साहित्य विश्व

  • शिक्षणसम्राटाचे वारस

     
    अरविंद खानोलकर

    भाऊसाहेब दोडके पाटील हे महाराष्ट्रातील शिक्षण सम्राटांपैकी एक. इंजिनिअरींग, मेडीकल, मॅनेजमेंट, अशा सर्व प्रकारची महाविद्यालये त्यांच्या संस्थेशी संलग्न होती आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होती. अशा शिक्षणसम्राटांनी लोकांची गरज ओळखली. मोजक्या जागामुळे आधीची व्यवस्था फार अपुरी पडत होती. आपल्याला काहीं त्या संस्थांचं ॲाडीट करायचं नाही. आपल्याला फक्त दोडके पाटीलांच्या वारसांच यशवंतांकडे आलेलं प्रकरण पहायचंय.शिक्षणसंस्थेचा ट्रस्ट असतो. विश्वस्त असतात पण अधिकार सर्व सम्राटांकडेच असतात. आताच्या दिवसांत शिक्षणाकडे फक्त उदात्त दृष्टीकोनांतून पाहिलं जात नाही. तो ही एक व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटला तर नफा तोटा आलाच की.

    शिक्षण संस्था चालवणाऱ्याची ती खाजगी मालमत्ताच असते. भाऊसाहेब दोडके पाटील आपल्यामागे कोणाला आपला शिक्षण सम्राटाचा वारसा सोपवणार, ह्या बद्दल लोकांच्यात चर्चा चालू असे. त्यांचे दोन पुत्र होते. त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता फारशी नव्हती. त्यामुळे त्यांनी मृत्यूपत्राप्रमाणेच शिक्षण संस्थेचे अधिकार त्यांनी सोपवायचे होते. त्यांचे दोघे पुत्र त्यांनी त्यांच्याच उद्योगात नेमले होते. मुलांना द्यायला बक्कळ पैसा होता. हा शिक्षणाचा वारसा कुणाकडे द्यायचा हा त्यांना प्रश्न होता. यशवंत धुरंधरांची आणि त्यांची जुनी मैत्री. ते यशवंतांचा सल्ला घ्यायला आले होते. यशवंतांना माहित होतं की दोडके पाटीलांनी स्वत:चं शिक्षण मेहनतीने पूर्ण केलं होतं. पीएचडी पण मिळवली होती.

  • तुला शिकवीन चांगलाच धडा

     
    डॉ. राजेंद्र श्रीवास्तव

    त्यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि ते सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागले. एका मागे एक गाड्या यंत्रवत उभ्या रहात गेल्या. नेहमीच हो काही क्षणांची प्रतीक्षा सतीश कुमार यांच्यासाठी विचित्र प्रकारची असते. अश्याच कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशीच याची तुलना होऊ शकते. अशा व्यक्तीच्या मनात न कुठले विचार असतात… न समोर बघण्यासारखे एखादे दृश्य असते. ती व्यक्ती अचल, स्थिर असते. आपल्यातच मग्न असते. जगात काय घडते आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाच नसते. जे काही घडते आहे त्याच्याशी तिला काही घेणे देणे नसते. सिग्नलवर देखील लाल, हिरवा दिवा बघण्याशिवाय त्या व्यक्तीच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. कोणतीही कविता, कोणतेही गीत नसते. फक्त इतकेच लक्ष असते की, दिवा हिरवा होईल तेंव्हा एक्सीलेटर वरचा पाय दाबून कारला गती द्यायची आहे.

    नऊ वाजले होते आणि सतीश कुमार यांना भूक लागली होती. ते घाईने घरी पोहोचण्यासाठी बेचैन होते. पण शहरातील ही गर्दी पंधरा मिनिटाचा रस्ता एक तासाचा करते.

  • दारासिंग ची पिंकी

     
    संजीव गोखले

    गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.

  • गुगल आजी

    गुगल आजी

     
    व्यास क्रिएशन्स

    आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.

    घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.

  • संगव्वा

     
    नितीन म. कंधारकर

    ‘ये कडुभाड्या, तुज्या तोंडात माती घातली तुज्या…’ कोंबडा आरवायच्या आत संगव्वाची अशी शिवी ऐकल्यावरच गल्ली उठायची. तुराट्याच्या झाडूने झाडण्याचा खर्रखर्र आवाज आणि संगव्वाच्या आरडाओरड्याने दिवसाची सुरूवात व्हायची. आजही कुणीतरी मुद्दाम किंवा नकळत तिची खोड काढलेली होती किंवा झाडलेल्या जागेत पचकन थुंकले होते. तिचा तोंडपट्टा तोफेप्रमाणे धडधडू लागला. गल्लीतून वळून ती व्यक्ती दिसेनाशी होईपर्यंत ती आपल्या पोतडीतल्या अगणित शिव्या हासडत होती.

  • आधुनिक काशियात्रा

     
    विनायक रा. अत्रे

    रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. ‘रोजची पहाटच्या दिवाळी अंकाची ओरात तयारी चालू होती आणि या काकांचा पत्ताच नव्हता! काकांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण असायचे. आपल्या टकलावर अतिरागाचा ठेका धरत ते ओरडले.

  • पार्क आणि हिरवळ

     
    सुनील गोबुरे

    हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!!
    म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे.
    आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना?
    (विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..)

    झालंय काय की पार्क मधे दोन नवीन ‘चेहरे’ येउ लागलेत. त्यामुळे माॕर्नींग वाॕक मधे अचानक माझा इंटरेस्ट वाढलाय.

    म्हणजे कसंय पहा..वयाच्या चाळीशीत आल्यावर आम्हा पुरुषांना कसं आता आपल्या वयाला व तब्येतीला मानवतील अशाच चेह-यांकडे पहावेसे वाटणे हे स्वाभाविकपणेच होते. हे नवीन चेहरेही ‘तसेच’ आहेत.

    आता या वयात टीन एजर्स कडे पहाणेही होत नाही व मनाला पटतही नाही. तसे चांगले चेहरे त्या वयोगटातही असतात..पण शेवटी ‘नाथा कामताच्या’ शब्दात बोलायचं तर “बाबा रे..’त्यांचं’ जग वेगळं..’आपलं’ जग वेगळं..”

  • पाटलाचा वाडा

     
    गोडाती बबनराव काळे

    गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता.सोंडु पाटील मंजे लयच ईरसाल आसामी व्हता.मनल तं साधा भोळा,नाय तं खुनशी,कपटी, पक्का धुर्त आन मुरलेला राजकारणी व्हता.तसेच त्यो रगेल आन रंगेलबी व्हता.आख्ख गाव त्याच्यापुढं सळसळ करायच.सोंडु पाटलान नुसते डोळे जरी वटारले तरी सगळा गाव चिडीचूप व्हयाचा,एवढी धमक आन दरारा व्हता त्याच्यात.मंधल्या काळात बाईचाबी नांद लागल्याच ऐकीवात व्हतं.शेजारच्याच गावच्या मंजुळा नावच्या कोल्हाटणीवर त्याचा लय जीव जडला व्हता.बाईचा नांदच लय वेगळा आसतो.नांदानंदात गड्यानं मंजुळेल तमाशाच्या फडावरून उचलुन डायरेक आपल्या शेतातल्या आखाड्यावर ठुल व्हतं.असो तं पाटलान आपल्या खाजगी जिवनाल कव्हाच आपल्या सार्वजनिक जिवनावर हावी व्हवु देल नाही.

  • गुन्हा कुणाचां? शिक्षा कुणा?

     
    व्यंकट पाटील

    सकाळी उठलो, दरवाजा उघडून नेहमी प्रमाणे वर्तमानपत्र हातात घेतलं, इंग्रजी वर्तमान पत्रातील एका बातमीवर माझी नजर गेली. बातमीला जे टायटल दिलं होतं, ते वाचलं. बातमी वाचण्या अगोदरच अंगावर रोमांच उभा राहिला.

    मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं.

    पण तरीही प्रत्येक माणसांमध्ये माणुसकीचा, प्रेमाचा एक कप्पा असतो. तसा माझ्यातला जागा झाला. बातमीच तशी होती. इंग्रजी टायटल होतं. Convicted and Punishment दोन्हीही शब्दांचा अर्थ पाहिला तर पहिला शब्द Convicted म्हणजे शाबीत म्हणजे न्यायालयात एखाद्या अपराध्याचा अपराध सिध्द होतो. त्याला दोषसिध्दी म्हणतात.

  • लाईफ लाईन

     
    सागर जोशी

    एकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष आता परमोच्च बिंदू वर पोहोचला … अजून एक तासभर असाच जल्लोष झाल्यावर कुलदीप ने बाकी चौघांना हातातील घड्याळ दाखवत ” चला! आता निघण्याची वेळ झाली ” असा इशारा केला आणि मोठ्या निरेच्छेने तोंड वेडीवाकडी करीत बाकी चौघे म्हणजेच संदीप, कुणाल, रणजित आणि बंटी त्या क्लब मधून बाहेर पडले,