क्रिकेट एक बहाणा

 



‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल.




‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल. तो म्हणाला, “तुम्ही हरलात की आम्हांला युद्ध जिंकल्याचाच आनंद होतो आणि मग पुढले काही महिने इथल्या जनतेला आणि राज्यकर्त्यांना बरे जातात. जगात कुठंही, कुणाविरुद्धही आम्ही मार खाल्ला तरी हरकत नसते, पण भारताविरुद्ध मात्र तो कुठंच खाऊन चालत नसतं. ‘

वाटेत पेट्रोल पंपावर तो थांबला, तोपर्यंत आमच्यात एका अक्षरानंही संवाद झाला नाही. त्यानं पेट्रोल भरलं आणि तो गाडी चालू करणार इतक्यात मी त्याला पेट्रोलच्या भावाविषयी प्रश्न केला. तो म्हणाला, “लीटरला साडेअकरा रुपये.” त्यानं लगेच उलट प्रश्न केला, “आपके इंडिया में क्या है? ”

सप्टेंबर – ऑक्टोबर १९९७ मधली माझी ही भेट तशी फारच संस्मरणीय ठरली. नवाझ शरीफ यांच्या दुसऱ्या कारकिर्दीचा हा काळ. भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारतील, अशी अपेक्षा ठेवून असणारी दोन्ही देशांतली जनता पाकिस्तानी जनतेनं तर तसा कौलच दिला होता. नवाझ शरीफ यांनी आपल्या निवडणूक प्रचारात भारताबरोबरचे संबंध सुधारायचे आश्वासन देऊन मतं मिळवली होती. पाकिस्तान मुस्लिम लीग या त्यांच्या पक्षाच्या विरोधक पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या बेनझीर भुट्टो यांनीही शरीफ यांच्या विजयाचं हे रहस्य मान्य केलं. ‘पाकिस्तान्यांच्या दृष्टीनं क्रिकेट इतकीच भारताबरोबरच्या संबंधांची ही अफूची गोळी आजकाल चलनी नाण्यासारखी चालते…’ तो टॅक्सी ड्रायव्हर सहजच बोलून गेला.

लाहोरच्या हॉटेलपर्यंतच्या प्रवासात तो बरंच काही बोलत होता. किती सांगू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं होतं. टॅक्सीच्या मालकाला तेव्हा रोज तीनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात, असं तो म्हणाला, त्याचा अर्थ मला उमजला होता. रोज तीनशे रुपयांखेरीज आणखी तीनशे रुपये तरी त्याला मिळायला हवेत. त्यातून तो पेट्रोलसाठी किती खर्च करत असेल आणि घरखर्चासाठी त्याच्या हातात किती पैसे राहत असतील, हा प्रश्नच होता. ‘या रकमेत त्याचं व्यवस्थित भागतं का’, असं त्याला विचारल्यावर तो म्हणाला, “आज पहाटे ४ वाजता ही गाडी मी घेतली तेव्हा पहिलं गाईक त्यानंतर आठ तासांनी मला भेटलं आणि ते म्हणजे तुम्ही, म्हणजे पाहा!” तो जे काही म्हणत होता, त्यात काहीच तथ्य नसेल, असं नाही. तिथली आम जनता गांजलेली आहे. उद्या परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर काय घडेल ते सांगता येणं अवघड आहे.

‘या अशा अवस्थेत त्याला क्रिकेटच्या नावाची एक गोळी मिळाली तर काय बिघडणार आहे? राज्यकर्त्यांना आपली मनमानी तरी चालवता येईल ना…’ त्यानं एखाद्या तत्त्वज्ञान्याप्रमाणं हे मला सांगून टाकलं.

१९८७ आणि १९९६ मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचं आयोजन भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्रितरित्या केलं होतं. तथापि या दोन्ही वेळा भारत आणि पाकिस्तान यांची आमनेसामने गाठ पडली नव्हती. त्यामुळं तिथल्या जनतेला भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानी भूमीवर खेळताना पाहायला मिळालं नव्हतं. १९८७ मध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत बाद झाले आणि त्या वेळचा अंतिम सामना कलकत्त्याला असल्यानं पाकिस्तानात खेळायचा प्रश्नच येणार नव्हता. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आधीच बाद झाला, त्यामुळं लाहोरच्या अंतिम सामन्यात उतरायला लागलं नाही.

१९८९-९० मध्ये भारतीय संघ पाकिस्तानात खेळला, तो शेवटचा. त्यानंतरही त्यांच्या शब्दकोशात सामावलेलं क्रिकेटचं राजकारण इथं खेळलं गेलं नाही. या दोन संघांमध्ये तर नाहीच नाही. कराचीला भारतीय संघ उतरला आणि कराचीच्या विमानतळापासून मोटारीनं साधारणपणानं वीस मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या ‘पर्ल कॉन्टिनेन्टल’ हॉटेलमध्ये तो तासाभरानं पोहोचला. वाटेत ठिकठिकाणी भारतीय संघाचं जोरदार स्वागत झालं. सुनील गावसकर भूतकाळात डोकावून म्हणाला, “१९७८-७९ मध्ये आम्हांला एवढ्याच अंतरासाठी तीन तास लागले होते.” तो जे काही म्हणाला, त्यात चुकीचं काही नव्हतं. त्या वेळी आजच्याएवढी सुरक्षाही पुरवावी लागली नव्हती.

‘त्या वेळी भारतीय क्रिकेटपटूंना ‘तुम्ही जिंका’ या शब्दांत शुभेच्छा द्यायचा प्रकार घडला नव्हता, पण आमची तेव्हा तशी अपेक्षाही नव्हती, ‘ सुनील सांगत होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या क्रिकेट संघानं ९९७ मध्ये तोही विक्रम करून दाखवला. ‘मैदानावर जाताना आम्हांला चुकूनसुद्धा भीती वाटली नाही’, हे सचिनच्या संघाचा उपकर्णधार अजय जडेजाचं मत. तरीही कराचीतल्या सामन्याच्यावेळी प्रेक्षकांतून दगड फेकले गेले. जडेजाच्या मते चाळीस-पन्नास हजारांत चार-सहाजणच असे निघाले. मी स्वतः नॅशनल स्टेडिअमवरल्या त्या प्रसंगाचा साक्षीदार होतो.

कराचीच्या मैदानावरला प्रेक्षक खिलाडूपणासाठी कधीच प्रसिद्ध नव्हता. करांचीची तुलना सर्वच बाबतींत मुंबईशी केली जाते. मुंबईकर सहनशील आहेत, तसे कराचीवालेही आहेत. हल्ली मुंबईकर जेवढे बिघडले असतील तेवढे कराचीवालेही बिघडले, तर त्याचा दोष कुणाला देणार? लाहोरचं रांगडेपण प्रसिद्ध असलं तरी भारतीय खेळाडूनं टोलवलेल्या प्रत्येक चौकार – षटकाराला जोरदार टाळ्या द्यायचा दिलदारपणा त्याच्याकडं आहे.

इजाझ अहमदच्या नऊ षटकारांनी लाहोरचा प्रेक्षकवर्ग चक्रावला, पण त्यानं स्टेडिअम शांतपणानं सोडलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले मर्यादित षटकांचे तीन सामने पाकिस्तानात बऱ्याच दिवसांनी खेळवले जाणार होते. कराची, मग हैदराबाद आणि शेवटचा सामना लाहोर असे हे वेळापत्रक. आम्ही पत्रकार प्रवेशपत्रिका घ्यायला कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर गेलो तेव्हा कळलं, की पहिला सामना हैदराबादेत, दुसरा कराचीत आणि तिसरा ठरल्याप्रमाणं लाहोरला होईल. नॅशनल स्टेडिअमवरल्या अधिकाऱ्यानं आमचं स्वागत चांगलं केलं आणि हैदराबादलाच तुम्हाला प्रवेशपत्रिका मिळतील, असं सांगितलं. कराचीचं हॉटेल सोडून कराचीपासून १५० किलोमीटरवरल्या हैदराबादकडं अस्मादिक निघाले.

स्थळ: हैदराबादचं ‘इंडस हॉटेल’

दि. २७ सप्टेंबर, १९९७ वेळ: रात्री ९ – ३०

‘या इथं तुमच्याशिवाय किती भारतीय पत्रकार आहेत? ‘… प्रश्न कुणाचा आणि कशासाठी आहे, हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही. प्रश्न थेट भलाच होता. मी क्षण, दोन क्षण त्याच्याकडे पाहिलं. प्रश्नकर्ता अर्थातच, पाकिस्तानी गुप्तचर विभागाचा अधिकारी. ‘हाऊ मेनी इंडियन जर्नालिस्ट्स आर हिअर, इज माय सिंपल क्वेश्चन पुन्हा एकदा त्यानं माझ्या दिशेनं हा प्रश्न फेकला.

‘आय डोन्ट नो इज माय सिंपल आन्सर’… मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचा प्रयत्न केला.

डूं यू नो हू अॅम आय? ‘… तो.

‘येस्, आय कॅन अन्डरस्टॅंड इट फ्रॉम युवर लँग्वेज. ( होय, तुझ्या भाषेवरून तू कोण आहेस ते मी समजू शकतो. ) …मी.

आमच्यातला संवाद ‘हॉटेल इंड्स’ च्या स्वागत कक्षातल्या एका कोपऱ्यात सुरू होता. त्यांआधीच आमच्याशी तिथं काही पाकिस्तानी उद्योगपती चर्चा करीत होते. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकरपासून भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आर्थिक स्थितीपर्यंत सर्व विषय चर्चेत बोलले गेले. हैदराबादच्या पहिल्या सामन्याची प्रवेशपत्रिका मला मिळालेली असल्यानं तिथनू मी बाहेर पडत असतानाच थोड्या वेळापूर्वी माझ्याशी गप्पा मारणाऱ्या उद्योगपतींमधल्या एकाकडं त्यानं माझी चौकशी सुरू केली. याच उद्योगपतीनं गप्पा मारताना ‘सगळीकडं माणसं सारखीच असतात, त्यातून आपण एकाच संस्कृतीचे दोन चेहरे आहोत’, असं म्हणून भारताबरोबरचे संबंध सुधारायची पाकिस्तानची इच्छा कशी मारली जाते ते सांगितलं होतं. अगदी पढवल्याप्रमाणं बोलणारा हा उद्योगपती माझ्या पाठोपाठ बाहेर आला आणि त्यानं मला त्याच्या गाडीत बसायची विनंती केली. गाडीत बसल्यावर तो मला म्हणाला, “अगर ये कश्मीर का मसला हल हो जाए तो सभी जगह पीस होगी।”

‘काश्मीरचा प्रश्न पन्नास वर्षे बाजूला ठेवूया आणि आधी आपल्यातले सर्व तऱ्हेचे चांगले संबंध प्रस्थापित करूया’, असं इंद्रकुमार गुजराल यांनी अमेरिकेत स्पष्ट केल्याचं तो म्हणाला आणि ‘काश्मीर प्रश्न सुटल्याशिवाय पुढं जाता येणारच नाही’, असंही त्यानं सांगून टाकलं. मी त्याला म्हटलं,

“भाईसाब ये सरासर झूठ है, गुजरालसाब तो ऐसा नहीं कहेंगे, इट्स अ टोटल लाय.’ एकदा का हा ‘प्रश्न’ बाजूला ठेवू असं म्हटलं, की हा प्रश्न आहे, हे मान्य केल्यासारखं होतं, हे काही मी त्याला सांगितलं नाही.

या बोलण्यावरून आमची गाडी त्या गुप्तचर अधिकाऱ्याकडं वळली. तो अधिकारी जरा बधिरच असला पाहिजे. साधी गोष्ट आहे, प्रवेशपत्रिका वाटल्या जात असताना तो आसपास घुटमळला असता तरी त्याला भारतातून कोण आलंय आणि इथलं कोण आहे, ते कळलं असतं’, तो उद्योगपती म्हणाला. त्यानंच मला ही ‘युक्ति’ सांगितली तेव्हा मला खरंतर त्याच्याविषयीसुद्धा संशय वाटू लागला.

मी त्याला म्हटलं, “हो ना, कुणीही गुप्तचर अधिकारी आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, ते सांगणार नाही, निदान एवढ्या उघडपणानं स्पष्ट करणार नाही.’

“ये तो उल्लू का पढ़ा निकला… ” असं तो म्हणाला तेव्हा तर माझा त्याच्याविषयीचा संशय आणखीनच बळावला. पण मग पुढं त्यानं त्याचं स्पष्टीकरण दिलं, ‘आमचं तुमच्याकडे लक्ष आहे, एवढं दाखवून देण्यापुरताच त्याचा उद्देश असावा.’

” हे आपले पाहुणे आहेत आणि ते क्रिकेट ‘कव्हर’ करायला आले आहेत, त्यांना तुम्ही सतावू नका, असं मी त्याला सांगितलं आणि पिटाळून लावलं”, असं तो म्हणाला. तेवढ्यातच माझं हॉटेल आलं आणि त्याला ‘खुदा हाफिज’ करून मी आत वळलो.

हॉटेलमध्ये जेवण करून जेव्हा मी पाय मोकळे करायला बाहेर पडलो, तेव्हा एक विचित्र गोष्ट आढळली. ‘हॉटेल पॅलेस वर मी थोड्या वेळापूर्वी परतलो तेव्हा तिथं पोलिसांची गाडी नव्हती आणि आता ती उभी होती, याचा अर्थ उघड होता. हॉटेलच्या मालकाला जेव्हा मी ‘ही गाडी इथं का? ‘, असं जरा धाडस करूनच विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं, की ‘आमच्या इथं पोलीस का आले, ते का उभे आहेत, ते काय करताहेत, असे प्रश्न विचारायचे नसतात. जेव्हा या भागात मारामारी सुरू होते, तेव्हा कसेही मुडदे पडतात. एक बाजू ‘हिन्दोस्ताँ’ असते आणि दुसरी ‘पाकिस्तान !” त्याला थांबवतच मी म्हणालो, “जी बाजू वरचढ ठरते ती पाकिस्तान असेल, नाही का? ” माझ्या आवाजातला खवचटपणा त्याला जाणवला असावा.

कराचीचा पहिला सामना हैदराबादला अचानकपणानं का हालवण्यात आला, त्याची माहिती फारच गमतीशीर आहे. पाकिस्तानमधल्या वृत्तपत्रांमधून विशेषतः उर्दू वृत्तपत्रांमधून भविष्याच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्यातल्या अनेक जाहिरातींमध्ये ‘हिंदू पद्धतीनं भविष्य पाहिलं जाईल’, असं म्हटलेलं असतं. कराचीतला पहिला सामना पाकिस्तानला हरावा लागणार हे त्यांना आधी कळलं होतं म्हणून की काय, त्यांनी तो दुसऱ्या क्रमांकावर खेळवला, असं आता सांगितलं तर अनेकांना वाटेल, की तसंच घडलेलं असल्यानं मी आता तसं म्हणतोय. नाही, अगदी पहिला सामनाही खेळवला जाण्यापूर्वी पाकिस्तानातली सर्वसाधारण प्रतिक्रिया तशीच होती. कराचीचा हा पहिला सामना अपशकुनी ठरता कामा नये, असं वाटणाऱ्यांनी हा बदल केला आणि पुन्हा, “एवढं साधं तुम्हांला माहीत नाही’, असं विचारून आम्हांलाच बावळट ठरवायचा प्रयत्नही केला.

शकुन-अपशकुन यांवर पाकिस्तान्यांचा असणारा विश्वास पाहून मी थक्कच झालो; पण या ‘शकुनी’ मामाच्या पोटात आणखीही बरंच काही दडलेलं होतं. कराचीएवढाच हैदराबादचा परिसर मुहाजिरांचा भक्कम गड मानला जातो. ३० सप्टेंबर, १९८९ रोजी मुहाजिरांच्या मुडद्यांची रास ‘पाकिस्तानी रेंजर्स’ नी हैदराबादला पाडली होती. २८ रोजी कराचीत सामना खेळवला गेला असता तर ३० रोजी मुहाजिरांनी ‘हैदराबाद बंद’चा आदेश दिला असता, आणि मग पाकिस्तानी प्रशासनाच्या नाकी नऊ आले असते. त्यामुळं २८ रोजी हैदराबाद, ३० रोजी कराची आणि २ ऑक्टोबर रोजी लाहोर असं हे नवं वेळापत्रक तयार करण्यात आलं. तरीही हैदराबादच्या सामन्याच्या वेळी मुहाजिरांनी आपला स्वतंत्र ध्वज स्टेडिअममध्ये फडकावलाच, म्हणजे ‘शकुनीमामा’च खरे ठरले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेटच्या लढतीचं हे चित्र युद्धासारखं असतं. १९८९ मध्ये कराचीच्या सामन्यात अर्शद आयुबचा एकानं शर्ट पकडून विचारलं, की ‘तू मुस्लिम असूनही भारताकडून खेळतोस? तुला शरम नाही वाटत? ‘ त्या वेळी एकानं श्रीकांतचा शर्ट फाडला होता. त्या कटू आठवणींना कराचीतल्या दगडफेकीनं उजाळा मिळाला.

लाहोरच्या सामन्यातल्या पराभवानंतर लाहोरवासियांची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी मी जुन्या लाहोरच्या परिसरात गेलो. उर्दू वृत्तपत्रांमधली माहिती ही नेहमीच माझ्या ज्ञानात भर घालत असल्यानं मी ती खरेदी  करायला एका विक्रेत्यापाशी गेलो. त्याचवेळी तोंडात अर्धी जळती सिगरेट ठेवून एकजण माझ्या दिशेनं आला. ‘भाईसाब आप इंडिया के हैं? त्याच्या प्रश्नानं मी भानावर आलो. आपला परिचय त्यानं माजी लष्करी अधिकारी असा करून दिला. ‘जरा इधर आईये’ म्हणून त्यानं मला गर्दीपासून दूर चलायची खूण केली. हे नाटक तसं नवं असलं तरी तेही माझ्या अंगवळणी पडलेलं असल्यानं मी तिथं गेलो. तो एकदम काश्मीरवर बोलायला लागला. तेव्हा मी गेल्या आठ-दहा दिवसांत भारतीयच काय, पण पाकिस्तानी वृत्तपत्रंही वाचली नसल्याचं त्याला सांगितलं. ‘गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कर गोळीबार का करू लागले आहे? ‘ या प्रश्नावर मी त्याला ‘तुमची प्रचार यंत्रणा खोटारडी आहे’, असं सांगून ‘तुम्हीच निष्पाप जनतेवर तोफांचा भडिमार करता आहात’ असा आरोप केला. त्यावर तो म्हणाला, “तोफांचा भडिमार? आणि आम्ही? ते कसं शक्य आहे? काश्मीरमधल्या ‘आमच्याच जनतेला’ आम्ही कसं मारू? ” या अशा अधिकाऱ्यांच्या अंगात निगरगट्टपणा खच्चून भरलेला असतो.

पाकिस्ताननं भारतीय सरहद्दीवर केलेल्या गोळीबाराची बातमी देताना कुणी भारताच्या क्रिकेट संघाचा उल्लेख केला नाही, हे नशीबच. मात्र ‘द नेशन’ सारख्या भारदस्त वृत्तपत्रानं आपल्या अग्रलेखात ‘भारताकडून होत असलेल्या या गोळीबारामुळं पाकिस्ताननं आपल्या भारतविषयक धोरणाचा फेरविचार करावा’ अशी मागणी केल्याचं मी वाचलं होतं.

डॉन, पाकिस्तान टाइम्स, फ्रंटिअर पोस्ट, जंग, खबरे या सर्वच वृत्तपत्रांमध्ये एवढा एकसारखा दृष्टिकोन कसा येऊ शकतो, याचं मात्र मला आजवर आश्चर्य वाटत आलं आहे. पहिल्यांदा झियांसारखा लष्करशहा होता म्हणून आणि आता तो नाही म्हणून !

बहावलपूरच्या विमानतळावरून झियांनी उड्डाण केलं आणि बहुधा थेट स्वर्ग गाठला. त्यानंतरही हे भूत पाकिस्तान्यांच्या मानगुटीवर कायम आहे.