एका श्रावणातली ( पुनर्प्रदर्शित )गोष्ट .
आमच्या गाडीने मलकापूर सोडलं आणि कोकरूडमार्गे पुण्याला जाण्यासाठी गाडी वळली . पावसाची हलकी सर पडून गेली होती . गाडीने गती घेतली .पुढच्या उतारावर खूप छान दृश्य होतं . मोकळ्या रस्त्यावर दोन चिमण्या ,रस्त्यावरच्या अगदी लहानशा खड्यात साठलेल्या पाण्यात चोच बुडवून तहान भागवत होत्या . दृश्य खरंच मनोवेधक होतं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ .डाव्या हाताला एक घर .डांबरी सडक नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळं ताजीतवानी झालेली . हवेत छानसा गारवा .आणि दूरवर क्षितिजापाशी निळ्या ढगांच्या आश्रयाला आलेले तुरळक काळे ढग .
मी ड्रायव्हरकडे पाहिलं .तो समोर पाहत होता . गाडी जवळ येण्याची चाहूल लागल्यावर चिमण्यांची उडण्याची हालचाल आम्ही दोघांनीही पाहिली . ड्रायव्हरने नकळत सोडलेला निःश्वास मला जाणवला , पण पुढच्याच क्षणाला त्याने करकचून ब्रेक मारला . आम्ही सगळे धडपडलो. पण काही कळायच्या आत ड्रायव्हर दार उघडून पाण्याची बाटली घेऊन पाठी पळाला . काय झालं हे बघायला मीही त्याच्यापाठून गेलो . आणि बघतच राहिलो .
डबडबल्या डोळ्यांनी ड्रायव्हरने त्याच्या जवळच्या रुमालात चिमणी उचलून घेतली होती. तिचा इवलासा ऊर धपापत होता . थरथर कापत होती ती . एक पंख अर्धवट तुटल्या स्थितीत फडफडत होता . चोच आ वासून तो इवलासा जीव पाण्याची याचना करताना दिसत होता . ड्रायव्हरने माझ्याकडे पाहिले . मी त्याच्या हातातल्या रूमालावर पाणी ओतले . त्याने काळजीपूर्वक एकेक थेंब त्या चोचीत सोडायला सुरुवात केली . आणि काही सेकंदातच त्या चिमणीने हलकेच डोळे उघडले . आता तो जीव भेदरलेल्या नजरेने इकडेतिकडे पाहू लागला . त्राण नसल्यानं अगतिक होऊन चिमणीची मान खाली पडत होती . पण शोष पडल्यावर मान उंचावून पाण्याच्या थेंबासाठी चोच उघडत होती . माझेही डोळे एव्हाना भरून आले होते . आम्ही दोघेही निःशब्द होतो . अचानक आम्हाला दुसरी चिमणी दिसली .तिचा आवाज ऐकू आल्यावर ओंजळीतली चिमणी कावरीबावरी झाली . उडण्याची धडपड करू लागली . शेवटी आम्ही चांगली हिरवळ बघून त्यावर चिमणीला अलगद ठेवून दिलं . पण दुसरी चिमणी जवळ येत नव्हती .मग पुन्हा आम्ही लहानशा झुडुपात तिला ठेवलं आणि दूर जाऊन उभे राहिलो . दुसऱ्या चिमणीने एकदा आमच्याकडे आणि नंतर झुडुपावर ठेवलेल्या त्या गलितगात्र जिवाकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी दुसरी चिमणी झुडुपाकडे झेपावली .आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात एव्हाना श्रावणसरी झरायला लागल्या होत्या .
हिरवंगार रान प्रसन्नचित्तानं डोलत होतं …!