पाटलाचा वाडा

 गोडाती बबनराव काळे

गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता.सोंडु पाटील मंजे लयच ईरसाल आसामी व्हता.मनल तं साधा भोळा,नाय तं खुनशी,कपटी, पक्का धुर्त आन मुरलेला राजकारणी व्हता.तसेच त्यो रगेल आन रंगेलबी व्हता.आख्ख गाव त्याच्यापुढं सळसळ करायच.सोंडु पाटलान नुसते डोळे जरी वटारले तरी सगळा गाव चिडीचूप व्हयाचा,एवढी धमक आन दरारा व्हता त्याच्यात.मंधल्या काळात बाईचाबी नांद लागल्याच ऐकीवात व्हतं.शेजारच्याच गावच्या मंजुळा नावच्या कोल्हाटणीवर त्याचा लय जीव जडला व्हता.बाईचा नांदच लय वेगळा आसतो.नांदानंदात गड्यानं मंजुळेल तमाशाच्या फडावरून उचलुन डायरेक आपल्या शेतातल्या आखाड्यावर ठुल व्हतं.असो तं पाटलान आपल्या खाजगी जिवनाल कव्हाच आपल्या सार्वजनिक जिवनावर हावी व्हवु देल नाही.

डगमगता वाडा

जसजसा काळ बदलला तस तसे पाटलाच्या वाड्यालबी धक्के लागले.स्वातंत्र्याचा सुर्य उगवला आण बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे लोक शिकायल लागले.स्वातंत्र्य आण समता जसजशी भिनु लागली तसतसे पाटलाच्या गढीलबी हादरे बसु लागले.आत्ता तर महारा मांगाचे लोकसुद्धा पह्यल्यासारख पाटलाल न घाबरता त्याच्या नजरेल नजर देऊ लागले.पाटिल काही मनला तं त्याच्या विरोधात खल करू लागले. एकलहाती गाव संभाळलेल्या पाटलालं हे पाहुन लाखो सुया काळजात खुपसल्यासारख्या वेदना व्हयाच्या.पाटलाचे दोन्ही पोरबी दिवटेच निंघाले.खान,पिन आन ऐशोआराम करनं यातच त्यांना समाधान वाटायच. गावात बी पाटलाचा दबदबा कमी झालता.जुणे दिस आठवुन पाटील वाड्याच्या वसरीवर बसुन किडा लागलेल्या माळवदाच्या भितील पडलेल्या भेगांकडं टक्क लावुन बघायचा.आयुष्यभर दुसर्‍यायल फरमानकं सोडणारा पाटील आज मलुल झालता.वयबी झालतं.आत्ता पह्यल्यासारखा रूबाब,रूतबा शाबीत राह्यला नवता.ऐंदी पोरायनं दरसाली थोडं थोडं करत सगळ रान ईकत आनल व्हतं.गावात महाराचा रामज्या लय शिकुन आलता.त्याल त्या काळात कोणतीबी चांगली नवकरकी लागली आस्ती पण त्यानं बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावीत व्हवुन गावात राहुनच समाजासाठी काम करायच ठरवल व्हतं.ग्रामपंचायतीत आरक्षण सुटल्यानं ते सरपंच झालतं.त्यान गावात बरेच विकासकामबी आणले व्हते.हळुहळु पाटलाच्या गटाचा एकेक माणुस त्याल जाऊन मिळत व्हता.कायबी झालं तरी झुकायच नाही आसा पाटलाचा सभाव व्हता.

दिवसामाघ दिवस जात होते तसतसा पाटलाचा सातबारा कमीकमीच व्हत व्हता.आत्ता तर वाड्याच्या भिंतीतील चिरे बी निखळुन पडु लागले व्हते.राजासारखे साम्राज्य भोगलेल्या पाटलाचं घर आत्ता दोन येळच्या जेवनालंबी महाग झालतं.अशातच ग्रामपंचायतीत शिपायाच्या जागा निघाल्या.पाटलाचा मोठा दिवटा दहावीलोक कसा बसा शिकला व्हता.पाटलाल वाटल बाप्पा शिपाईजरी झाल तरी चालल कमीत कमी त्याच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न सुटल.त्यानं रामज्या सरपंचाल भेटुन पोराल शिपाई मनुन घ्या मनत हातच जोडले.त्याच्या मनात पाटलाबद्दल आदर व्हता पण ते ईचाराचाबी पक्का वजे व्हयील ते घटनेनुसारच आस त्याच मनन व्हतं.त्यानं सरळ सांगल की पाटील या पदासाठी आपण एक परीक्षा ठुली आहे.जे पास व्हयील त्यालच आपण घेणार होतं.

पाटलालं लयच खजील झाल्यासारक वाटलं.उभ्या आयुष्यात त्यानं कोणापुढच हात पसरले नवते.एकेकाळी गावावर एकहाती सत्ता गाजवणार्‍या पाटलाल आज महारा मांगायपुढ हात पसरावं लागत व्हते.आज त्याच्या शब्दायल किंमत राह्यली नवती.ते मुकाट्यान उठुन वाड्याकडं चालत जात व्हता.चालत चालत ते वाड्याजवळ आला.वाड्याच्या भिती पोखरल्या गेलत्या.त्यातला एक एक चिरा बाहेर डोकावून पहात जणु पाटलाच्या हालातीवर हासत व्हता.बरेच चिरे तं निखळुन पडलेबी व्हते.कव्हाकाळी वैभवान नटलेला ते वाडा आज त्याल डगमगायल्यावाणी दिसत व्हता.

गोडाती बबनराव काळे 
हाताळा, हिंगोली