पाकिस्तानला एकदा तरी जाऊन यायचे हे माझे स्वप्न होते, ते एकदाच काय पाचदा पूर्ण झाले.
मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो. ते नेहमी पुण्यात यायचे तेव्हा मला भेटायचे. ते माझे मित्र बनले होते. कराचीत गेल्यावर त्यांना मी फोन केला, तेव्हा ते तातडीने मी ज्या ‘वायएमसीए’च्या अतिथीगृहात उतरलो होतो तिथे आले. त्यांनी मला कराचीचे संपूर्ण दर्शन घडवले. अगदी समुद्र किनाऱ्यावरही त्यांनी मला नेले. त्याच परिसरात क्लिफ्टन भाग येत असल्याचे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटले की इथेच बेनझीर भुट्टो राहात असतील ना ? त्यांनी लगेचच प्रश्न केला की, तुम्हाला त्यांना भेटायचे आहे का ? माझ्या दृष्टीने ही सुवर्णसंधी होती. म्हटले शक्य असेल तर आतासुद्धा. त्यांनी तिथल्याच एका सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावरून नाणे टाकून फोन केला. तो त्यांच्या व्यक्तीगत सचिवाने उचलला. त्याला रकिब पूनावाला यांनी सर्व काही सांगितले. तेव्हा त्या स्वत: फोनवर आल्या. त्यांच्याशी आदबीने बोलणारे रकिब मला पाहायला मिळाले. तेव्हा मला समजले की, ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे त्या भागाचे सचिव आहेत. भारतातून पाकिस्तानात जाऊन मुहाजिर म्हणून ओळख असलेली एक व्यक्ती आपल्यासाठी तेव्हाच्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याला फोन करून वेळ विचारते हेच माझ्यासाठी खूप होते. रकिब पूनावाला हे नावानेही तिथे प्रसिद्ध असतील, कारण ते पाकिस्तानच्या डॉन या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राचे छायाचित्रकार होते.
मला काही बेनझीर ओळखत नव्हत्या, ओळखणार तरी कशा ? पण भारतीय वृत्तपत्रातून तेही पुण्यातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. दरवाजावर असलेल्या दारवानाने माझी चौकशी केली. बेनजीर यांच्या सचिवाने त्याला ‘इंडिया’तून एक गेस्ट येणार आहेत हे सांगितलेले असल्याने त्याने मला आत सोडले. मी मागे वळून पाहतो तो रकिब पूनावाला मला अच्छा करत दरवाजात उभे होते. तासाभरात येतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या लाल रंगाच्या सुझुकी मोटरसायकलवर टांग टाकलीसुद्धा. आता माझी परीक्षा होती. मी आत गेलो. बेनझीर कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या. बोलणे संपले आणि मेहमाननवाझी (पाहुणचार) सुरु झाली. मला एक प्रसंग आठवतो, त्यांच्या तोंडात जिलेबी पडत होती, माझ्यातला पत्रकार जागा झाला. मी कॅमेऱ्याने ते दृश्य टिपायला लागलो, (तेव्हा मोबाईल असण्याचा प्रश्नच नव्हता) तोच त्यांच्या त्या नतद्रष्ट सचिवाने अडवले. ‘खाते वक्त किसी खवातीन साहिबाका फोटो नही निकालते’, असे म्हणून मला त्यानं पहिला पाकिस्तानी धडा शिकवला. तो जर फोटो मला मिळाला असता तर तो जगातला अत्यंत लाडिक असा फोटो ठरला असता. कल्पना करा की तुमच्या समोर एखादी सुंदर स्त्री आहे बोलता बोलता तिच्या सुंदरशा गुलाबी ओठांवर केशरी जिलबीचा तुकडा अर्धा आत आणि अर्धा बाहेर असा दिसतो आहे, तर तुम्ही काय कराल ? त्या कितीही सुंदर दिसल्या तरी त्या पाकिस्तानी होत्या आणि मी भारतीय आणि तेही पत्रकार होतो. मी तेव्हा बराच तरुण होतो तरी. पण फोटो तरी काढू शकत होतो की नाही ? पण नाही, तो सचिव तिथे कडमडला. असो, पुढे तासभर तरी आमच्या गप्पा झाल्या. ज्या या पुस्तकात आहेत. त्या तेव्हा किती सुंदर होत्या आणि त्यांच्यापासून काही फुटांवर बसून मला त्यांच्याशी बोलता कसे आले हे जगातले मोठे आश्चर्यच मानावे लागेल. त्या सुंदर होत्या, तरी त्या एका झरदारीच्या पदरात कशा पडल्या तेही आकलनाबाहेरचे होते. कारण मी तिथे असताना तरी त्या अविवाहित होत्या. लग्न नंतरचे. त्यावेळी झिया उल हक हे पाकिस्तानच्या अध्यक्षपदी होते आणि या त्यांच्या कडव्या विरोधक होत्या. त्यांचा राग त्या झियावर अधिक होता. त्यानं त्यांचा बाप फासावर चढवला होता. त्यांनी मला बरेच पदार्थ खाऊ घातले, सगळेच गोड होते. तिथे मला त्यांनी एक अंदरकी बात सांगितली होती.
त्यांनी मांसाहार सोडून दिला होता. का ? तर त्या शाकाहारात जी चांगली गोष्ट आहे ती मांसाहारात नाही, असं म्हणाय़च्या. त्यांची मुलाखत घेऊन बाहेर पडतो तोच दोन मोटारसायकलस्वार माझ्यापाशी येऊन ‘बिबीने (बेनझीर भुट्टो नावातली अद्याक्षरे) आपको क्या कहा’, असे विचारते झाले. ते मला पोलीस चौकीत घेऊन जाऊ इच्छित होते, पण मी तिथून सटकलो, अन्यथा अडकलो असतो. म्हणजे त्यांनी माझी खरडपट्टी काढली असती. असो, पाकिस्तानातल्या अशा कितीतरी गमती जमती या पुस्तकात आहेत. ज्याला इंग्रजीत आपण थ्रील म्हणतो ते मी सगळे पाकिस्तानच्या पाचही भेटींमध्ये अनुभवलेले आहे. माझी प्रत्येक पाकिस्तानभेट साहसयात्रा ठरली होती.
आताही अगदी मला अमेरिकेला जायचे की, पाकिस्तानला असे विचारले तर मी पाकिस्तानला जायला तयार होईन. आता कदाचित पूर्वीसारखे धाडस करणार नाही, पण त्या त्या वेळी काय घडेल ते सांगता येणे अवघड आहे. मला पाकिस्तानने दोनदा व्हिसा नाकारला हेही लक्षात घेतले तर मला पुन्हा पाकिस्तानचा व्हिसा मिळेल की नाही हे सांगता येणे अवघड आहे. एकदा व्हिसा का नाकारला त्याचे कारण खूपच गमतीशीर आहे. त्यावेळी पाकिस्तानच्या वकिलातीत मिनिस्टर फॉर प्रेस या पदावर असलेले मुबारक शाह यांनी एकदा माझ्याशी बातचीत करताना सांगितले, की गोखलेसाब, आपका पाकिस्ताननामा का ट्रान्सलेशन हमे मिल गया है, और शायद इसी वजहसे आपको इस दफा व्हिसा नही दिया गया है. मला व्हिसा नाकारण्यात आल्यानंतर एवढ्या स्पष्ट शब्दात कारण सांगणारा हा पाकिस्तानी माणूस नंतर तिथून बदलण्यात आला. दुसऱ्या खेपेला आम्ही एका पथकात होतो. हे पथक म्हणजे सहा-सातजणांचेच होते आणि आम्ही भगतसिंग यांच्या स्मृतीदिनासाठी पाकिस्तानात लाहोरला चाललो होतो. आम्हाला हे निमंत्रण लाहोरच्याच भगतसिंग समितीने पाठवले होते. आमची मुलाखतही तिथल्या दूतावास उपप्रमुखाने घेतली. आमचा परिचय केला जात असता आमच्या पथकात जेव्हा भगतसिंग यांचे नातू वा पणतू आणि राजगुरु यांचे नातू वा पणतू असल्याचे कळले, तेव्हा त्या व्य़क्तीने आम्हाला स्वच्छच सांगितले की, आता हे प्रकरण इस्लामाबादहूनच सोडवले जाईल. त्याला हा प्रश्न पथकातल्या त्या दोघांच्या अस्तित्वामुळे गंभीर बनल्याचे वाटत होते. जणू काही भगतसिग किंवा राजगुरु यांचे हे जवळचे वारस तिथे जाऊन काही बाँब उडवणार होते. थोडक्यात काय तर आता पाकिस्तानचे जाणे खूपच अशक्यप्राय झाले आहे.
माझे हे पाकिस्तानविषयीचे लेखन त्या सगळ्या अनुभवांवर आधारित आहे. चांगले आणि वाईट अनुभव घेतलेल्या भेटींनी मला बरेच काही शिकवले. हे पुस्तक अतिशय वाचकप्रिय ठरले आहे. ते ई बुकच्या स्वरुपात ते आणावे असा आग्रह श्री. निनाद प्रधानांनी धरला, म्हणून ते वेगळ्या स्वरूपात येऊ शकले. हा अनुभव पहिलावहिला आहे. निनाद प्रधान आणि माझी पहिली ओळख ही त्यांनी जेव्हा केसरीचा अंक १९९७ साली इंटरनेटवर आणला तेव्हापासूनची आहे. आता त्यास किती वर्षे झाली ? जेव्हा इतर कुणी त्याचा विचारही केला नव्हता तेव्हा त्यांनी ही कल्पना आम्हाला सुचवली आमच्या व्यवस्थापनाने ती मान्य केली आणि हे आंतरजाल महाजाल बनले.