कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अर्थकारण

गेल्या काही वर्षांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आपल्या तंत्रज्ञानावलंबी आयुष्यात परवलीचे शब्द बनले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (‘एआय’) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने जगाला भुरळ घातली आहे, उत्साह आणलाय पण काहीशी भीतीदेखील निर्माण केलीय. विचार करणारी, प्रतिसाद देणारी बुद्धिमान यंत्रप्रणाली आता अर्थव्यवस्था, बाजारपेठा आणि आपले जीवन बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘एआय’ एक ‘गेम चेंजर’ ठरले यात काही शंका नाही.



(पूर्वप्रसिद्धी : ‘धनश्री’ दिवाळी अंक २०२४)

गेल्या काही वर्षांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आपल्या तंत्रज्ञानावलंबी आयुष्यात परवलीचे शब्द बनले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (‘एआय’) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने जगाला भुरळ घातली आहे, उत्साह आणलाय पण काहीशी भीतीदेखील निर्माण केलीय. विचार करणारी, प्रतिसाद देणारी बुद्धिमान यंत्रप्रणाली आता अर्थव्यवस्था, बाजारपेठा आणि आपले जीवन बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘एआय’ एक ‘गेम चेंजर’ ठरले यात काही शंका नाही.

‘कृत्रिम बुद्धिमता’ म्हणजे संगणकांकडून मानवी बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या कृती करवून घेणे. याद्वारे संगणकासाठी हुशार, निर्णयक्षम, भाषा समजणारे प्रोग्राम तयार केले जातात. ‘एआय’चा वापर हल्ली दैनंदिन जगण्यात केला जातो, जसे की समाजमाध्यमांचा वापर, बँकिंग-सुविधा, डॉक्टरची अपॉईंटमेंट, स्मार्टफोन अॅपस् किंवा अगदी थेट स्वनियंत्रित, कार्यकुशल यंत्रमानव तयार करणे. ‘चॅट-जीपीटी’च्या आगमनाने माहितीचे संश्लेषण करणारी, प्रश्नांना उत्तर देणारी, मानवासारखा मजकूर तयार करण्यास सक्षम असलेली भाषा-प्रक्रिया उपलब्ध झाली आणि आधुनिक तांत्रिक जगात आणखी एक क्रांती झाली.

‘एआय’मध्ये प्रतिसादाची, निर्णय घेण्याची, प्रक्रिया सुधारण्याची आणि गुंतागुंतीच्या समस्या हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे ज्यामुळे समाजजीवनावर सकारात्मक परिणाम होतोय. थोडक्यात तंत्रज्ञान आणि गरज यांचा हा परिपूर्ण मिलाफ आहे. आतापर्यंत ‘एआय’ला लिहिता-वाचता येत होतं, पण भाव समजत नव्हता. पण आता हे झपाट्याने बदलले आहे. ‘चॅट-जीपीटी’सारखी प्रणाली, मशीनला मानवी भाषा समजून घेण्यास आणि मानवासारखे संवाद आणि साहित्य तयार करण्यास सक्षम करते. आधुनिक ‘जीएआय’ प्रणाली विद्यमान डेटामधून नवीन मजकूर, प्रतिमा आणि इतर माध्यमे तयार करण्यास सक्षम आहेत. विचार- संशोधन, अहवाल, बातम्या, भाषणे, कविता, गाणी, ध्वनीचित्रफिती अश्या नानाविध सर्जनशील क्षेत्रांत ‘एआय’ योगदान देऊ लागलेय.

‘एआय’ जागतिक अर्थकारणात असा बदल घडवून आणत आहे जसा की पूर्वी वीज किंवा वाफेच्या इंजिनच्या शोधाने त्या काळात घडवून आणला. सेवा क्षेत्र आणि उद्योगांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स, सायबर सिक्युरिटी, सर्च इंजिन, माहिती तंत्रज्ञान अश्या विभागांतून रोजगारांच्या करोडो संधी निर्माण होत आहेत. शिक्षण, आरोग्यसेवा, वित्त, औषधनिर्माण, क्रीडा, मनोरंजन, अंतराळविज्ञान अश्या आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’ने शिरकाव केला आहे.

आज जागतिक रोजगारांपैकी जवळजवळ ४० टक्के ‘एआय’वर अवलंबून आहेत. ‘एआय’ला वेगळे ठरवणारी एक गोष्ट म्हणजे उच्च-कुशलता नोकऱ्यांवर परिणाम करण्याची क्षमता. परिणामी उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत प्रगत अर्थव्यवस्थांना ‘एआय’कडून अधिक जोखीम वाटतेय. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये सुमारे ६० टक्के नोकऱ्यांवर ‘एआय’चा परिणाम होऊ शकतो. जवळजवळ अर्ध्या नोकऱ्यांना ‘एआय’चा फायदा होऊ शकतो, उत्पादकता वाढू शकते; तर इतर उर्वरित क्षेत्रांमध्ये कामगारांची मागणी कमी होऊ शकते. यामुळे भरती आणि वेतन कमी होऊ शकते आणि अधिक वाईट म्हणजे यापैकी काही नोकऱ्या अदृश्य होऊ शकतात.

सध्या बऱ्याच देशांकडे ‘एआय’च्या फायद्यांचा वापर करण्यासाठी पायाभूत सुविधा किंवा कुशल मनुष्यबळ नाही. काहींच्या मते यामुळे कालांतराने हे तंत्रज्ञान राष्ट्रांमधील असमानता वाढवू शकते. ‘एआय’ कामगारांना त्यांची उत्पादकता अधिक वेगाने वाढविण्यात मदत करू शकते. तरुण कामगारांना संधींचा फायदा घेणे सोपे वाटू शकते, तर ज्येष्ठ कामगारांना जुळवून घेण्यास संघर्ष करावा लागू शकतो. काही समाजशास्त्रज्ञांना ‘एआय’ संदर्भात सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा जाळे स्थापित करणे आणि असुरक्षित कामगारांसाठी पुनर्प्रशिक्षण कार्यक्रम आखणे महत्वाचे वाटते. असे केल्याने ‘एआय’-संक्रमण अधिक सर्वसमावेशक बनू शकते, उपजीविकेचे रक्षण होऊन विषमतेला आळा बसू शकतो असे त्यांना वाटते. ‘एआय’च्या प्रस्थामुळे काही व्यवसाय बंद होतील असे काहींचे मत आहे. उलट या तांत्रिक प्रगतीमुळे नवीन उद्योग, व्यवसाय, कौशल्य संच आणि करिअर्स तयार होतात, असे काहींचे मत पडते.

‘एआय’च्या इतर धोके व आव्हानांबाबत बोलायचे झाले तर, ‘चॅटजीपीटी’सारख्या ‘जीएआय’ प्रणालींच्या व्यापक वापरामुळे सायबर हल्ले आणि ऑनलाइन फसवणुकीचे धोके लक्षणियरित्या वाढतात. जसजसे तंत्रज्ञान मानवी भाषा आत्मसात करण्यात आणि प्रतिमा तयार करण्यात चांगले होत जाईल, तसतसे ‘ओळख-चोरी’चा धोका वाढेल. शक्तिशाली ‘एआय’ प्रणालीमध्ये खाजगी व्यक्तींचा डेटा गोळा करण्याची, वापरण्याची आणि संभाव्य गैरवापर करण्याची अभूतपूर्व क्षमता असल्याने, हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या बाबतीत नवीन आव्हाने उभी करतो. ‘एआय’ उपलब्ध मजकूर आणि प्रतिमा वाचत असल्याने ‘बौद्धिक संपदा हक्क’ राखण्याचे आव्हान समोर ठाकते.

भारतीय परिप्रेक्षात बघायचे झाल्यास भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेने २०१४ मध्ये एकूण जीडीपीमध्ये ४ ते ४.५ टक्के योगदान दिले. २०२६ पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता ‘अर्थ मंत्रालया’च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भारताची डिजिटल अर्थव्यवस्था २०१९ मध्ये २०० अब्ज अमेरिकन डॉलर्स होती ती २०२५ पर्यंत ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ‘एआय’ हे क्रांतिकारी तंत्रज्ञान डिजिटल अर्थव्यवस्थेत अनेक जटिल प्रक्रिया सुलभ करत आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि ‘एआय’, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीस अनेक पटींनी चालना देतायत. अर्थव्यवस्थेत उद्योगनिहाय ‘एआय’चा उपयोग व प्रभाव खालीलप्रमाणे सांगता येईल-

बँकिंग आणि फायनान्स : बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये ‘एआय’ क्रांती घडवून आणत आहे. याच्या मदतीने बँका मौल्यवान मनुष्यबळ इतर गुणात्मक कामांसाठी वापरू शकतात, कार्यालयीन खर्चात कपात करून कामे वेळेत पूर्ण करू शकतात. ‘चॅटबॉट्स’च्या सहाय्याने बँकां २४*७ ग्राहकसहाय्य प्रदान करीत आहेत. ‘मशीन लर्निंग’मुळे फसवणूक लवकर शोधणे आणि चांगले नियामक अनुपालन करणे शक्य होते. सुयोग्य कर्ज आणि पतपुरवठा धोरण राबवणे व ग्राहकांचा व्यवहार इतिहास समजून घेणे ‘एआय’मुळे सुलभ होते.

ई-कॉमर्स : आज ‘ई-कॉमर्स’मध्ये अधिकाधिक ‘एआय’ फीचर्स प्रवेश करत आहेत. ‘मशीन लर्निंग’च्या मदतीने कार्यक्षमता, विक्री आणि सेवा दर्जा वाढविण्यासाठी ग्राहकांच्या वर्तनाचा डेटा मिळवला जातो. ग्राहकांच्या मागील खरेदीवर आधारित व्यक्तिगत शिफारसी आता ई-कॉमर्सचे सामान्य वैशिष्ट्य आहे. क्रेडिट कार्ड फसवणुकीचा सामना करण्यासाठी, ऑर्डर्स शोधण्यासाठी याचा वापर होतो. ‘एआय’-संचालित ‘चॅटबॉट्स’ ग्राहकांना गुंतवून ठेवण्याच्या दृष्टीने आदर्श बनत आहेत. विविध स्थानिक भाषा वापरुन ‘चॅटबॉट्स’द्वारे ग्राहक संबंध सुधारण्यावर भर दिला जातो.

सुरक्षा आणि पाळत ठेवणे : ‘एआय’ सुरक्षा उपायांची कार्यक्षमता आणि विविधता वाढवून ‘सुरक्षा आणि देखरेख’ कार्यप्रणालीमध्ये मोठी भूमिका बजावत आहे. चांगल्या देखरेख यंत्रणेमध्ये ‘बुद्धिमान चित्रफीत विश्लेषण’ आणि ‘चेहऱ्याची ओळख’ यांच्या आधुनिक प्रणाली वापरल्या जातात. प्रभावी ‘एआय’मुळे ‘डेटाचा नेमका वापर होतो. नमुने ओळखण्यासाठी डेटा आणि ‘प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स’च्या मदतीने पूर्वसूचना दिल्या जातात. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तातडीने निर्णय घेण्यास मदत होते.

पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स : ‘एआय’मुळे डेटा विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स उद्योगात वेगाने बदल होत आहेत. ‘एआय’-संचालित कार्यक्षम निर्णयप्रक्रियेच्या मदतीने कामकाज सुरळीत ठेवले जाते. गुणवत्ता नियंत्रण, सूची व्यवस्थापन आणि जोखीम मूल्यांकनात देखील ‘एआय’ मदत करते. मागणी-पुरवठ्याचा चांगला अंदाज लावला जातो आणि स्वयंचलित लॉजिस्टिक्सला चालना मिळते.

आयटी आणि क्लायंट रिलेशन्स : ‘आयटी’ अर्थात ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ हा एक व्यापक शब्द असून त्यात हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंगच्या विविध गोष्टींचा समावेश होतो. ‘मशीन लर्निंग’ आणि ‘एआय’मुळे क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी आणि ‘डेटा मॅनेजमेंट अँड अॅनालिटिक्स’ सारख्या संलग्न क्षेत्रांमध्ये मोठी वाढ होत आहे. ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यांत सकारात्मक बदल घडत आहेत. नैसर्गिक भाषा प्रक्रिया, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स आणि ‘क्यूए चाचणी’ हे ‘एआय’चे इतर घटक, कार्यक्षम आणि भविष्यवेधी साधने म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातायत.

आरोग्यसेवा : ‘एआय’चा प्रभाव ‘हेल्थकेअर इंडस्ट्री’मध्येही दिसू लागला आहे. सध्या त्याचा अवलंब प्रामुख्याने प्राथमिक स्तरावरील संशोधन प्रयोगशाळा आणि उच्च शिक्षणामध्ये केला जातो. संशोधन, आरोग्यचाचण्या, वैद्यकीय उपकरणे, रुग्णांचा तपशील यामध्ये याचा हळूहळू वापर होऊ लागला आहे.

कृषी / शेतकी : हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, पीक उत्पादन अनुकूल करण्यासाठी आणि कीटकांचे धोके ओळखण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ज्यामुळे शेतीपद्धती अधिक माहितीपूर्ण आणि उत्पादक बनवून भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला जात आहे.

शिक्षण / अध्यापन : व्यक्तिगत शिक्षणानुभव सुधारून, संस्थांसाठी प्रशासकीय कार्ये स्वयंचलित करून आणि भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी भाषांतर सेवा प्रदान करून, ‘एआय’ भारतातील शिक्षणपद्धतीला नवीन आकार देत आहे.

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत ‘एआय’ लागू करण्याची आव्हाने –

à ‘एआय’चा लाभ घेण्यासाठी सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा तयार करणे.

à देशातील विविध राज्यांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधांमधील तफावत कमी करणे.

à शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करणे आवश्यक.

à विश्वासार्ह आणि स्वस्त इंटरनेट जोडणीचा अनेक ठिकाणचा अभाव दूर करणे.

à कर्मचाऱ्यांना कुशल बनविण्यासाठी गुंतवणूकीची आवश्यकता.

à ‘एआय’ आणि ‘मशीन लर्निंग’मध्ये विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज.

à डेटा गोपनीयता. ‘युरो मानका’शी स्पर्धा करणारे ‘डेटा संरक्षण धोरण’ ही काळाची गरज.

à एक शाश्वत ‘एआय’ इकोसिस्टम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे, जी नैतिक विचार आणि समान संधीस प्राधान्य देईल.

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेस चालना –

à रोजगारनिर्मिती – ‘एआय’ सर्व क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देते. यामुळे केवळ नवीन उत्पादने आणि सेवाच तयार होत नाहीत तर रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतात.

à तांत्रिक प्रगती – भारताच्या वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे ‘एआय’ संशोधन आणि विकासात वाढ होत आहे. या उपक्रमांना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे पाठबळ मिळत आहे.

à ‘एआय’-संचालित नवकल्पना आर्थिक उपक्रमांना चालना देताना व्यवसायाच्या नवीन संधी आणि बाजारपेठ तयार करतात.

à गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी स्टार्टअप्स आणि टेक कंपन्या ‘एआय’चा वापर करतात.

à कोविड-१९ महामारीनंतर डिजिटायझेशन आणि ‘एआय’च्या वापराची गरज आणखी वाढली आहे.

à ‘एआय’द्वारे आरोग्य संशोधन आणि रुग्णसेवा यांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. ग्रामीण भागामध्ये आरोग्यनिदान साधने आणि टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मला बळ मिळाल्याने, शहरी-ग्रामीण आरोग्य सेवेची दरी भरून काढण्यास मदत होत आहे.

à विविध उद्योगांमध्ये प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी, व्यावहारिक खर्च कमी करण्यासाठी ‘एआय’-आधारित प्रणाली तैनात केली गेल्याने, उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेत सुधार होऊन इतर संबंधित प्रक्रिया बळकट होतात.

à ‘एआय’मुळे बँकिंग, पतपुरवठा, विमा अश्या वित्तीय सेवाक्षेत्रामध्ये जणू क्रांती घडत आहे. यामुळे कार्यक्षमता आणि ग्राहकांचे समाधान यांत वृद्धी झाल्याने अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत आहे.

एकंदरीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे भारताची जागतिक आर्थिक पटलावर स्थिती मजबूत होताना दिसते. शाश्वत विकास आणि समृद्ध भविष्याचे आश्वासन ‘एआय’द्वारे लाभल्याने, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने भरारी घेण्यास सिद्ध झाला आहे.

( संदर्भ :- International Monetary Fund, Bank of America Research Paper )

गुरुप्रसाद दि पणदूरकर.