मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं. मराठी रंगभूमी विकसित होण्यात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांच्याबरोबरच अत्यंत गांभीर्याने कार्यरत संस्था आणि रामकृष्ण नायक यांच्यासारखे आयोजक, संयोजक यांचं योगदानही महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2016 साली त्यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं. रामकृष्ण नायक यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया.
सांस्कृतिक कार्य संचालनालयासाठी चित्रफित निर्मिती, दिग्दर्शन :नरेंद्र बेडेकर.