वैचारिक लेखन

  • नवी अस्पृश्यता

     
    प्रकाश पोहरे

    सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.