांच्या तमाशा शिवाय दुसरा कोणताही लोकप्रिय असलेला तमाशा देखील बघत नसत.

महाराष्ट्र राज्य सरकारने दत्ता महाडिक यांच्या अप्रतिम कलेची दखल घेऊन त्यांना ऑगस्ट 1992 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या हस्ते पहिला महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख पंचवीस हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

त्यांचे गवळ्याची रंभा, असे घराणे नष्ट करा, गुरुची विद्या ही वगनाट्य प्रचंड लोकप्रिय झाली.
गवळ्याची रंभा मधील प्रत्येक पात्र आजरामर झाले. महाराज विरमल आणि प्रधान रणमल, गवळीवाड्याचे पुढारी नामदेव पाटील, नामदेव पाटलांची सून, आणि राज्याची सेवक असलेले आकदंड आणि फकदंड हे सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय झाली.
प्रधान रणमल महाराजांची भूमिका मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर प्रचंड ताकदीने साकारली होती. त्यांचे ते संवाद, संवाद फेकण्याचे कौशल्य, लाजवाब अभिनय यामुळे रणमल महाराज हे पात्र अजरामर झालं.
दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांनी साकारलेलं राज्याचे सेवक आकदंड आणि फकदंड यांनी महाराष्ट्र हास्यसागरात बुडवला.
गवळ्याची रंभा या वगनाट्यातील पॅरोडी सॉंग प्रचंड गाजलं.
दिवस पहिला आज मला,
बाहेर मी बसले.अण राया तुम्हा
आता मी कशी दिसले,
गेला दरिया पार, घरधनी गेला दरिया पार
उलच्छी उलच्छी दुनिया, काही राती हॊ
आई रे तेरे बिना सारा जग छोड के
मै आई रे तेरे बिना सारा जग छोडके
हे पॅरोडी सॉंग त्यावेळी प्रचंड गाजले

आणि यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये पॅरोडी सॉंग वापरायला सुरुवात केली. पुढे मैने प्यार किया आणि इतर चित्रपटांमध्ये सुद्धा पॅरोडी सॉंग्स विशेष गाजली. ही आयडिया महाडिक साहेबांकडून घेऊनच. हेही तितकच खरं.

असे घराणे नष्ट करा मधील दत्ता महाडिक यांची जमीनदाराच्या नोकराची भूमिका प्रचंड गाजली. असे घराणे नष्ट करा मधील प्रत्येक पात्र प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामधील दत्ता महाडिक यांनी केलेले विनोद आणि गाणे अजरामर झाले.
याच वगनाट्यमधील त्यांचे काळ्या आईची किमया भारी हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले.

गुरुची विद्या गुरूला मध्ये गुरुच्या वेडपट चेल्याची (शिष्य) दामोदर म्हणजे दाम्याची भूमिका महाडिक साहेबांनी साकारली होती. त्यामधील त्यांचा उत्कृष्ट विनोदी अभिनय महाराष्ट्राला पाहायला मिळाला. आणि सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या वगनाट्यमधील भूमिका महाडिक साहेबांनी अजरामर केल्या.

महाडिक साहेबांची त्यांच्या कलाकारावर विलक्षण प्रेम होते. अनेक कलाकारांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. फकीर भाई केसनंदकर यांना मुलीच्या लग्नासाठी त्यावेळेस ऐंशी हजार रुपयाची मदत केली. रंगा मास्तर यांच्या पत्नीच्या आजारपणासाठी सन 1982 साली एक लाख रुपये दिले होते. महादू खुडे यांना घर बांधण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली होती. गेनभाऊ आंबेठाणकर यांना अडीच एकर जमीन घेऊन दिली. त्यांचे प्रसिद्ध पेटी वादक बाबुराव कांबळे यांना दहा एकर जमीन घेऊन दिली.
अनेक कलाकारांना त्यांनी जमीन घेण्यासाठी, विहीर बांधण्यासाठी, लग्नकार्यासाठी, घर बांधकामासाठी, कुटुंबांच्या आजारपणासाठी अनेक वेळा आर्थिक मदत केली. महाडिक साहेब नेहमी म्हणायचे. आज माझं जे काही ऐश्वर्य आहे ते या कलाकारांच्या जीवावर आहे.
बेल्हे येथील शाळेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी महाडिक साहेबांनी निधी उभारून दिला.

महाडिक साहेब दर महिन्याला कलाकारांचा पगार त्यांच्या हातात देत नसत तर दूर गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबांकडे पाठवत असत. असे होते महाडिक साहेब.

18 नोव्हेंबर 1999 रोजी पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक तमाशा पंढरपूरला दाखल होत असतात. त्यानुसार दत्ता महाडिक यांचा तमाशा सुद्धा पंढरपूर मध्ये दाखल झाला होता.

परंतु तेथे गेल्यावर महाडिक साहेबांची तब्येत बिघडली. आणि त्यांनी अचानक त्यांच्या राहत्या घरी म्हणजे बेल्ह्याला जायचा निर्णय घेतला. सर्व तमाशा कलावंतांना तेथेच ठेवून महाडिक साहेबांची गाडी बेल्ह्याच्या दिशेने रवाना झाली.

त्यांच्या मुलांनीही मग त्यांना बेल्हे येथे त्यांच्या राहत्या घरी आणले. महाडिक साहेबांचे फॅमिली डॉक्टर श्री. मते डॉक्टर यांनी त्यांना तपासून एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच पुणे येथे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर महाडिक साहेबांनी घरी जाऊन आंघोळ केली. जेवण केले. आणि त्यानंतर विश्रांती घेतली.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर 1999 रोजी जेव्हा सकाळी पुण्याला जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून महाडिक साहेबांना त्यांच्या मुलांनी उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.

वायरलेस वरून महाडिक साहेबांच्या मृत्यूची बातमी पंढरपूर येथील पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. दुपारी पंढरपूर येथील बैल बाजाराकडे असलेल्या मैदानाकडे तमाशाच्या गाड्या जात असताना एका पोलिसाने या गाड्या थांबवल्या आणि महाडिक साहेबांच्या तमाशा कलावंतांना त्यांच्या मृत्यूची बातमी त्या पोलिसांनी दिली.

महाडिक साहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकताच तमाशा कलावंत शोक सागरात बुडाले. नव्हे सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आणि एका तमाशा कलावंताचा अस्त झाला. परंतु त्यांच्या कलेचा नाही. जोपर्यंत तमाशा संस्कृती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर टिकून आहे तोपर्यंत मास्टर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे विनोद, त्यांची गाणी, त्यांची ध्वनीमुद्रित झालेली वगनाट्य, सवाल-जबाब, बतावणी व रंगबाजी आणि त्यांचा तमाशा कायमच अजरामर राहतील.

सन 1965 साली सुरू केलेला मा. दत्ता महाडिक यांचा तमाशा अजूनही टिकून आहे ही महाडिक साहेबांची कृपाच म्हणावी लागेल.

सन 2025 च्या मार्च महिन्यात आमच्या गावात यात्रेच्या निमित्ताने तमाशा आणण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे आम्ही पंधरा-वीस ग्रामस्थ नारायणगाव येथे तमाशा राहुटीमध्ये दाखल झालो. त्या ठिकाणी अनेक राहुट्या उभ्या होत्या. गाव गावचे अनेक लोक तमाशा ठरवण्यासाठी तेथे दाखल झाले होते.

मी एकेका राहुटीवर टाकत होतो. समोरच मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांची राहुटी होते. त्यांच्या राहुटीवरील महाडिक साहेबांचा फोटो पाहून सर्व जुन्या आठवणी जागृत झाल्या. बाकी सर्व ग्रामस्थ शिवकन्या बढे यांच्या राहूटी कडे गेले. परंतु नकळतपणे मी आणि आमच्या गावचे ग्रामस्थ दत्तूराम गोडे आम्ही दोघेच महाडिक साहेबांच्या राहुटीमध्ये जाऊन बसलो.

त्यावेळी मॅनेजर एकटेच तेथे बसलेले होते. त्यांनी आमची विचारपूस केली. आणि म्हणाले.
तुमचे सर्व ग्रामस्थ तिकडे शिवकन्या बडे यांच्या राहुटी कडे गेले?
त्यावर मी म्हटले, जाऊद्या ! ते गेले तरी नंतर आपोआप इकडे येतील.
आणि आम्ही बोलत असतानाच आमचे सर्व ग्रामस्थ आम्ही बसलो होतो तेथे म्हणजे महाडिक साहेबांच्या राहुटीत दाखल झाले. आणि आम्ही त्यांचा हा तमाशा आमच्या गावच्या यात्रेला म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी ठरवला. त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम कार्यक्रम केला.

आज तमाशामध्ये प्रचंड बदल झाला आहे. पूर्वीचा तमाशा आता राहिलेला नाही. पूर्वी गण, गवळण, बतावणी, सवाल-जबाब, रंगबाजी आणि त्यानंतर वगनाट्य असा सादरी क्रम असायचा.
परंतु आता काळानुसार खूपच बदल झाला आहे. तमाशा सृष्टीही आताच्या मीडियाच्या जमान्यातही कशीबशी तग धरून आहे. परंतु काहीही म्हणा तमाशा ही कला महाराष्ट्राची लोक परंपरा आहे, लोकधारा आहे. ही कला टिकवण्याची जबाबदारी सबंध महाराष्ट्राची आहे. तुमची आमची आहे, सर्व जणांची आहे.

काही काही महाभाग तमाशाला तीव्र विरोध करतात.अगदी यात्रेला वर्गण्या सुद्धा देत नाहीत. तमाशा असेल तर वर्गणी देणार नाही अशी भूमिका घेतात. परंतु त्यांची मुले नातवंडे रात्रभर मोबाईलवर गेम खेळतात, अश्लील व्हिडिओ पाहतात, रील पाहतात. याला मात्र ते विरोध करत नाहीत. हे त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

लेखक:- रामदास तळपे (मंदोशी)