कल्पकता : चौकटी बाहेर जाऊन विचार

माझी प्रमुख या नात्याने जबाबदारी होती, ती म्हणजे कारखान्याचे आर्थिक व्यवहार सुधारण्याची. मी कामाचा चार्ज घेतल्या नन्तर काही दिवसात माझ्या लक्षात आलं की कारखान्याच्या आवारातून खूप चोऱ्या होतात, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत होते. रात्र झाली की आजूबाजूच्या लोकांपैकी काही तारेच्या कुंपणातून आत शिरत आणि ज्याला चांगला विक्री भाव येतो अश्या वस्तूंची चोरी करत. आमच्याच कारखान्यातले काहीजण ह्या चोरी करणाऱ्या लोकांना मदत करत असेही माझ्या कानावर आले होते. आणि त्यांच्याशी कितीही अप्रत्यक्ष संवाद साधला तरीही ती लोकं अशी चोरीला मदत थांबवत नव्हती.



साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.

कारखान्याचे आवार  जवळजवळ ६० एकर पसरलेले होते. त्या ६० एकरातला बराचसा भाग कधीच वापरला जात नसे, पडीक होता. त्या भागात दिवे नव्हते, तसच तिथे भरपूर गवत आणि झाडे झुडुपे उगवलेली असत. कारखान्याच्या आजूबाजूला बरीच कच्ची घरे आणि भंगार मालाची गोदामे होती. त्या भंगार माल गोदामांचे काही मालक चोरीचा माल खरेदी करतात असंही माझ्या कानावर आलं होतं.

माझी प्रमुख या नात्याने जबाबदारी होती, ती म्हणजे कारखान्याचे आर्थिक व्यवहार सुधारण्याची. मी कामाचा चार्ज घेतल्या नन्तर काही दिवसात माझ्या लक्षात आलं की कारखान्याच्या आवारातून खूप चोऱ्या होतात, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत होते. रात्र झाली की आजूबाजूच्या लोकांपैकी काही तारेच्या कुंपणातून आत शिरत आणि ज्याला चांगला विक्री भाव येतो अश्या वस्तूंची चोरी करत. आमच्याच कारखान्यातले काहीजण ह्या चोरी करणाऱ्या लोकांना मदत करत असेही माझ्या कानावर आले होते. आणि त्यांच्याशी कितीही अप्रत्यक्ष संवाद साधला तरीही ती लोकं अशी चोरीला मदत थांबवत नव्हती.

आमचे सुरक्षा कर्मचारी इतक्या विस्तृत आवारात सर्वत्र लक्ष ठेऊ शकत नव्हते. त्या काळात cctv वगैरे साधने नव्हती. कर्मचारी संख्या वाढवावी तर त्याबाबत आर्थिक बंधने होती. ज्यादा खर्चाला कंपनीची मान्यता नव्हती. माझ्या प्रयत्नांना त्यामुळे मर्यादा होत्या.

जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ह्याच बद्दल विचार करत असे. अचानक माझ्या डोक्यात विचार आला की सुरक्षेसाठी प्रशिक्षित अशा कुत्र्यांची मदत घ्यावी का? कुत्र्यांची नाके विलक्षण तीक्ष्ण असतात. त्यामुळे ती कोणत्याही सूक्ष्म वासाचा माग काढू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे ती भ्रष्टाचारी नसतात. आमच्या नशिबाने थोडी विचारणा केल्यावर अशी कुत्र्यांची सेवा उपलब्ध झाली. चार प्रशिक्षित कुत्रे आणि त्यांना सांभाळणारा माणूस ह्यांचा महिन्याचा खर्च आमच्या एका सुरक्षा रक्षकाच्या पगारापेक्षा कमीच होता. ह्याच वेळी आम्ही आमच्या सुरक्षा रक्षकांपैकी वय झालेल्या आणि ज्यांची इच्छा होती अशांना स्वेच्छा निवृत्ती दिली.

आमच्या कारखान्याच्या आवारात आम्ही कुत्रे आणि त्यांना हाताळणारे लोकं, दोघांनाही जागा उपलब्ध करून दिली. आमच्या कर्मचारी वर्गालाही नोटीस पाठवून कळवले की कारखान्याच्या रिकाम्या परिसरात कोणी विनाकारण फिरू नये. आम्ही रिकाम्या जागेला अजून एक ज्यादाचे कुंपण घातले, ज्यामुळे कर्मचारी जिथे काम करतात तिथे कुत्रे जाऊ शकणार नाहीत. रात्रीच्या वेळी विशेष करून, कुत्र्यांना वापरत नसलेल्या मोकळ्या जागेत सोडले जात असे. दिवसासुद्धा कुत्र्यांचे फिरणे ह्या विशिष्ट क्षेत्रातच असे.

आमच्या आवारात आम्ही कुत्रे मोकळे सोडले आहेत ही बातमी आसपासच्या लोकांच्यात आणि आमच्या कामगारांच्यात अर्थातच पसरली. एका रात्री एक चोर चोरीच्या उद्देशाने आवारात आला असता आमच्या कुत्र्याने त्याला पकडले, आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. थोड्यात दिवसात रात्रीच्या चोऱ्या तर पूर्णपणे थांबल्या. कुत्र्यांच्या धास्तीने आमच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चोऱ्याही  कमी झाल्या. ह्याचा परिणाम असा झाला की

१) चोऱ्या थांबल्याने कंपनीची बचत वाढली.

२) वयोवृद्ध सुरक्षा रक्षक आनंदाने निवृत्त झाले, त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळाला.

३) सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी जादा कर्मचारी नेमावे लागले नाहीत, ज्यामुळेसुद्धा खर्चात बचत झाली.

४) कुत्र्याचे जे मालक होते त्यांना कुत्र्यांबरोबर रोजगार मिळाला.

५)आमच्यावर पडणारा मानसिक ताणही एक प्रकारे कमी झाला.

अशाप्रकारे सर्व बाजूंनी चांगले परिणाम, जरा चौकटीच्या बाहेर जावून केलेल्या कल्पनेने झाल्याने, कल्पकतेचे महत्व आमच्या संपूर्ण टीमला आत्मसात झाले.

******

रागावणे म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीबद्दल स्वतःला शिक्षा करणे.