पाकिस्तानमधला प्रवेश

 अरविंद व्यं. गोखले

पाकिस्तानमधला प्रवेश
पाकिस्तानमधला प्रवेश

अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.




अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

१९९४ च्या हिवाळ्यात मी अमेरिकेला गेलो होतो. त्या वेळी दक्षिण आशियातल्या शांततेची चिंता लागून राहिलेल्या सहाजणांमध्ये दोघे पाकिस्तानी होते. त्यातल्या कराचीच्या सईद सिकंदर मेहदी यानं पहिल्याच भेटीत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला. ‘काश्मीर तुम्ही सोडून दिलंत तर तुमचे आमचे संबंध चांगले होतील’, असं तो म्हणाला. त्यावर ‘त्याला काश्मीर सोडणं हे तीनदा तलाक म्हणून बायको सोडण्याइतकं सोपं नाही’, असं सांगून ‘आम्हांला तुमच्याशी चांगले संबंध निर्माण झाले नाहीत तरी चालेल; काश्मीर आमचं आहे आणि ते आमचंच राहील’, असं मी बजावलं. त्यानंतर मात्र त्यानं माझ्याशी बोलताना कधी हा विषय काढला नाही. आम्ही दोघं चांगले मित्र झालो. तिथेच माझी गाठ पेशावरच्या रझियाशी पडली. बांगला देशीही आमच्या बरोबर होता; पण तो ‘जमाते इस्लामी शी संबंधित असल्यानं त्याचे आमचे धागे जुळलेच नाहीत. बहुतेक वेळी आम्ही तिघं म्हणजे दोघे पाकिस्तानी आणि मी एकत्र असायचो. अमेरिकेतल्या मंडळींना हा धक्का होता. अमेरिकेतला कार्यक्रम संपवून जो तो आपापल्या देशाकडे परतू लागला, तेव्हा इतर कुणाला नसेल एवढं आम्हां तिघांना वाईट वाटलं. रझियाच्या डोळ्यांत तर अश्रू तरळले. तेव्हा मी तिला सहज चेष्टेत म्हटलं, “पहा बरं, खरंच एक दिवस येऊन उभा राहीन मी पेशावरमध्ये.’

१९९६ च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खरंच पेशावरमध्ये तिच्या घरी जाऊन उभा राहिलो, तेव्हा रझियाचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. ‘गोखलेसाब आप? ‘ म्हणतानाचे तिच्या डोळ्यांतले अत्यानंदाचे ते भाव आणि न्यूयॉर्क सोडतानाचा तो चेहरा यात बरंच अंतर होतं. रझियाच्या भावांनी तर अगदी आलिंगन देऊन स्वागत केलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. फोटो काढले, म्हटलं पाहा, ‘तुमच्या माझ्यात काही फरक आहे का? ‘ त्यांच्याबरोबर जेवलो. पेशावरमध्ये फिरलो. यात कुठेही दोन राष्ट्रांतल्या शत्रुत्वाची दरी नव्हती. असाच अनुभव पाकिस्तानात सगळीकडे मला आला, हे माझं भाग्य. सर्वसामान्य पाकिस्तानी माणूस भारताविषयी वाईट बोलताना आढळत नाही. जुन्या पिढीतल्यांना आता आपला हा भारत देश कसा असेल, याविषयी उत्सुकता आहे. मधल्या वयोगटातल्यांना भारतात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं यायला मिळालं असायची शक्यता आहे. काहींचे नातलग भारतात आहेत. आईवडील इकडे, मुलगा तिकडे असंही घडलंय. काहींचे भाऊबंद इकडे आहेत. काहींच्या मुली आमच्या सुना बनल्या आहेत, तर काहींच्या मुलांची सासुरवाडी इकडची आहे. घरोब्याची ती पूर्वापार चालत आलेली पद्धत अजून निकालात निघालेली नाही; पण काही प्रमाणात ती कमी झाली आहे. स्वाभाविकच आणखी काही वर्षांनी इकडे यायला मिळणारं ते निमित्तही बंद व्हायची शक्यता आहे.

तरुण पिढीला भारत जेवढा पाहता येईल तेवढा पाहायचा आहे. इंग्लंड, अमेरिकेला काय, कधीही जायला मिळेल, भारतात जायला पाहिजे, असं त्यांना वाटतं. अगदी मनापासून वाटतं. आज झी टी.व्ही., एल. टी. व्ही. आदी केबल वाहिन्यांमुळे जग मोकळं झाल्याच्या परिणामी भारत हा आणखी आकर्षक बनलाय. पाकिस्तान रेडिओवर किंवा पाकिस्तान टी. व्ही. वर भारताचा उल्लेख ‘हिंदोस्ताँ’ असा आजही होतो; पण जनतेच्या लेखी तो ‘इंडिया’ आहे.

भारतातल्या आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम पाकिस्तानात स्वच्छपणाने ऐकू येतात. तथापि ‘ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिस’ तिथे घराघरांतून आजही प्रचंड लोकप्रिय आहे. रेडिओ सिलोन चा आता ‘श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग’ बनला आणि भारतात त्या केंद्राची लोकप्रियता घटली; पण भारतीय रेडिओ केंद्राची लोकप्रियता पाकिस्तानात घटली नाही. भारतीय लोकप्रियतेची ही एवढी एकमेव कसोटी नाही. हिंदी चित्रपटांच्या व्हिडिओ कॅसेट्स दुबई वा सिंगापूरमार्गे पाकिस्तानात पोहोचतात. भारतीय चित्रपटांविषयीचा मजकूर आणि नट-नट्यांची रंगीबेरंगी आणि प्रसंगी उघडी -वाघडी छायाचित्रं छापणारी पाकिस्तानी वृत्तपत्रं पाकिस्तानात सर्वाधिक खपतात. ‘माधुरी दीक्षित द्या आणि नुसता काश्मीरच काय, अख्खा आशिया घेऊन जा’, असं सांगणारा पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन्सचा मला भेटलेला एक वरिष्ठ अधिकारीच तेवढा वेडा होता असं नाही, असे अनेक वेडे आपल्याला पाकिस्तानात भेटू शकतात. ‘माधुरी, तुझ्या लचकणाऱ्या कमरेनं मला घायाळ बनवून सोडलंय ग…’, अशी पत्रं पाकिस्तानी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात, हे विशेष. दोन्ही देशांमध्ये असणारा तंट्याचा विषय हा त्यांच्या दृष्टीनं ‘सियासी (सरकारी) मामला’ असतो. पाकिस्तानात जर खरोखरच लोकशाही नांद लागली आणि तिथल्या घटनांवरची पाकिस्तानी लष्कराची पकड कमी झाली, तर या दोन देशांमधलं अंतर बरंच कमी होईल. बर्लिनची भिंत कोसळली तशीच या दोन देशांमधली ही कटुतेची कृत्रिम, अदृश्य भिंत कोसळायला वेळ लागणार  नाही. दोन्ही देशांमध्ये तशी जिद्द असणारी माणसं हवीत.

दोन्ही देशांमधल्या सुशिक्षित तरुणांना त्यासाठी पुढाकार घेता येईल. दोन्ही देशांमध्ये आज होणारा चोरटा व्यापार थांबला आणि खुला व्यापार सुरू झाला, तर चोरट्या मार्गानं जाणारं आणि भरपूर खपणारं बनारसी पान थेट कराचीपर्यंत जाऊन पोहोचेल. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियातून घ्यावं लागणारं पोलाद भारताकडून मिळेल आणि पाकिस्तानकडून लांब धाग्याचा कापूस भारताला मिळू शकेल. असं बरंच काही होऊ शकेल; पण प्रामुख्यानं इकडच्या-तिकडच्या हृदयांमध्ये संवाद साधला जाऊ शकेल.

‘पाकिस्ताननामा’ हे पाकिस्तानच्या तिसऱ्या भेटीच्या वेळी मी तिथूनच ‘केसरी’ साठी पाठवलेल्या वृत्तान्ताला दिलेलं सदर नाम नामा म्हणजे पत्र. पाकिस्तानातून लिहिलेली ही वार्तापत्रं पुस्तक रूपाने प्रसिद्ध करताना, त्यांत काळानुरूप बदल आवश्यक होता. आठ-नऊ वर्षांत कराची, रावळपिंडी बरीच बदलली तरी लाहोरमध्ये तेवढा बदल जाणवला नाही. माणसं तीच, त्यांच्या दुःखाचं स्वरूप कदाचित बदललं असेल. सुखी माणसाचा सदरा इथे मिळणं जसं अवघड आहे, तसाच तो तिथेही मिळू शकत नाही.

‘पाकिस्ताननामा’ हे अशा लेखांचं संकलन आहे. पाकिस्तानात जाऊ इच्छिणाऱ्यांना त्यांतून मार्गदर्शन घडावं, पाकिस्तानी माणूस कसा आहे, हे कळावं हा या लेखनामागचा उद्देश आहे. तिथला सर्वसामान्य माणूस आपला शत्रू नाही. तसं असायचं कारण नाही. पाकिस्तानात जातो तेव्हा मी तोंडावर नियंत्रण ठेवतो; पण खाण्यावर ठेवत नाही. सगळे पदार्थ आवडीचे असल्यानं माझा हात नेहमीच आडवा असतो. लाहोरमध्ये एकदा असाच मोहात पाडणाऱ्या डाळिंबाच्या उघड्यावरच्या दाण्यांचा बंपरभर रस प्यायलो आणि मग जी ‘लोटापरेड’ सुरू झाली, तिला तोड नव्हती. बरोबर नेलेल्या औषधांत त्याहीवरली गोळी असल्यानं माझ्या फेऱ्या आटोक्यात आल्या.

तिसऱ्या खेपेची पाकिस्तान भेट अधिक संस्मरणीय आणि थरारक ठरली. पेशावरमुळे त्यात रंगत आली. रावळपिंडी आणि पेशावर या दरम्यान अटक हे शहर लागतं. अटकेपलीकडे पेशावर आणि त्यापुढे काबूलच्या रस्त्यावर खैबर खिंड. त्या खिंडीपर्यंत जायला मिळण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं.

‘पाकिस्ताननामा’ मध्ये माझ्या तिथल्या तीन भेटींतल्या कडू–गोड आठवणी आणि भल्या-बुऱ्या अनुभवांचं वर्णन आहे. पाकिस्तानात दोन वेळा विश्वचषक क्रिकेटच्या निमित्तानं गेलो आणि एकदा दक्षिण आशियायी विभागीय सहकार्य परिषदेचं निमित्त मला लाभलं. इस्लामाबादच्या मुक्कामात ‘व्हिसा’ नसताना तक्षशिलेला मी जाऊन आलो. दरवेळी नवं धाडस, नवा पराक्रम.

फैज अहमद ‘फैज’ या पाकिस्तानी शायरनं ‘यहाँ से शहर को देखो’ असं सांगून ठेवलंय. तो म्हणतो-

यहाँ से शहर को देखो तो हल्का-दर- हल्का
खिंची है जेल की सूरत हर एक सम्त फ़सील
हर एक रहगुज़र गर्दिशे-असीरां है ।

( या जागेवरून तुम्ही शहर पाहा. बेताबेतानं तुम्हांला जिकडे तिकडे तुरुंगाचा चेहरा आढळून येईल. कैदीच कैदी त्या वाटेनं जात असल्याचं तुम्ही पाहाल.)

फैजसाहेब आपल्या आयुष्यातल्या मोठ्या कालखंडाला तुरुंगात घालवून बसले आणि त्यातच ते गेले. आपल्या डावेपणाला पुराणमतवाद्यांच्या देशात बट्टा न लावता ते गेले. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून पाकिस्तानी शहर पाहायचं म्हणजे पुढल्या गोष्टीची म्हणजेच तुरुंगात जायची तयारी ठेवणं आलं. अर्थात ती करणं मला अवघड होतं. पाकिस्तानात लष्करी राजवट असो, नसो, वातावरण तसंच असतं. वातावरणातला हा गूढपणा कधीच संपत नाही. अशा सर्व तऱ्हेच्या संकटांना सामोरं जाण्यामागे माझी प्रेरणा अर्थातच ‘केसरी’ ही आहे. ‘केसरी’चे विश्वस्त आणि माझे पहिले संपादक श्री. जयंतराव टिळक यांच्या प्रोत्साहनामुळेच केवळ माझे हे दौरे व्यवस्थित पार पडले. ‘पाकिस्तानला कुणी जायचं? अर्थातच तूच’, असं सांगणारे श्री. जयंतराव हे आमचे प्रेरणास्रोत आहेत.

‘केसरी’त प्रसिद्ध झालेला मजकूर प्रसिद्ध करायला परवानगी दिल्याबद्दल ‘केसरी’ चे आभार मानायचे तर ती केवळ औपचारिकताच ठरेल.

या लिखाणासाठी ज्यांनी वेळोवेळी संदर्भ उपलब्ध करून दिले, ते ‘केसरी’ चे ग्रंथपाल प्र. ग. फणसळकर आणि संपादनकार्यात सहकार्य करणाऱ्या नीलिमा चव्हाण यांचे आभार.

त्या पुस्तकात वापरलेल्या छायाचित्रांमागले हात माझे आणि कौशल्य अनिल देशपांडे यांचं आहे.

‘अक्षरांजली’ या मृत्युलेखांच्या संग्रहानंतरचं ‘पाकिस्ताननामा’ हे माझं दुसरं ग्रंथ-अपत्य. वाचकांच्या डोळ्यांदेखत ते दुडुदुडू धावू लागेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.

 
अरविंद व्यं. गोखले 
‘सरस्वती', एन- ४ निरंत वसाहत, बिबवेवाडी, पुणे - ४११०३७.