पेशावरमधले थरारक स्वागत

 अरविंद व्यं. गोखले

पेशावरमधले थरारक स्वागत


लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. तथापि माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, की ‘तुम्ही आत्ता न जाता सकाळीच जाणं चांगलं. रावळपिंडीच्या पलीकडे घाटात गाड्या अडवून नेहमीच लुटालूट होत असते. तुम्ही भारतीय आहात.




लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. तथापि माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, की ‘तुम्ही आत्ता न जाता सकाळीच जाणं चांगलं. रावळपिंडीच्या पलीकडे घाटात गाड्या अडवून नेहमीच लुटालूट होत असते. तुम्ही भारतीय आहात.

तुम्हांला तो अनुभव येऊ नये, असं वाटतं.’ त्याचं म्हणणं ऐकून मी बसस्टँडवर चौकशीसाठी गेलो. तिथल्या व्यवस्थापकानंही दुसऱ्या दिवशी रावळपिंडीमार्गे पेशावरला जायचा सल्ला दिला. लाहोर ते रावळपिंडी हे अंतर सहा तासांचं आणि रावळपिंडी ते पेशावर हे अंतर तीन तासांचं, असा एकूण नऊ तासांचा प्रवास. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता पेशावरला निघायचा निर्णय घेतला. या खेपेच्या माझ्या पाकिस्तान दौऱ्याचं एकमेव आकर्षण पेशावर हे होतं. जिथे सहसा कोणाही भारतीयाला जायला मिळत नाही, तिथे आपल्याला जायला मिळणार म्हटल्यावर मी कोणताही धोका पत्करायला तयार झालो. या खेपेच्या दौऱ्याचा आणखी एक फायदा होता. मला पाकिस्तानमधला सर्व प्रवास बसनं करणं शक्य होतं. मागल्या खेपेला माझ्या व्हिसावर ‘बाय एअर ओन्ली’ असा शिक्का मारलेला होता. या वेळी मात्र तो मारायला ते बहुधा विसरले असावेत.

हॉटेलवर परतल्यावर तो व्यवस्थापक मला म्हणाला, “तुम्ही रमझानच्या महिन्यात इथे आहात. पुढले दोन-तीन दिवस सुट्टीचे आहेत. बसेसना चिक्कार गर्दी असेल. तेव्हा तुम्ही वेळेतच निघणं जास्त चांगलं.

आपल्याकडे उतरलेल्या पाहुण्यांची एवढी काळजी करणारा हा व्यवस्थापक  काही आगळाच होता. थोडीशी पोटपूजा करून झाल्यावर मी ताणून दिली आणि पहाटे खडबडून जेव्हा जागा झालो, तेव्हा बाहेरच्या मशिदीतून ‘अजान’ चा आवाज ऐकू आला. लाउडस्पीकरवरून पाच-दहा किलोमीटरच्या परिसरात ऐकू येईल, असा तो आवाज ऐकल्यावर पुन्हा झोप लागणं शक्य नव्हतं, म्हणून टीव्ही लावला. स्टार टीव्हीचं प्रत्येक चॅनल लावून, बंद करून त्याच्याशी खेळेपर्यंत सकाळचे सहा वाजले.

दुपारी बारा वाजता ठरल्याप्रमाणे मी लाहोरहून रावळपिंडीकडे निघालो. रावळपिंडीपर्यंतचा प्रवास हा हिंदी चित्रपटगीतांच्या संगतीतच पार पडला. वाटेत एका ठिकाणी दुपारच्या नमाजासाठी बस थांबली होती. हॉटेलमध्ये जाऊन चहा आणि सँडविचेस घेणारा मी एकमेव होतो. त्यामुळे मी कुणीतरी परका आहे, याची बसमधल्या प्रत्येकाला जाणीव झाली. त्यांना हे कळलंय याची जाणीव मला बसमध्ये परतल्यावर झाली.

रावळपिंडीला संध्याकाळी साडेसहाला पोचलो. रावळपिंडीत नेमकी उपास सोडायची वेळ झालेली असल्यानं कडाक्याच्या थंडीत हाताची घडी घालून उभा राहिलो. शेवटी अर्ध्या-पाऊण तासानं मला पेशावरला जाणारी एक छोटी बस मिळाली. रावळपिंडीहून पेशावरपर्यंतचं अंतर दीडशे किलोमीटर असल्यानं कमीतकमी तीन तासांचा वेळ लागणार हे उघड होतं. वाटेत दोन ठिकाणी घाटात पोलिसांनी बस थांबवून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बॅटरीचा झोत टाकून प्रत्येकाचा चेहरा न्याहाळला. जे एक-दोघं संशयास्पद वाटले, त्यांना खाली उतरवून त्यांची झडती घेतली. मी मात्र त्यात नव्हतो. रात्री साडेदहाच्या सुमारास मी पेशावरला पोहोचलो. स्टँडच्या समोरच एक हॉटेल दिसलं; पण तिथे उतरायची माझ्या मनाची तयारी होईना. मी रिक्षा केली आणि त्यालाच चांगल्या हॉटेलात न्यायला सांगितलं. बरंच अंतर गेल्यानंतर मी त्याला, ‘आपण नेमके कोणत्या भागात आहोत,’ असं विचारलं. त्यावर त्यानं ‘हा सदर बझार आहे’, असं सांगितलं. ‘सदर’ म्हणजे कॅन्टोन्मेंटचा भाग आणि मला तर तिथे जायला परवानगी नव्हती. कोणत्याही भारतीयाला लष्कराच्या हालचाली ज्या भागात चालतात, तिथे जायला परवानगी नसते. मी त्याला तातडीनं रिक्षा माघारी वळवायला सांगितली. तो म्हणाला, ‘का साहेब? ‘ त्याला बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नव्हती, म्हणून मी नुसतंच ‘मला गावातच राहायचं आहे’, असं सांगून मोकळा झालो. त्यावर लगेच त्यानं तक्रार केली, ‘साहेब, पुन्हा मागे जायचं म्हणजे….’ त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत, ‘मैं इसलिए माफी चाहता हूँ, जो भी किराया होगा वो मैं दे दूंगा’ असं सांगितलं. त्यानं मला हॉटेल हबीबमध्ये आणून सोडलं.

हॉटेलमध्ये पूर्ण शुकशुकाट होता. एकानं झोपलेल्या अवस्थेतच ‘क्या चाहिए? ‘ असं मला विचारलं. मी त्याला ‘रूम चाहिए’ असं सांगताच मात्र त्यानं माझं दिलखुलासपणे स्वागत केलं. भराभर दिवे लावले आणि नोंदवही भरण्यासाठी माझ्या पुढ्यात टाकली.

” आप कहाँ से आए हैं? ”

“लाहोर से । ” आणि मी नोंदवही भरू लागलो. राष्ट्रीयत्व लिहिताना मी ‘भारतीय’ असं लिहिल्यावर तो जरा टरकलाच.

” किस काम से आए हैं? ”

“क्रिकेट मॅच देखने के लिए | ”

“सिर्फ देखने के लिए और इंडिया से? ”

मग मात्र मी त्याला माझी खरी ओळख दिली.

“मैं क्रिकेट मॅच के बारे में अखबार में लिखने के लिए आया हूँ। मैं एडिटर हूँ ।” त्याबरोबर त्यानं बाकीचे काहीही प्रश्न न विचारता मला खोलीकडे नेलं. मला खोली दाखविणाऱ्यालाच मी ‘हॉटेलमध्ये काही खायला मिळेल का,’ असं विचारलं. तो म्हणाला, “साहेब ईदनिमित्त सर्व हॉटेल्स बंद असतात. आमच्या रेस्टॉरन्टमध्ये तर सलग चार दिवस सुट्टी आहे.”

ईदच्या दिवशी पाकिस्तानात घड्याळाची टिक्टिसुद्धा थांबते, असं मी ऐकलं होतं, त्याचा मला प्रत्यय आला. पाकिस्तानात सर्वत्र ईद दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारीला होती; पण पेशावरची मंडळी पहिल्यापासूनच बंडखोर असल्यानं ती आदल्या दिवशी ईद साजरी करतात. अधिकृत-अनधिकृत या वादात संपूर्ण आठवडाभरच सर्व व्यवहार थंडावतात. पेशावरला येताना त्या ड्रायव्हरनं जेव्हा चंद्र पाहून ईदविषयी अधिकृत म्हणजे सरकारी भूमिकेचा पुरस्कार केला, तेव्हा त्याच्यावर गाडीतले काही पठाण इमाम तुटून पडले. अखेर त्यानं त्या वादातून माघार घेतली.

पेशावरमधली ती रात्र पाणी पिऊनच काढावी लागणार, या कल्पनेनंच मी पहिल्यांदा पाणी पिऊन घेतलं. हॉटेलच्या त्या कर्मचाऱ्याला मी पाचारण केलं. म्हटलं, “जवळपास कुठं काही खायला मिळेल का? ” तो म्हणाला, “संपूर्ण पेशावरमध्ये एकच हॉटेल रात्री उशिरापर्यंत उघडं असतं; पण ईदमुळे तेही चालू आहे की नाही हे सांगणं अवघड आहे.” त्याला मी ते हॉटेल दाखवायची विनंती केली. त्यावर त्यानं कसलेही आढेवेढे न घेता माझ्याबरोबर यायची तयारी दर्शवली. “आप नए है नं, इस शहर के लोग आप जानते नहीं है”, असं तो म्हणाला.

हॉटेल सलातीनमध्ये आम्ही गेलो. हे हॉटेल माझ्या हॉटेलपासून जवळच होतं. मी त्याला माझ्याबरोबर जेवायचा आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “नाही साहेब, माझं जेवण मघाशीच झालंय. रोजा सोडला ना !” मी त्याला म्हटलं, “ऐसा लगता है – आप यहाँ के नहीं है।”

“जी हाँ। आपको कैसे मालूम हुआ? मैं तो रावलपिंडी का रहनेवाला हूँ।”

मी त्याला म्हटलं, “जर इथली ईद आज होती, तर तुम्ही रोजा कसा सोडला? ” तेव्हा त्यानं त्याची ईद उद्या असल्याचं सांगितलं. तरीही मी त्याला आइस्क्रीम खायचा आग्रह केला, तेव्हा तो ते खायला तयार झाला.

रावळपिंडीचा तो इमानुलखान- वय वर्षं सत्तर, नोकरीसाठी पेशावरमध्ये स्थायिक झालेला. तो इकडेतिकडे पाहात म्हणाला, “साहेब, या फाळणीमुळे आपण वेगळे झालो. वाईट झालं. आज आपण एकत्र असतो, तर जगात आपला देश पहिला ठरला असता. आपण अमेरिकेच्या पुढे गेलो असतो.” पाकिस्तानातल्या सध्याच्या भारतद्वेषाच्या वातावरणात ही हिरवळ पाहून मी सुखावलो. त्याच्या या म्हणण्याला पाकिस्तानात काडीचीही किंमत नाही, हे उघड होतं. ‘फाळणी झाली तेव्हा आपण रावळपिंडीत होतो, तरुण होतो आणि त्या वेळच्या कत्तली आपण अनुभवल्या आहेत, अगदी डोळ्यासमोरच त्या घडल्या आहेत,’ हे तो सांगत असताना त्या वेळच्या तिथल्या भीषण अवस्थेच्या आठवणींनी उमटलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपत होतो. ‘रावळपिंडीतल्या घरांच्या छपरांवर बसून हिंदू आणि शीख, ‘खबरदार, खबरदार’ असं ओरडायचे. गुंडांनी त्यांच्या दिशेनं चाल करून त्यांना संपवून टाकू नये, हा त्यांचा उद्देश असायचा; पण डोळ्यांत आग पेटलेल्या मुस्लिमांनी त्यांच्या आवाजाच्या दिशेनं गोळ्या झाडून त्यांना ठार केलेलं असायचं. लाहोर, रावळपिंडी शहरांत घरांच्या छपरांवर बसलेले ते हजारो निष्पाप जीव कधीच वर निघून गेले. त्यांचे वांडे, जमीनजुमले, त्यांच्या मालमत्ता अनेकांनी गिळंकृत केल्या की हो.’ हे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्या वेळी ज्यांनी हिंदू आणि शिखांच्या मालमत्ता बळकावल्या असतील, त्यांची तिसरी पिढी मात्र आज भारताला भेट द्यायला उत्सुक आहे. तिला भारत डोळेभरून पाहायचा आहे. त्याचवेळी भारताच्या नावानं चाललेला सरकारी पातळीवरला विषारी प्रचार ती अनुभवते आहे. इमानुलखाननं मला दिलेला धक्का मात्र जबरदस्त होता. ‘आपण एक असतो तर अमेरिकेलाही मागे टाकलं असतं, ‘ या त्याच्या भावनेला ती केवळ अडाण्याची आहे, म्हणून दुर्लक्षून चालणार नाही. या विचारांतच मी कधी झोपी गेलो ते समजलंच नाही. मी दिवसभराच्या प्रवासानं थकलो होतो आणि जेवण मस्त झालं होतं.

मध्येच केव्हातरी ‘धडा ऽऽ ड् धडा ऽऽ ड्’ असे लागोपाठ दहा-बारा वेळा तरी गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि मी जागा झालो. दिवा लावला. आपण जो आवाज ऐकला तो भास असावा, अशी शंका मनाला चाटून गेली. लाहोर-रावळपिंडीतलं फाळणीच्या वेळचं वातावरण आपण मगाशीच ऐकलं होतं. कदाचित त्याचाच हा परिणाम असावा, असं वाटून मी पुन्हा झोपी जायचा प्रयत्न केला; पण दिवा बंद करतो न करतो तोच पुन्हा तसाच आवाज ऐकू आला. या वेळी मात्र त्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलो होतो. आवाज कुठला ते कळत नव्हतं. अखेरीस मी इमानुलखानला बोलावलं आणि विचारलं, “हे काय चाललंय? ” तो म्हणाला, “काही काळजी करू नका. हे असंच चालतं. पेशावरमध्ये ईदचा चंद्र दिसला, तरी हवेत गोळीबार केला जातो. आज ईद साजरी झाली. त्यांचा आनंद चालूच आहे. ही मंडळी अतिशय ‘निरुपद्रवी आणि गरीब ” असतात.

तो गेल्यावर मी निद्राधीन झालो खरा; पण थोड्याच वेळात अजान कानावर पडून मी जागा झालो. ध्वनिक्षेपकावरून पेशावरला नमाजासाठी जाग आणायची ही व्यवस्था काही औरच होती.

सकाळी मी हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारलं, “क्रिकेटचं स्टेडिअम कुठे आहे? ” त्यानं सांगितलं, “त्या समोरच्या फुटपाथवर उभे राहा. जी बस येईल त्यात बसा. ती थेट तुम्हांला स्टेडिअमवर घेऊन जाईल.” त्यानं सांगितल्याप्रमाणे बसनं मला थेट स्टेडिअमवर नेलं; पण तिथे दुसऱ्या दिवशी विश्वचषक क्रिकेटचा सामना असावा, असं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. तो दिवस अधिकृत म्हणजे ‘सरकारी’ ईदचा असल्यानं त्या स्टेडिअममध्ये अक्षरश: हजारोजण नमाज पढायला आले होते. त्यात असंख्य लष्करी अधिकारी होते. तिथून मी कसाबसा बाहेर पडलो आणि रिक्षा करून शहराच्या एका भागात राहणाऱ्या माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे निघालो. रिक्षावाल्यानं त्या भागाच्या जवळपास मला नेऊन सोडलं. ज्या स्टेडिअममध्ये मी गेलो होतो, ते लष्करी संचलनासाठी वापरलं जात असलं पाहिजे. तो भाग कॅन्टोन्मेंटचा होता आणि ज्यांच्याकडे मला जायचं होतं, तेही त्याच भागात राहात होते. मी एक-दोघांना पत्ता विचारला, तर त्यांनी मला समोरचा उर्दूतला फलक पाहायला सांगितलं. मला उर्दू समजत असल्याचं नाटक करावं लागलं. मी थोडा वेळ फलक वाचल्यासारखं केलं आणि पुढे सटकलो. अनेक ठिकाणी चौकशी करून शेवटी तिथे जाण्याचा नाद सोडून द्यायच्या विचारात होतो, तेवढ्यात मला हवा असलेला पत्ता समोरच्याच फुटपाथवर असल्याचं मला दिसलं.

ज्या व्यक्तीची आणि माझी अमेरिकेत गाठ पडली होती, तिचा भाऊ वाटावा असा एकजण त्या बंगल्यातून बाहेर येताना मला दिसला. मी त्याला थेट विचारलं, की आपण ‘रझिया’ चे भाऊ का? तो म्हणाला, “हो. आपण? ” त्याला मी माझी ओळख सांगितली आणि त्याला जो आनंद झाला तो शब्दांतीत होता. त्यानं मला तिथेच कडकडून मिठी मारली आणि तो मला आत घेऊन गेला. ‘रझिया’ ला त्यानं हाक मारली. ती बाहेर आली आणि मला पाहून तिला हर्षवायूच व्हायचा काय तो बाकी होता. तो दिवस पवित्र असल्यानं मला तिनं फराळाचा आग्रह केला आणि तो मानण्याशिवाय पर्यायच नव्हता. एकाच वेळी रसगुल्ले, चिकनटिक्का, कबाब, चविष्ट भजी असे हरतऱ्हेचे पंचवीस पदार्थ तरी टेबलावर मांडले होते. ते खाता खाता तिनं मला माझा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम विचारला. मी म्हटलं, “क्रिकेटचा सामना आहे आणि तो सोडून मी काही येऊ शकणार नाही.” ती म्हणाली, ” त्यानंतर? ” त्यानंतर मी मोकळा आहे’, असं मी सांगितलं. कॅन्टोन्मेंटमध्ये जायला मला असलेल्या बंदीची तिला मी कल्पना दिली. त्यावर ‘तुम्ही त्याची काळजी करू नका. माझे भाऊ तुम्हांला हॉटेलवर न्यायला येतील,’ असं तिनं सांगितलं. मी त्यांची परवानगी घेऊन आणि दुसऱ्या दिवशी यायचं कबूल करून तिथून बाहेर पडलो. तिथून मी तडक कॅन्टोन्मेंटच्या विरुद्ध दिशेला असलेल्या क्रिकेटच्या नियाझी स्टेडिअमवर गेलो. क्रिकेटच्या सामन्याची पूर्वतयारी कितपत झाली आहे ते पाहण्यासाठी मी स्टेडिअममध्ये गेलो. प्रेस बॉक्स आणि तिथली दळणवळणाची व्यवस्था पाहत असतानाच मी अनेकांशी बोलत होतो. माझी ओळख करून देत होतो आणि त्यांची करून घेत होतो. मी पुण्यातून आलोय, म्हटल्यावर पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन्सचे एक वरिष्ठ अधिकारी अब्दुल इलियास हे धावतच माझ्यापाशी आले. मी ईदनिमित्त मुबारकबाद दिल्यावर त्यांना भरूनच आलं. त्यांनी मला अपरिचित असलेल्या एका हिंदी गाण्यात मुंबई-पुण्याचा उल्लेख कसा आला आहे, ते गुणगुणून दाखवलं आणि ते म्हणाले, “भाईसाब, आपकी जो माधुरी दीक्षित है नं…” मी उगीचच अस्वस्थ झालो. माधुरी ही मराठी कन्या असल्यानं हे आपुलकीचं नातं त्यानं माझ्याशी जोडलं असावं. मी त्यावर काही बोलणार, तेवढ्यात ते म्हणाले, ‘अख्खा आशियां तिच्यावरून ओवाळून टाकावा. मी जर कुणी असतो, तर तुम्हांला तो तिच्यासाठी देऊन टाकायलाही कमी केलं नसतं. तेवढ्यात त्यांचा एक सहकारी तिथे आला आणि त्यानं ‘मधुबाला, वैजयंतीमाला, हेमामालिनी, श्रीदेवी यांच्याबद्दलही हे असंच म्हणत होते बरं का !’ असं डोळे मिचकावत सांगून त्यांच्या फुग्यातली हवाच काढून टाकली. ते म्हणाले, “नाही, नाही. माधुरीकडे जे आहे, ते इतर कुणाकडे नाही. मग ती काजोल असो, नाहीतर मनीषा कोईराला. इतना हसीन चेहरा हमने आज तक देखा नहीं”, असं म्हणून त्यांनी आपल्या छातीवर उजवा हात ठेवला. माधुरीच्या हृदयविकारानं ते अगदीच बेचैन झाले होते. माधुरीला देवघरात ठेवून पूजा करायचीसुद्धा भाषा त्यांनी केली. त्याचवेळी कुणाच्या तरी टेपरेकॉर्डरवर ‘दीदी तेरा देवर दिवाना, ‘ हे गाणं ऐकू आलं आणि त्यांना हसू आवरेना.

दुसऱ्या दिवशी स्टेडिअमवर ते जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना त्यांच्या वायद्याची आठवण दिली. त्यांनी ‘हमको सब याद है, आप भी याद रखियेगा’ असं सांगितलं.

सामना संपल्यावर मी हॉटेलवर गेलो. ठरल्याप्रमाणे रझियाचा भाऊ मोटार घेऊन मला न्यायला आला होता. त्यांच्या घरी भरपूर जेवल्यावर आणि गप्पा मारल्यावर तिनं मला, ‘उद्या काय करणार? ‘ असं विचारलं. त्यावर मी लाहोरला परतणार असल्याचं सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, “मला तुम्हांला आमच्या गाडीतून हिंडून पेशावर दाखवायचं आहे. माझे भाऊ हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतील.” मला दुसऱ्या दिवशी वेळ असल्यानं आणि पेशावर पाहायची तीव्र इच्छा असल्यामुळे मी ते मान्य केलं.

मी तिला विचारलं, “आमच्याबरोबर तू येशील का? ” त्यावर ती म्हणाली, “माझे भाऊ मला न्यायला तयार असतील तर मी येईन; पण ते मला नेणार नाहीत.” ती हे सर्व आपल्या भावांसमोरच बोलत होती.

त्यावर मी त्यांना, “तिला बरोबर न्यायचं ना? ” असं विचारलं. तेव्हा ते म्हणाले, “यहाँ का माहौल कुछ अलग है। वो आ नहीं सकती। अगर आप उसे मिलना चाहेंगे तो नमाज के वक्त हम यहाँ आपको लेके आएँगे ।” मी ते मान्य केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते आणि त्यांचा एक मित्र मला न्यायला आले. आम्ही पेशावरच्या अगदी गल्लीबोळातून हिंडलो. पेशावर विद्यापीठ पाहिलं. इस्लामिया महाविद्यालय पाहिलं. ज्या खैबर खिंडीच्या परिसरात पाकिस्तान्यांखेरीज कुणालाही जायला मिळत नाही, तिथे मला जायला मिळालं. त्यांनी मला कुठेही फोटो न काढण्याबद्दल बजावलं होतं. मी कुणीतरी परका असल्याचा समज होऊ नये, यासाठी त्यांनी घेतलेली ती दक्षता होती. येताना वाटेत त्यांनी ‘एक खास चीज दाखवतो’, असं म्हणून आपली मोटार तिकडे वळवली. ‘हा बाजार प्रसिद्ध आहे. देशा-परदेशांत याची ख्याती आहे’, असं त्यांनी सांगितलं, तेव्हा मी काहीसा बुचकळ्यात पडलो. मोटारीतून उतरून मी त्यांच्याबरोबर चालू लागलो. त्या बाजारांच्या कमानीपाशी, आकाशाकडे तोंड केलेल्या अवस्थेत खांद्यावर दोन रायफली धरून एकजण उभा होता. चित्राली टोपी घातलेला तो एक पठाण होता. धष्टपुष्ट आणि उंचापुरा. आम्हांला पाहताच त्यानं गोळीबाराच्या पाच-सहा फैरी झाडून आमचं स्वागत केलं. मी पुरता घाबरून गेलो.

‘अस्सलाम आलेकूम…. आईये, आप तशरीफ लाईये’ असं म्हणून त्यानं आम्हांला आतमध्ये घेतलं. त्या परिसरातली अनेक छोटी दुकानं पिस्तुलं, एके-४७, एके-५६ रायफली यांनी भरलेली होती. माझ्या चेहऱ्यावर त्या क्षणी कोणते भाव होते ते त्यातल्या कुणालाच ओळखता आले नाहीत.

दुकानदार मात्र त्या शस्त्रास्त्रांचे भाव भराभर सांगत राहिले. एके-४७ ची किंमत मला तिथे ‘अवघी २० हजार रुपये’ असल्याचं सांगण्यात आलं. एके-५६ ची किंमत ३५ हजार रुपये सांगण्यात आली. पिस्तुलं, रिव्हॉल्वर्स यांच्या किमती प्रत्येकी दहा-पंधरा हजारांच्या घरात होत्या. चिनी बनावटीच्या एका छोट्या पिस्तुलाची किंमत एक लाख रुपये होती. हे पिस्तूल आपल्या तळहातात मावेल एवढ्या लहान आकाराचं होतं. तशाच दुसऱ्या फ्रेंच बनावटीच्या पिस्तुलाची किंमत ४० हजार रुपये सांगण्यात आली. मला त्यातलं काहीच कळत नसल्यानं आणि त्याची मला गरजही नसल्यानं मी आपला शस्त्रास्त्रांच्या बाजारातला दौरा बिनधास्तपणानं चालू ठेवला.

शस्त्रास्त्रांच्या त्या बाजारपेठेत एरवी माझे हातपाय कापायला लागले असते. असं दृश्य मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेलं नाही. माणसं मारणारी शस्त्रास्त्रं त्याच एकमेव उद्देशानं तिथे खरेदी करण्यात येत होती; पण त्याची कुणालाही शरम वाटत नव्हती. त्या बाजाराच्या तोंडाशी असणारी चार पाच धिप्पाड माणसं आपल्या छातीत धडकी भरवणारी होती. मला जे काही पाठबळ लाभलं होतं, ते मला माझी हालचाल ‘रोबो’ प्रमाणे चालू ठेवायला उपयुक्त ठरलं होतं. दोन डोळ्यांनी त्या बाजारातलं जेवढं म्हणून टिपता येणं शक्य होतं तेवढं मी टिपायचा प्रयत्न करत होतो. शस्त्रास्त्रांच्या बाजारातली ही मंडळी अमली पदार्थांच्या व्यवहारातही असतात. शस्त्रास्त्रे आणायची, विकायची, शस्त्रास्त्रांच्या बदल्यात हशीशसारखा मादक पदार्थ बाहेर पाठवायचा हा त्यांचा धंदा आहे. अफगाणिस्तान हा त्यांच्या दृष्टीनं सोईचा देश बनला आहे. अफगाणिस्तानमधले राज्यकर्ते हे अशा टोळ्यांचं प्रतिनिधीत्व करतच सत्तेवर आलेले असल्यानं तिथे मादक पदार्थांविषयीचं सोवळं उरलेलं नाही. ज्या वेळी अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्ट सोव्हिएट युनियनचं सैन्य होतं, तेव्हा त्यांच्याशी लढणारे पेशावरमधल्या शस्त्रास्त्रांचा वापर करत होते. सोव्हिएट युनियनचं सैन्य मागे घेण्यात आल्यानंतरही त्या देशाची अस्वस्थता संपलेली नाही. रस्तोरस्ती गोळीबार, बाँबस्फोट, रॉकेट्सचा मारा, रणगाड्यांमधून सैन्यावर मारा, काबूल शहरावर विमानातून बाँबफेक यांसारखे प्रकार तिथे सर्रास चालू राहिले. तिथलं ते गनिमी युद्ध आहे, यादवी युद्ध आहे. ‘तालेबान’ ना पाकिस्ताननं कामाला लावलंय. तालेबान या शब्दाचा अर्थ धर्मरक्षक. आपल्याच धर्माच्या बांधवांना ठार करून धर्माचं रक्षण कसं होऊ शकतं, ते ‘तालेबान’ च्या अतिरेक्यांच्या लक्षात येत नाही आणि ‘तालेबान’ मागे असणाऱ्या पाकिस्तानच्या तर ते मुळीच लक्षात येत नाही. अफगाणिस्तान हे आपल्या ताटाखालचं मांजर बनावं आणि वायव्य सरहद्द प्रांतातल्या पठाणांचा अफगाणिस्तानकडे असणारा ओढा थांबावा, अशा दुहेरी हेतूनं पाकिस्ताननं ही खेळी खेळली आहे.

अफगाणिस्तानमधून मध्य आशियापर्यंत जाणारा रस्ता पाकिस्ताननं बांधायचा प्रयत्न चालवला आहे. अफगाणिस्तानमधल्या सरकारनं त्यास विरोध केला आहे. आपल्या अंतर्गत कारभारात केला जाणारा हा हस्तक्षेप आहे, असं त्या सरकारला वाटणं स्वाभाविक आहे. इराणपासून भारतापर्यंत पाकिस्तानच्या भूमीमार्गे तेलवाहिनी टाकू द्यायला पाकिस्ताननं याच कारणासाठी विरोध केला आहे. तेलात वाटा मिळणार असेल तर आपण त्यास परवानगी देऊ, असं पाकिस्ताननं कळवलं आहे.

अफगाणिस्तानची आजची अवस्था फारच वाईट आणि दयनीय आहे. विघटनपूर्व सोव्हिएट युनियनचं सैन्य तिथे होतं, तेव्हा अफगाणिस्तान तुलनात्मकदृष्ट्या शांत होतं. पुढे जेव्हा अमेरिकेची मदत पाकिस्तानमध्ये येऊन ओतली जाऊ लागली, तेव्हा अफगाण बंडखोरांना जोर चढला आणि

त्यांनी त्या मदतीवर आपल्यातला दहशतवाद जोपासला. तिथली यादवी ज्यांनी वाढवली त्यांनाही आता आपल्या कर्तृत्वा’ चं हे फळ आहे, असं मान्य करावं लागलं आहे.

अफगाणिस्तानातले निर्वासितांचे लोंढे त्या वेळी पाकिस्तानात घुसले. त्यातले काही परत गेले. ते गेल्यानंतर अफगाणिस्तानात – आपल्या मायभूमीत त्यातले बरेचसे मारले गेले. काहींचा ठावठिकाणा उरला नाही. अफगाणिस्तानातून आलेले जे निर्वासित सध्या पाकिस्तानात आहेत, ते प्रामुख्यानं शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात, बदाम, पिस्ते, अक्रोड यांच्या व्यापारात आहेत. या अफगाण व्यापाऱ्यांच्या बाजारात एका भल्या मोठ्या मिशाळजीला, जेव्हा मी त्याचा फोटो काढायचा असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यानं चक्क ‘नाही’ म्हणून सांगितलं. याउलट शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत असणाऱ्यांना फोटोबद्दल विचारलं तर ते आपल्याला बेलाशक फोटो काढू देतात. माझ्या बरोबरच्या रझियाच्या भावांनी, तो काढू नका, असं सांगितलं असल्यानं मी ते धाडस करायचं टाळलं. मला फोटो काढायला परवानगी

नाकारणाऱ्यानं आपल्या मिश्यांवर हाताची उलटी मूठ करून, त्या बोक्याच्या मिश्यांप्रमाणे पिंजारून ठेवल्या. “मेरा नाम अब्दुल रहेमान, पिस्तावाला मैं हूँ पठाण’ या गाण्याची याद यावी असे एकाहून एकजण हातगाडीवरही पिस्ते, अक्रोड, बदाम, मनुका, बेदाणे विकताना दिसले.

पेशावरच्या शस्त्रास्त्रांच्या या बाजारपेठेत फिरताना मला त्यांच्या किमतींविषयी बऱ्यापैकी ज्ञान झालं. चेचेन्यापासून बांगला देशापर्यंतच्या याच शस्त्रास्त्रांच्या किमतीचा तपशील मला मिळाला. या परिसरात सरकारी यंत्रणेचे डोळे जागोजाग काम करत असल्याचं मला कळलेलं असल्यानं यातल्या कोणत्याच ठिकाणी आम्ही अति उत्साह दाखवला नाही. पेशावरच्या शस्त्रास्त्रांच्या बाजाराला माझ्या लेखी फार महत्त्व नव्हतं; पण आजवर जे ऐकलं होतं ते तपासून पाहायच्या गरजेपोटी, अनायासे संधी चालून आल्यानं मी तिथे गेलो होतो. कोंबड्यांच्या बाजारात एखादी कोंबडी खुडूक नाही ना, हे जसं त्या कोंबडीच्या पार्श्वभागाला हात लावून तपासलं जातं, तसं शस्त्र खरेदी करणारा त्याची तपासणी करताना पाहून मला मोठं नवल वाटलं. पेशावरमधला अत्यंत संवेदनाशील आणि तितकाच महत्त्वाचा असणारा हा विभाग पेशावर काबूल रस्त्याच्या जवळच आहे. पूर्वीचा हा ग्रँड ट्रंक म्हणजेच जी. टी. रोड. काबूल ते कलकत्ता हा रस्ता जलालाबाद, पेशावर, अटक, रावळपिंडी, लाहोर, अमृतसर, दिल्ली या मार्गानं कलकत्त्याला जातो.

पेशावरच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आम्ही चक्कर टाकली. या परिसरात नेहमीच भीतीचं वातावरण असतं. तिथे कुणाचेही मुडदे पाडून फेकून दिले जातात. हा भाग त्यामानानं कमी गजबजलेला असा आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांचे तीन वर्ग आहेत. मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीप्रमाणे गलिच्छ झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या तिथे कमी नाही. दुसरा जो वर्ग आहे, तो मध्यम आणि त्यातल्या त्यात बरा समजला जाणारा वर्ग आहे. तिसरा वर्ग उच्च आणि गडगंज संपत्तीत लोळणारा असा आहे. तो मूळच्या पाकिस्तान्यांनाही संपवून टाकायला मागेपुढे पाहणार नाही. त्यांच्यासाठी फ्लॅट्स पद्धतीचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यांचं राहणीमानही चांगलं आहे. या श्रीमंत मंडळींपेक्षाही जे आणखी श्रीमंत आहेत ते कराची, इस्लामाबादकडे गेले आहेत. ज्यांना कसंही करून पोट भरायचं आहे ते लाहोरकडे गेले आहेत. त्यांना रोजच्या हाणामारीपासून जीव वाचवायचं अग्निदिव्यही करायचं असतं.,

याच परिसरात उघड्या टेंपोत रूपांतर केलेल्या टोयाटो मोटारींची वर्दळ जास्त असते. मोटारीच्या या मोकळया भागात आकाशाकडे तोंड केलेल्या बंदुका घेऊन बसलेले अफगाण आढळतात. तसं हे दृश्य नेहमीचंच. अफगाण निर्वासितांच्या छावणीतून बाहेर पडताना मी एकदम चपापलो. दोघे-तिघे सरदारजी आपल्या मुलांना घेऊन बस स्टॉपवर उभे असल्याचं विलक्षण दृश्य मी पाहत होतो. नऊ वर्षांपूर्वी लाहोरपासून १२८ किलोमीटरवर असणाऱ्या पूर्वीच्या ल्यालपूरपाशी दोन-तीन तरुण सरदारजींशी माझी गाठ पडली होती. ल्यालपूर म्हणजे सध्याचं फैसलाबाद. मला पाहून ते चपापले, मागे फिरले. मला स्वस्थ बसवेना म्हणून मी तिथल्या कॅसेटविक्रेत्याला हे ‘बाहेरचे’ कोण आहेत, म्हणून विचारलं. त्यावर त्यानं ते नेहमीच त्या भागात हिंडत असतात, असं सांगितलं. ते ज्या एका दुकानापाशी जे काही खरेदी करत उभे होते, त्यास त्यांच्या धर्माची परवानगी नाही. अशा तऱ्हेची ‘ऐश’ करणारे त्या समाजात तरी कधीच दिसत नसल्यानं माझा संशय तेव्हा बळावला होता. फैसलाबादचा तुरुंग त्याच भागात आहे आणि त्याच दिशेनं ते जात असताना मी पाहिलं. अधिक चौकशीअंती पंजाबमधल्या अतिरेक्यांचं प्रशिक्षण केंद्र त्याच ठिकाणी असल्याची माहिती मला कळली. त्या वेळी भारतात परतल्यावर मी ती बातमी ‘केसरी’त प्रसिद्ध केली होती. ती वाचून तेव्हा बरीच खळबळ माजली होती. या घटनेनंतर सहा महिन्यांनी केंद्र सरकारच्या नवीन पाकिस्तानमधल्या ३२ प्रशिक्षण केंद्रांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यात फैसलाबाद होतं.

पेशावरला मला दिसले ते सरदारजी तसे नव्हते. मध्यमवयीन होते. त्यातल्या एकाचं नाव कृपासिंग. तो अफगाणिस्तानातला. तिथल्या यादवीला घाबरून त्यानं सरहद्द ओलांडून पेशावरमध्ये प्रवेश केला. त्याला आणि त्याच्या बरोबरच्यांना पाकिस्ताननं वेगळ्या कारणांसाठी राहू दिलं. त्यानं भारतात परतायचा निर्णय केला होता; पण त्याला सरकारी यंत्रणेचा अतिशय वाईट अनुभव आला. ‘काबूलहून पेशावर, पेशावरहून दिल्ली असा प्रवास करून अनेकजण भारतात आले, मग तुम्हांलाच कसं काय येऊ दिलं नाही? ‘ असं मी विचारताच त्यानं त्यावर थेट उत्तर द्यायचं टाळलं. माणसाचं अंतरंग हे त्याच्या बाह्यांगापेक्षा बरंच वेगळं असतं, हा माझा अनुभव असल्यानं त्याच्याशी चर्चा करण्यात मात्र मी फार वेळ दवडला नाही. त्याची जी काही मतं होती, ती ठाम होती आणि काही झालं तरी माझ्याबरोबरचे दोघं पाकिस्तानी होते.

पेशावरचं हे आगळंवेगळं दर्शन घेऊन आम्ही रझियाच्या घरी परतलो. तिच्या भावांनी मला तिथे सोडलं आणि ते नमाज पढायला निघून गेले. रझियाला, मी उद्या पेशावर सोडून जाणार याचं वाईट वाटत असल्याचं मला जाणवत होतं. कुठे पुणे, कुठे पेशावर आणि कुठे वॉशिंग्टन, न्यूयॉर्क त्या देशात भेटलेल्या दोन भिन्न संस्कृतींच्या आणि तेही दोस्ती नसणाऱ्या देशांमधल्या व्यक्ती पुन्हा कधी काळी भेटू शकतील, यावर माझा विश्वास बसला नसता, असं सांगून तिनं ‘गॉड इज ग्रेट’ असं म्हटलं आणि एक दीर्घ उसासा टाकला. त्याचवेळी तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचं मी पाहात होतो. पृथ्वीतलावर माणूस कुठेही असला तरी तो प्रथम माणूस असतो. त्याची माणुसकी अशीतशी सुटत नाही.

नमाज पढून ते दोघं आणि त्यांचा मित्र परतले, तेव्हा मी पुन्हा एकदा ‘तिला जेवायला घेऊन जायला काय हरकत आहे’, असं विचारून पाहिलं; पण तिची मजल घराच्या दारापर्यंतच असल्याचं त्यामुळे स्पष्ट झालं. त्यांचा नकार घेऊन मी मान फिरवली. ‘खुदा हाफिज’ करायच्या फंदातही न पडता तिनं पाठ फिरवली. त्यांच्याही ते लक्षात आलं; पण आपण इथल्या रूढींनी पूर्णपणानं जखडलो गेलो आहोत, त्याला इलाज नाही’, असं सांगून त्यातल्या एकानं आपल्या मोटारीचं दार उघडलं. ती खूण समजून आम्ही मोटारीत बसलो.

पेशावर शहराचा पुन्हा एकदा धावता दौरा करून आम्ही ‘हॉटेल सलातीन’ मध्ये गेलो. या हॉटेलमध्ये जे पदार्थ मिळतात ते अख्ख्या पाकिस्तानात कुठेच मिळत नाहीत, असं मला सांगण्यात आलं. हॉटेलमधल्या खाद्यपदार्थांचे दरही तसेच चांगले होते. जेवत असताना पुश्तूतल्या एका शब्दाचा शोध मला लागला. त्यांच्यापैकी एकानं कोणत्या तरी एका पदार्थाला ‘नको’ म्हणून सांगितलं, तेव्हा मी त्याला तो शब्द पुन्हा उच्चारायला सांगितलं. तेव्हा त्यानं ‘नको’ म्हणजे पुश्तूत ‘मला ते नको आहे’ असा होतो, असं सांगितलं. मी त्यांना मराठीतही त्याचा अर्थ तसाच होतो, असं जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र ते चक्रावूनच गेले.

अफगाणिस्तानातून आलेले श्रीमंत पठाण काय करतात ते माहीत नाही; पण बहुतेक वेळा ते भरपूर खातात. हॉटेलातही ते खाद्यपदार्थांवर तुटून पडतात. इतर वेळी ते खांद्याला बंदूक अडकवून आरामात हिंडतात. एकूणच पठाण मंडळींचं खाणं प्रचंड आहे. आपल्याकडे कधीकाळी ‘हा आमचा पठाण आहे पाहा,’ अशी ओळख करून दिली जायची. त्याचं मूळ मी पेशावरमध्ये अनुभवत होतो. समोरच्या कढईतून, थाळयातून जे जे काही येईल ते हाणायचं असं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी आडवा हात मारायला लागलो होतो. आम्ही जे काही खात होतो, त्याबरोबरच्या रोटीला ‘रोटी’ का म्हणायचं, ‘रोटा’ का नाही, असा प्रश्न मला पडला.

आपल्याकडल्या दहा-बारा भाकऱ्या एकावर एक ठेवून होणाऱ्या उंचीची एक ‘रोटी’, अशा दहा-बारा रोट्या एका वेळेला कढईभर चिकनबरोबर हाणण्यात त्यांना काहीच वाटत नाही. कधी चिकनऐवजी मटण; पण रोट्यांचा ऐवज तेवढाच. कधीकधी एकेकजण फक्त जेवणातच तीन तास खर्च करताना आढळतात. पेशावरमध्ये जे खाद्यपदार्थ मिळतात त्यांपैकी काहींमध्ये तेलाचा भरपूर वापर केला जातो. एरवी तुमच्या आवडीप्रमाणे ‘कॉन्टिनेन्टल’ पद्धतीनं ते शिजवण्यात येतात. त्यांत तिखटाचा वापरही कमी असतो. पठाण हा बऱ्याच अंशी थंड प्रवृत्तीचा असतो, त्याचं कारण या बिनतिखटाच्या पदार्थांत असायची शक्यता आहे. ‘ज्याला देईल त्याला घरदार लिहून देईल’, असा हा आमचा पठाणी स्वभाव आहे, असं त्यातल्या एकानं मला जेवता जेवता सांगितलं. त्यावर मी विचारलं, “ज्याला घरदार देत नाही त्याला तो काय देतो? ” “त्याला ना? गोळ्या” त्यानं क्षणाचीही उसंत न लावता सांगितलं.

तो पुढे म्हणाला, “ती समोरच्या माणसाकडे दिसते आहे ना, तशा बंदुकीतून… ” तो हे सांगत असताना मी विचार करू लागलो. ‘ईदचा चंद्र पाहून किंवा लग्नाच्या वरातीत आनंदानं बेभान होऊन गोळ्या उडवायच्या प्रकाराला काय म्हणायचं? नशीब, त्यांच्या अशा आनंदाच्या क्षणी आपण तिथे नसतो ते…’ माझ्या मनातल्या विचारांच्या या आंदोलनाला त्यानं व्यवस्थित टिपलं असावं. म्हणूनच तो म्हणाला, “काय हो, तुम्ही काहीच बोलत नाही? ”

आम्ही जे काही जेवण घेतलं ते खरोखरच अप्रतिम होतं; पण त्याला आत्मीयतेचा जो काही मसाला लागला होता, त्याला तर अजिबातच तोड नव्हती.

“अजी गोखलेसाब पान खाएँगे? ” रझियाच्या भावाच्या मित्रानं मला विचारलं.

“एक शर्त पर खाऊँगा । पैसे मैं दूंगा और वो अगर बनारस का पान होगा तो बढ़िया रहेगा । ” मी

“हाँ ऽऽ हाँ ऽऽ देखते हैं।”

कुठे बनारस, कुठे पेशावर; पण पेशावरच्या बाजारात बनारस म्हणजे अगदी अस्सल बनारसचं पान त्यानं मला खिलवलं आणि वर सांगितलं, “आपको अगर कलकत्ते का पान चाहिए, तो वो भी मिल सकता है।’ ”

त्याच्या या माहितीनं मात्र मी चकित झालो होतो. पाचजणांच्या बनारस मसाला पानाचे चाळीस रुपये देऊन झाल्यावर मी त्यांचा निरोप घ्यायला हात पुढे केला आणि म्हटलं, की ‘माझं हॉटेल इथून जवळच आहे. मी चालत जाईन, तुम्ही विनाकारण तसदी घेऊ नका. कदाचित तुम्हांला त्याचा त्रास होईल.’ मला काय वाटलं कुणास ठाऊक; पण मी बोलून बसलो. त्यांनी माझं म्हणणं मानायला नकार दिला. ‘आम्हांला कसला आलाय त्रास. आम्ही तुम्हांला सोडूनच जाऊ.’ त्यांच्या या निर्धारानं मी माझा आग्रह सोडून दिला आणि मुकाट्यानं मोटारीत बसलो. जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलपाशी मोटार थांबली. धडाधड दरवाजे उघडले. त्यातला प्रत्येकजण माझ्याजवळ येऊन मला कडकडून मिठी मारून अगदी भरल्या स्वरात मला ‘खुदा हाफिज’ म्हणाला. ‘मौका मिला तो हम फिर मिलेंगे’, असंही ते म्हणाले. त्यापूर्वी मोटारीत झालेल्या चर्चेत त्यांच्यापैकी प्रत्येकानं भारतात यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना पुणे, मुंबई, उदयपूर, जयपूर, आग्रा, बंगलोर, म्हैसूर, उटी, कन्याकुमारी पाहायचं आहे. केबल टी.व्ही. वर त्यांना जे दर्शन घडतं त्यानं ते भारताच्या मोहात पडले आहेत.

‘यार, हम तो आना चाहते हैं, लेकिन आपके जो ठाकरे है वो हमें शायद आने नहीं देंगे’ असं त्यांचं मत.

मी त्यांना तसं काही नसल्याचं सांगितलं. ‘ठाकऱ्यांचा पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट सामन्यांना विरोध होता. तुम्ही काय क्रिकेट खेळायला येणार आहात का? ठाकऱ्यांचा विरोध पाकिस्तानातून भारतात बेकायदा प्रवेश करणाऱ्यांना आहे, तसा तो माझाही आहे; पण तुमचं तसं नाही’, हे मी सांगताच त्यांना ते पटलं होतं.

हॉटेलसमोरची ती आलिंगन भेट संपली आणि मी वळून हॉटेलच्या बाजूला निघालो तेवढ्यात काहीतरी गडबड झाल्याचा मला संशय आला. मी मागे वळून पाहिलं, तो दोन दाढीदीक्षित त्या मोटारीपाशी उभं राहून मोटारीतल्यांची चौकशी करीत होते. त्यांनी त्यांच्याकडलं ओळखपत्र काढून घेतलं, ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेतलं. जवळच्या डायरीत एकानं मोटारीचा क्रमांक उतरवून घेतला. मी स्तंभित झालो होतो. मी म्हटलं, “ क्या हुआ? ” त्यावर त्या साध्या पठाणी वेशातल्या एकानं माझ्यावर खेकसून ‘कुछ नहीं, कुछ नहीं… भागो भागो’ म्हणून सांगितलं. रझियाचा भाऊ इक्बालनं मला ‘हॉटेलमध्ये जा’ अशी खूण केली.

मला त्या प्रकाराचा उलगडा झाला होता. ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ चे गुप्तचर आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते आणि त्यांना आमच्यातले हे मित्रत्वाचे संबंध अमान्य होते. त्यांनी मला अफगाण निर्वासितांच्या छावण्या, शस्त्रास्त्रांचा बाजार, पेशावर विद्यापीठ, खैबर खिंड दाखवल्याचा त्यांना राग आला असावा. कॅन्टोन्मेंट भागात रझियाला मी भेटायला गेल्याचाही कदाचित त्यांना राग आला असेल. हा अनुभव मला नवा नव्हता; पण माझ्यामुळे त्यांना त्रास व्हावा, हे माझा संताप अनावर करणारं होतं.

मी खोलीत गेलो. जरा वेळानं मी दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिलं. त्यातला एक दाढीवाला ‘रिसेप्शन’पाशी बसून होता. माझी वाट पाहत तो बसला असणार, याची मला खात्रीच होती. हॉटेलसमोरचा हा सर्व प्रकार संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमाराचा. तो ‘आय. एस. आय. ‘चा दूत रात्री आठपर्यंत तरी हॉटेल व्यवस्थापकासमोर ठिय्या देऊन बसला होता. मी मनात म्हटलं, “लेका मी आता खाली येतंच नाही, काय करशील !’

अखेरीस तो कंटाळून निघून गेल्याची खात्री करून मी रझियाला फोन करायला बाहेर पडलो. वीस-पंचवीस पावलं चाललो असेन नसेन तेवढ्यात मी मागे वळून पाहिलं. फक्त डोळे उघडे राहतील, अशा बेतानं शाल पांघरलेला एक गृहस्थ माझ्या मागे मागे येत असल्याचं मला दिसलं. तरीही की बाजारात जाऊन दोन-चार केळी, काही रसगुल्ले घेऊन फोन करायला गेलो.

थरथरत्या हातानंच फोन केला. पलीकडून आवाज आला, “मिस्टर गोखले, यू नीड नॉट वरी वुई आर रेडी टू फेस एनी सिच्युएशन. ” मला तेवढाच दिलासा मिळाला, तरी काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव मला झाली होती. संध्याकाळचे ते सरकारी पाहुणे त्यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते. लोकशाही देशातला हा हुकूमशाही प्रकार कदाचित त्यांनाही नवा नसेल. मानसिक छळ करायची ही रीत त्यांच्या परिचयाची असेलही कदाचित; पण हा प्रकार गंभीर होता. परस्परांविषयीची संशयाची भावना अशानं नक्कीच दूर होणार नाही. तथापि हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि राज्यकर्ते ज्यांच्या मुठीत आहेत त्या पाकिस्तानी लष्कराला समजावून कोण सांगणार?

 
अरविंद व्यं. गोखले