सत्संगाने चोर सुधारले

 मराठीसृष्टी टीम

प्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.

एकदा साधू प्रात:विधीसाठी जंगलात गेला असता त्याचा पाय एके ठिकाणी एका वस्तूला अडखळला. ती एका हंड्याची कड होती. साधूने खणून पाहिले तेव्हा त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिसला. हा हंडा चोरांना दिला तर ते चोरी करणे सोडून देतील असे साधूला वाटले. त्याने चोरांना तो हंडा न्यायला सांगितले.

हंडा आणायला जाताना चौघांच्या मनात इतर तिघांना मारून एकट्यानेच ‘साऱ्या मोहरा बळकावण्याचे विचार आले. त्यांनी हंडा काढून त्याचे तोंड उघडले. पाहतात तर हंडा साप आणि विंचवांनी भरलेला. ते पाहून त्यांच्यातील आपसातील वैरभावना नष्ट झाली. त्यांना वाटले की, साधूने आपल्याला फसवले आहे. रागाने त्यांनी हंडा साधूच्या झोपडीवर फेकला पण हंडा फेकताच त्यातून सोन्याच्या मोहरा विखुरल्या गेल्या.

चारी चोरांनी साधूच्या पायावर लोळण घेतली आणि यापुढे कधीही चोरी करणार नाही आणि दीनदुबळ्यांना मदत करू अशी त्यांनी शपथ घेतली.

मराठीसृष्टी टीम