लाहोरच्या दयाळसिंग ग्रंथालयाला कोणत्याही परिस्थितीत भेट द्यायचीच, असं मी मनाशी पक्कं केलं होतं. लाहोरमधला माझा दुसरा दिवस. सकाळी हॉटेलच्या मालकाला ‘अस्सलाम आलेकूम’ करून लाहोरमधल्या वेगवेगळ्या भागांची माहिती करून घ्यायला लागलो. मी त्याला ‘इथलं सर्वांत मोठं ग्रंथालय कोणतं?’ असा सवाल केला. तेव्हा तोच म्हणाला, “तुम्हांला दयाळसिंग ग्रंथालयाबद्दल कुतूहल दिसतंय. मी लगेचच विचारलं, “हे तुम्ही कसं ओळखलंत?” त्यावर तो छद्मीपणानं हसत म्हणाला, की ‘इथे येणारे भारतीय दयाळसिंग ग्रंथालयाविषयी न चुकता विचारतात. आता तिथे तुम्हांला जे हवं ते सापडेल असं मात्र नाही.
मला जी माहिती कळली होती, त्यामुळे माझी उत्सुकता ताणली गेली होती. ‘खरे’ नावाचे कुणी एक मराठी गृहस्थ बराच काळपर्यंत तिथे ग्रंथपाल होते, ही माहिती मला कुणीतरी दिलेली असल्यानं मला तिथे जाण्यात अधिक रस होता. लाहोरच्या निकोल्सन रस्त्यावरल्या हॉटेलात मी उतरलो होतो. लाहोरचा हा भाग माझ्या बऱ्याच परिचयाचा आहे. तिथे रस्त्यावर माणूस अक्षरश: ओतला जात असतो. समोरच्या बाजूला ‘लाहोर हॉटेल’ मध्ये मी नऊ वर्षांपूर्वी उतरलो होतो. त्यापुढल्या वर्षी जेव्हा मी लाहोरला पोहोचलो, तेव्हा तिथे काहीही नव्हतं. आता त्या जागी ते हॉटेल पुन्हा उभं राहिलं आहे. बरोबर त्यांच्या मागल्या गल्लीत दयाळसिंग ग्रंथालय आहे. मागल्या खेपेला हे ग्रंथालय काही मी पाहू शकलो नाही. निस्बेट रस्त्यावर मी चालायला लागलो. समोर ‘गीताभवन’ दिसलं. इमारत तशी अगदी जुनी नव्हती, किमानपक्षी ‘गीताभवन’ ही देवनागरीतली अक्षरं नवी होती. त्या इमारतीच्या आसपास चौकशी केली, पण कुणी माहिती द्यायला तयार नव्हतं. तसाच पुढे चालत राहिलो आणि एका इमारतीवर ‘विद्या या अमृतमश्नुते’ असं लिहिल्याचं पाहिलं. ‘दयाळसिंग लायब्ररी – १९०८’ असं त्यावर लिहिलं होतं. इमारतीला कुलूप होतं. बाहेरच्या बाजूला एक आजोबा चहा पीत बसले होते. त्यांना ग्रंथालय कधी उघडेल असं विचारल्यावर ते म्हणाले, “ईदची सध्या सुट्टी सुरू आहे. पुढल्या आठवड्यात उघडेल; पण शुक्रवारी येऊ नका.
मी परगावाहून आलो असल्याची खात्रीच वाटत असली पाहिजे. पेशावरहून परतल्यावर मात्र लगेचच मी त्या ग्रंथालयात शिरलो.
या ग्रंथालयाची स्थापना १९०८ मध्ये झाली. सरदार दयाळसिंग मजिथिया यांच्या नावानं हे ग्रंथालय उभं आहे. महाराजा रणजीतसिंग यांनी मजिथा आणि परिसराचं सरदारपद देसासिंग यांना दिलं. देसासिंग यांचे दयाळसिंग हे नातू आणि लेहनासिंग यांचे चिरंजीव. महाराजा रणजीतसिंग यांनी लेहनासिंग यांना त्यांच्या शौर्यावर खूश होऊन अमृतसरचं सेनापती पद बहाल केलं होतं. रणजीतसिंगांचे पुत्र खडकसिंग यांना लेहनासिंग हे मदत करायचे. देसासिंग यांना गुजरसिंग नावाचा आणखी एक मुलगा होता. तो फार हुशार म्हणून राजदरबारी फारसा परिचित नव्हता. रणजीतसिंगांनी त्याला काही कामगिरी सांगून कलकत्त्याला ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या भेटीला पाठवलं..
आपल्याबरोबर शंभरजणांचा ताफा घेऊन हे गृहस्थ ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या भेटीला गेले आणि तिथेच एका मडमेच्या प्रेमात पडले. रणजीतसिंगांनी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीचे सिंधमधल्या शिकारपूरविषयीचे मनसुबे कोणते आहेत, ते शोधायचं काम गुजरसिंगकडे सोपवलं होतं. ते काम राहिलं बाजूला, त्यांचे वेगळेच उद्योग सुरू झाले. महाराजा रणजीतसिंगांना हे कळताच त्यांनी त्यास ताबडतोब बोलावून घेतलं. गुजरसिंगनं येताना हाताला लागतील ते ब्रिटिश दागदागिने थैल्यांमधून भरून आणले. गुजरसिंगला कोणती शिक्षा द्यायची याचे काही निश्चित आडाखे चालू असतानाच चाळीस फूट उंचीवरल्या छतावरून पडून गुजरसिंग मृत्युमुखी पडला.
ग्रंथालयात शिरल्याबरोबर माझ्या संशोधनाला सुरुवात झाली. त्याबरोबर ग्रंथालयाच्या संशोधन विभागाचे प्रमुख फकीरुल्ला सिद्दिकी माझ्या मदतीला धावून आले. ते म्हणाले, की ‘तुम्हांला कोणत्या लेखकाचे ग्रंथ इथे पहायला आवडतील ते सांगा.’ अर्थातच माझ्या तोंडून जे पहिलं नाव बाहेर पडलं ते लोकमान्यांचं होते. ‘टिळक’ या आडनावाची नोंद असणारी कार्डं मी पाहायला लागलो. ‘टिळक बी. जी.’ नावाची एकूण तीन कार्ड सापडली. त्यातल्या दोनांवर ‘आर्क्टिक होम इन द वेदाज़’ आणि ‘ओरायन’ या दोन ग्रंथांची नावं होती. तिसऱ्यावर लोकमान्यांविषयी डॉ. एस. राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या आठवणींच्या लेखाची नोंद होती. हे ग्रंथ पाहिल्यावर मला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता.
दयाळसिंग हे लाहोरमध्ये ‘निकोल्सन’ रस्त्यावर राहायचे. उन्हाळ्यात ते अमृतसरहून लाहोरला यायचे. ‘द ट्रिब्यून’ हे इंग्रजी वृत्तपत्र, लोकशिक्षणाचं एक साधन म्हणून, दयाळसिंग यांनी १८८१ मध्ये म्हणजे ‘केसरी’ ज्यावर्षी लोकमान्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला त्याच वर्षी सुरू केलं.
सुरुवातीची काही वर्षं या दैनिकाचं काम लोकमान्यांच्या ‘लाल-बाल पाल’ या त्रिमूर्तीपैकी बिपिनचंद्र पाल यांनी सांभाळलं होतं. जवळपास त्याच सुमारास लाला लजपतराय यांचा पंजाब केसरी लाहोरमधूनच गर्जना करायला लागला.
दयाळसिंग यांनी ‘निस्बेट’ रस्त्यावरल्या आपल्या घोड्याच्या पागांच्या सर्व जागा वेगवेगळ्या संस्थांना भेटीदाखल दिल्या. त्यातलीच एक जागा या ग्रंथालयानं व्यापली. हे ग्रंथालय १९०८ मध्ये सुरू झालं, तरी प्रत्यक्षात सार्वजनिक ग्रंथालय म्हणून उदयाला आलं ते १९२६ मध्ये. या ग्रंथालयात आजमितीला पावणेदोन लाख पुस्तकं आहेत. त्यात त्या काळी जी हिंदी, मराठी, संस्कृत पुस्तकं होती आणि जी फाळणीच्या वेळी धर्मांधांनी लावलेल्या आगीतून वाचली, ती आजही तिथे शाबूत आहेत. रामायण,
महाभारत हे ‘गोरखरूप प्रेसनं छापलेले ग्रंथ आजही चांगल्या अवस्थेत आहेत. कदाचित त्यांना कुणी फारसा हातही लावलेला नसला पाहिजे. बाकीच्या पुस्तकांमध्ये पुश्तू, इंग्रजी, उर्दू भाषांतले ग्रंथ आहेत. अरेबिक, फारसीमधलेही काही ग्रंथ आहेत. लोकमान्यांच्या नावाच्या कार्डानंतरचं कार्ड दुसऱ्या एका टिळकांचंच होतं. रेव्हरंड ना. बा. टिळक यांचा केवळ उल्लेख असणाऱ्या ग्रंथांची ती नोंद होती. १९२६ ते १९४७ हा काळ दयाळसिंग यांच्या मृत्युपत्रानुसार काम करायचा होता. आजही या ग्रंथालयाचं काम ‘ट्रस्ट’ च्या देखरेखीखाली होतं. १९४७ पर्यंत या ट्रस्टवर शीख आणि हिंदू होते; पण फाळणीनंतरच्या जाळपोळीला घाबरून त्यातले बरेचसे पाकिस्तान सरकारनं भारतात आलेल्या किंवा आपली मालमत्ता वाचवायच्या प्रयत्नात मारल्या गेलेल्यांची मालमत्ता ताब्यात घेणारं एक मंडळ (इव्हॅक्यूई प्रॉपर्टी बोर्ड) स्थापन केलं. त्यानंतर त्याचा कारभार अल्पसंख्याकांविषयीच्या मंत्रालयाकडून पाहिला जाऊ लागला आणि मग ते शिक्षणखात्याला जोडलं गेलं. गमतीचा भाग म्हणजे लाहोर विभागाचे आयुक्त हेच आजही या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. १९४७ पासून १९६४ पर्यंत हे ग्रंथालय बंदच होतं. या ग्रंथालयाचा कारभार पाहणाऱ्यांत आता कुणीच हिंदू वा शीख उरलेला नाही. अन्यथा त्यांची तुमची भेट घालून दिली असती,’ असं फकीरुल्ला मला म्हणाले आणि त्यापूर्वी ‘बालकराम नावाचे गृहस्थ संपूर्ण ग्रंथालय व्यवस्थित सांभाळत होते’, असंही त्यांनी सांगितलं.
मी लाहोरमध्ये असताना या ग्रंथालयाची रंगरंगोटी चालली होती. मी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं, की ‘या ग्रंथालयाचा जो मूळ रंग होता, तो जसाच्या तसा द्यायचा आमचा प्रयत्न आहे.’ मी मनात म्हणालो, ‘त्या वेळचा रंग कसा होता हे आज सांगू शकणारे कितीजण हयात असतील कुणास ठाऊक आणि मधल्या काळात सहजीवनाच्या रंगाचा बेरंग झाला, त्याला कोण काय करणार? ‘
दयाळसिंग यांच्या नावाचं महाविद्यालय ग्रंथालयाच्या जवळपासच आहे. महाविद्यालयाचं ग्रंथालय स्वतंत्र असलं तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेही वापरायची पूर्ण मुभा आहे. या ग्रंथालयाला सरकारी पातळीवर मदत करायची बुद्धी, जनरल आयुबखान यांच्या कारकिर्दीत सरकारला झाली.
ग्रंथालयात शिरल्याबरोबर डाव्या हाताला टिपू सुलतान, हैदर आणि शहाजहान यांची रेखाटनं आहेत. दयाळसिंग यांचं चित्र मात्र कुठेही दिसलं नाही. त्यासंबंधी जेव्हा मी विचारलं, तेव्हा मुख्य ग्रंथपाल नुसरत अथीर यांनी आपल्याला दयाळसिंगांचं छायाचित्र महत्प्रयासानं भारतीय दूतावासाकडून कसं मिळवावं लागलं, ते सांगितलं. एवढं होऊनही मिळालेलं ते चित्र ग्रंथालयात लावलेलं नाहीच. या बाईंना जेव्हा मी त्यांचं काम करतानाचं एक छायाचित्र टिपू का, असं विचारलं तेव्हा त्यांनी त्यास नम्रपणे नकार दिला. मला त्यांच्या या नकाराचं नवल वाटलं. त्याविषयी मी त्यांचे एक सहकारी महंमद इम्रान सिद्दिकी यांना विचारलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्याला ते चालत नसेल, असं मोघम उत्तर दिलं.
हे ग्रंथालय १९२५ ते १९४७ या काळात एक्स्चेंज बिल्डिंग किंवा ‘भारत बिल्डिंग’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत होतं. १९६० ते १९६२ या काळात ते मियाँ अल्ताफ यांच्या नावानं सुरू झालं. १९६२-६३ मध्ये महंमद अमिन हे प्रमुख बनले. पुढे पदाधिकारी बदलत राहिले. या ग्रंथालयात वृत्तपत्रं, संशोधन, बालसाहित्य असे वेगवेगळे विभाग आहेत. जीवनादर्शी, वैज्ञानिक, अद्वैतवाद, छांदोप्यनिषद, विश्व की रूपरेखा (राहुल सांकृत्यायन), प्रयागची मनोरंजन पुस्तकमाला, संगीत सुदर्शन अशी बरीच पुस्तकं मला आढळली. पंजाब आणि मुंबई प्रांतिक असेंब्लीतल्या चर्चेचं इतिवृत्त असणारे मोठे ग्रांथिक ठोकळेही तिथे आढळले. भारतीय वृत्तपत्रं या ग्रंथालयात फारशी ठेवण्यात येत नाहीत. अपवाद फक्त ‘ट्रिब्यून’ चा आहे.
दयाळसिंग यांची एवढी एकच स्मृती या निमित्तानं तिथे ताजी राहिली आहे.
लाहोरमध्ये इंग्रजांनी दिलेली जुनी नावं आजही कायम आहेत. एडवर्ड कॉलेज, एडवर्ड रोड, निकोल्सन रोड, निस्बेट रोड आदी. लाहोरच्या या ग्रंथालयाचं नाव दयाळसिंग आहे, हे आमच्यापैकी कुणालाही खटकत नाही. ते बदलायचा प्रयत्नही कुणी केलेला नाही किंवा तसा ‘वरून’ फतवा कधी आला नाही,’ असं नुसरत म्हणाल्या. यातून त्यांना बरंच काही सुचवायचं असावं, हे मी ओळखलं होतं. गर्द हिरव्या रंगाच्या सलवार-कमीजमध्ये त्या आपल्या खुर्चीत प्रशस्तपणे बसल्या होत्या. आणखी दोन वर्षांनी दयाळसिंगांची स्मृतिशताब्दी येते आहे, तेव्हा तुम्ही काही विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहात का आणि त्या कार्यक्रमाला दयाळसिंग यांच्या मजिथिया कुटुंबीयांपैकी कुणाला बोलावणार आहात का? ‘ या प्रश्नावर ‘हमने अभी तक कुछ तय नहीं किया’, असं त्या म्हणाल्या.
या ग्रंथालयाची सुरुवात दयाळसिंग यांच्या संग्रहातल्या हजार पुस्तकांनी आणि सुरुवातीच्या साठ हजार रुपयांच्या निधीतून झाली. शिवाय त्यांनी दिलेली जागा या ग्रंथालयाला वापरता आली. आज दयाळसिंगांचे वारस या परिसरात कुठेही राहात नाहीत, ते राहू शकलेही नसते. त्यांच्या जागा कुणी आणि कशा बळकावल्या असतील, ते सांगता येणं अवघड आहे. दयाळसिंग लायब्ररीचे सुरुवातीचे विश्वस्त कोण होते, त्यांची माहिती ग्रंथालयाच्या माहितीपत्रकात दिली आहे. बाबू जोगिंदर चंद्रबोस (वकील, लाहोर उच्च न्यायालय), चार्ल्स गोलकनाथ (बॅरिस्टर, लाहोर), लाला सुंदरदास (असिस्टंट सुपरिंटेंडेंट, ट्रेनिंग कॉलेज, लाहोर), लाला शिवदयाळ ( एस्पीसन कॉलेज, लाहोर), लाला श्रद्धाराम (सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी, लाहोर), लाला काशीराम ( पंजाब ब्राह्मो समाज) अशी ही नावं आहेत.
त्यांतले कुणी आज लाहोरमध्ये नाहीत. त्यांचे कुटुंबीयही तिथे नाहीत.
आजच्या विश्वस्तांत एकही शीख वा हिंदू व्यक्ती नाही. असण्याची शक्यताही नव्हतीच.
रामायण, महाभारताच्या ग्रंथांना फारसे वाचक मिळत नाहीत. हिंदी, संस्कृत ग्रंथ, कधीकाळी कुणी भारतातून आल्यास त्यांच्याकडून आणि लाहोर विद्यापीठातले या भाषांचे कुणी अभ्यासक आल्यास हाताळले जातात. दयाळसिंग ग्रंथालयाचे सर्व सेवक मला हवी असलेली माहिती इतकी झटपट देत होते, की मला जरा आश्चर्यच वाटलं.
सरदार दयाळसिंग यांचं चरित्र नवी दिल्लीचे प्रा. मदन गोपाळ यांनी लिहिलं आणि दयाळसिंग ग्रंथालयाच्या संशोधन विभागानं ते फारसे फेरफार न करता प्रसिद्ध केलं. त्याची एक प्रत मला भेट देण्यात आली. मी तिथून निघणार, तेवढ्यात सगळ्या सेवकवर्गाच्या वतीनं त्यांच्यासमवेत माझं एक छायाचित्र काढलं जावं, अशी विनंती केली. मी ती मान्य केली. छायाचित्र सोहळा संपताच अभ्यागतांसाठी ठेवलेली मोठी वही माझ्यापुढे शेऱ्यासाठी ठेवण्यात आली. मी ज्या पानावर सही करत होतो, त्याआधीची चार पानं मी सहजच उलटली. फर्ज्या इंग्रजीत लांबलचक शेरा लिहिलेला माझ्या नजरेस पडला. १९८६ मध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष लष्करशहा झिया-उल्-हक यांची तिथे सही होती.
दयाळसिंग ग्रंथालयाला भेट देऊन कृतकृत्य झाल्याची नोंद करून मी उठलो, तेव्हा महंमद युसूफ शेख हा तिथला एक सेवक पुढे आला आणि त्यानं स्वतःच्या कोटातलं पेन काढून मला भेट दिलं. ती भेट मात्र लाखमोलाची होती. कौतुकभरल्या नजरेनं भारतातल्या या पाहुण्याला त्यांनी सर्वांनीच हात उंचावून ‘अलविदा’ केलं. मागे वळून मी ‘विद्या या अमृतमश्नुते’ या बोधवाक्याकडे पुन्हा एकदा नजर टाकली आणि दयाळसिंग ग्रंथालयाचा निरोप घेतला. ग्रंथालयाचा अधिकारी वर्ग दरवाजात तसाच उभा होता.