नावात काय नाही?

भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात.



‘नावात काय आहे?’ असे विचारणारी एक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेली. या प्रश्नाच्या आधारे चर्चा झाल्या, लेख लिहिले गेले, साहित्यातले आणखी काही प्रकार हाताळले गेले. पण ‘नावात काय नाही?’ असा प्रश्न विचारणारी कोणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती. हा प्रश्न उपस्थित झाला पण लोकांमधे फारसा चर्चेला आला नाही. नावात काहीतरी आहे, नावात बरंच काही आहे इथपासून नावातंच सर्व काही आहे इथपर्यंत छटा दाखविणारी उदाहरणं देता येतील. माणूस, पाळीव प्राणी व पक्षी या सजीवांपासून रस्ते, घरं, सोसायट्या यांना नावं दिलेली असतात. देश, राज्य, जिल्हा, तालुका यांना नावानेच ओळखले जाते. तर असं हे सर्वव्यापी प्रकरण असताना ‘नावात काय आहे’ असा प्रश्न कितपत रास्त वाटतो? पण थोरांनी म्हटले की थोरवी प्राप्त होते त्या वचनाला. ही थोरवी सार्थ करणारी काही उदाहरणे आहेत. ‘नांव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ ही म्हण प्रसिद्ध आहे. झाली ना नावावर टीका? झुरळाला घाबरणारा पण ‘…सिंह’ हे नाव असणारा, किती चमत्कारिक वाटतं नां? इथे ‘नावात काय आहे?’ हा प्रश्न सार्थ वाटतो. पण नावाप्रमाणे शूर असलेला ‘समशेरसिंग’ पाहिल्यावर म्हटले गेले पाहिजे की ‘नावात काय नाही?’. पण ‘त्याचे नावच आहे तसे, त्यात काय विशेष?’ असा शेरा मारून अशा सुसंगत दिसणार्‍या दाखल्याला बाजूस सारले जाते.

मूल जन्माला आल्यावर नाव ठेवले जाते. पुढे ते मूल नावाला साजेसे दिसू, वागू लागले तर ते नाव शोभते पण त्यात विसंगती असेल तर तो चर्चेचा विषय होतो. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे (खेळाडू, कलावंत वगैरे) नाव मुलाला वा मुलीला ठेवले जाते. हा कुटुंबाचा खाजगी मामला असतो. याला कोणीही कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. नामकरण हे एकदाच घडते, पण पुढे त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रसंग येत राहतात ज्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडतं. संख्याशास्त्राच्या नियमानुसार नावाला साजेशाच सर्व कृती पुढील आयुष्यात त्या व्यक्तीच्या बाबतीत घडतील याची शक्यता कमी असते. म्हणून एकच विसंगती ‘नावात काय आहे?’ असे विचारण्यास पुरेशी ठरते. उदाहरणार्थ, विज्ञानात एखादा दाखला वा प्रयोग नियमाविरुद्ध गेल्यास, त्या नियमाचे पुनरावलोकन व पुनर्रचना करणे भाग पडते. (न्यूटनचे गतीविषयक नियम, बुध ग्रहाच्या विपरित चलनाला लागू पडले नाहीत. यातून सापेक्षतेच्या सिद्धांताच्या दिशेने प्रवास सुरू झाला.)

आपल्या देशात युरोपीय देशांसारखी रेखीव गृहरचना व रम्य परिसर सहसा दिसत नाही. तसे एखाद्या ठिकाणी असले तरी तेथून बाहेर पडताच बकालपणा, अस्वच्छता, बेशिस्त वगैरे चिन्हे दिसू लागतात. ‘Tulips’ वा ‘Daffodils’ अशी नावे असलेल्या सोसायट्यांच्या बाहेर वैराण रस्ते दिसतात. ‘Spring Fields’ नाव असलेल्या घराशेजारून गटाराचं पाणी वहात असतं. ‘Tranquil Nest’ च्या आसपास रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचे कर्कश आवाज येत असतात. नाव चांगले असले की काही बाबींकडे डोळेझाक करण्यासाठी झापंड मिळते. ‘नाव तर चांगले आहे’ हे फसवे समाधानही काहींना सुखावून जाते. म्हणून ‘नावात काय नाही?’ असा प्रश्न रास्त वाटतो.

भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात. नाव बदलल्यानंतर चमत्कार होईल या स्वप्नांवर स्वार असतात. आताच्या नावामुळे मोजता येणारे तसेच न मोजता येणारे तोटे होत असल्याचा दावा करणारे असतात. नाव काय असावे याचा विचार करताना अनेक तज्ञांचा सल्ला घेतला जातो. अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, कुंडली यांच्या आधारे नावातील अक्षरांची संख्या, आद्याक्षर या गोष्टी ठरविल्या जातात. अखेर हवे असलेले नामांतर होते. आजपर्यंत घडत आलेल्या घटना नाव बदलल्यावरही तशाच घडत राहतात. स्टेशनवरची गर्दी कमी होत नाही. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका फुटणे थांबत नाही. बदलानंतर कोणताही चमत्कार होत नाहीत.

म्हणून ‘नावात काय नाही?’ आणि ‘नावात काय आहे?’ अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विचारणार्‍या व्यक्तीच्या विचार पद्धतीवर ते अवलंबून असते.

– रविंद्रनाथ गांगल