एक खांबी तंबू – एक विचार

गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार.

सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.”

थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”

“का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ”

“अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे. तुझे त्याच्याशी घनिष्ट संबंध होते म्हणून एवढ्या अपरात्री कळवतो आहे.”

एका क्षणात खाडकन पूर्ण जागा झालो. शर्माशी माझा संबंध गेल्या सहा महिन्यांचा. डोळ्यासमोर एखाद्या चित्रफीतीप्रमाणे आमच्या भेटी तरळू लागल्या. चाळीशीतला शर्मा एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार उद्योजक होता. त्याने अक्षरशः शून्यातून जवळपास तीस कोटींचा धंदा उभा केला होता.

त्याचा कारखाना बडोद्याला होता आणि धंद्यातील काही धाडसी निर्णय चुकल्यामुळे त्याचा धंदा अतिशय डबघाइला आला होता. बँकेचे कर्जाचे हप्ते तुंबले होते. रोजचा व्यवहार चालवायला पैसे कमी पडत होते. नवीन कर्ज मिळत नव्हते. बँकेत थोडीफार पत शिल्लक असल्याने त्यांनी अजून टाच आणली नव्हती पण त्यांचाही संयम संपत आला होता.

मी व्यवसाय सल्लागाराचे काम करत असल्याने, जगदीशने माझी ओळख शर्माशी करून दिली होती. शर्मानेही खुल्या मनाने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखविला आणि माझ्या सल्ल्याप्रमाणे योग्य आणि अथक प्रयत्न करून आपला धंदा जवळजवळ पूर्व पदावर आणला होता.

आणि आता ही दुर्दैवी घटना झाली होती. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. त्याच्या व्यवसायातील समस्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे, शर्माच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींची मला फारशी कल्पना नव्हती.

त्याचा एक अगदी थोडा आर्थिक सहभाग असलेला भागीदार होता. त्याला धंद्यातील काहीही माहिती नव्हती आणि निर्णयाचे फारसे अधिकार पण नव्हते. त्याला पैश्याचे व्यवहार पण नीट कळत नव्हते. बायको तर धंद्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ होती. बँक खाते दोघांच्या नावावर नव्हते. राहते घर बँकेकडे तारण ठेवलेले होते. स्वतःचे इच्छापत्र केलेले नव्हते.

थोडक्यात सांगायचे तर हा धंदा म्हणजे पूर्णपणे “एक खांबी तंबू” होता. तो खांब असा अचानक पडल्यामुळे वर्षानुवर्षे कष्ट करून उभा केलेला हा तंबू पार जमीनदोस्त झाला. काही काळातच धंदा बंद पडला, कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, भागीदार वाऱ्यावर पडला. बँकेने राहत्या घराचा कब्जा घेतल्यामुळे त्याच्या बायकोला घर सोडून तिच्या भावाकडे आश्रय घ्यावा लागला. मुलांच्या शिक्षण खर्चाची काळजी नव्याने सुरु  झाली.

माझ्या व्यवसायाच्या संदर्भात माझा अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांशी संबंध आला. बहुतेक जणांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि रात्रंदिवस कष्ट करून धंदा उभा केलेला असतो. ग्राहक मिळविणे, त्यांना खूश ठेवणे, धंदा वाढविणे, बँकेचे आर्थिक व्यवहार, कच्चा माल आणणे, उत्पादन, कामगारांच्या समस्या, सरकारी प्रक्रिया, रोज येणाऱ्या नवनवीन समस्या, खर्च आणि नफ्याचे गणित, यांमध्ये दिवस रात्र एक करावी लागते.

त्यांना त्याबद्दल योग्य सार्थ अभिमानही असतो. सर्व निर्णय स्वतः घेऊन आलेल्या यशामुळे काही जणात थोडी गुर्मी पण आलेली असते. पण बऱ्याच वेळा एक धोक्याची शक्यता असतेच असते. रोजच्या गडबडीत किंवा तारुण्यसुलभ मस्तीमुळे काही शक्यतांचा विचार करायचे राहून गेलेले असते.

मला अचानक अपघात होऊन अपंगत्व आले तर,

मी आजारी पडलोतर,

कुटुंबात आलेल्या समस्येमुळे मला दुसरीकडे वेळ द्यावा लागला तर,

माझ्या व्यवसायात लागणारे तंत्रज्ञान अचानक बदलले तर,

ग्राहकाने अचानक त्याच्या ओर्डर दुसरीकडे दिल्या तर,

सरकारी नियम / कायदे अचानक बदलले गेले तर आणि

मलाच अचानक मृत्यू आला तर.

अशा शक्यता होतातच असे नाही पण झाल्याच तर रोजच्या धांदलीत, मी उभारलेला माझा धंदा, वरील शक्यतांना यशस्वीपणे तोंड देऊन कसा टिकून राहील याचा विचार व तयारी करायचे राहून जाते. मी हजर नसेन तर अथवा तेव्हा हा व्यवसाय विनासायास कसा चालू राहील याची पूर्व तयारी अत्यंत आवश्यक असते अन्यथा शर्माच्या केस प्रमाणे घटना होऊ शकतात.

खरेतर वर सांगितलेल्या समस्यांवरील उपाय फारसे अवघड नाहीत. पण मी जेंव्हा जेंव्हा वरील प्रमाणे मुद्दे उपस्थीत केले तेंव्हा बऱ्याच प्रमाणात ते व्यावसायिक अनुत्तरीत झाले.

या प्रवृत्तीला सिगारेट ओढणाऱ्या लोकांची आणि दारूड्यांची मानसिकता म्हणता येईल कारण दुष्परिणामांची पूर्ण कल्पना असूनही त्याबद्दल दुष्परिणामांना मी कसा अपवाद असणार आहे अशाच तऱ्हेने ते वागत असतात आणि या ना त्या सबबीखाली प्रत्यक्ष कृती टाळत असतात.

******

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं फक्त कोणाची तरी मनापासून साथ असावी लागते हे नक्की.