पाकिस्तानात डोकावणारा भारत

 मुजफ्फर हुसेन

पाकिस्तानात डोकावणारा भारत
पाकिस्तानात डोकावणारा भारत

‘केसरी’ चे माजी संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.




पर्यटकाच्या रूपानं एखादा लेखक जेव्हा देशा- परदेशात प्रवास करतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टींचा कल्लोळ उठतो. त्याच्या मनातला लेखक अनेक नव्या गोष्टींचा तिथे शोध घेऊ लागतो. या नव्या देशात, नव्या भागांत जेव्हा तो तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती घेत असतो, तेव्हा त्यात स्वदेशाचं कुठं दर्शन घडतयं का, ते उलगडून पाहू लागतो. पाकिस्तान हा देश कधीकाळी आपल्या देशाचा अविभाज्य घटक होता, या भावनेनं त्याचं मन उचंबळून येतं. जेव्हा जर्मनीचे दोन तुकडे झाले, तेव्हा पश्चिम जर्मनीत राहणारा त्या भिंतीपलीकडल्या पूर्व जर्मनीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहात असेल? या दोन जर्मनी आज एक आहेत. दक्षिण कोरियाचा माणूस उत्तर कोरियात जाऊन कशाचा शोध घेत असेल? या फाळणी झालेल्या देशांचा आत्मा एकच आहे. जर्मनी, कोरिया, व्हिएटनाम, येमेन या दुभंगलेल्या देशांची कहाणी एकसारखी आहे. व्हिएटनामचे आजचे चित्र वेगळे आहे. एका भागात राहणारा कुणी जेव्हा पलीकडल्या भागात प्रवास करतो, तेव्हा त्याला आपल्यातल्या अपुरेपणाची जाणीव होते. फुटीर शरिरातला अखंड आत्मा बंड करून पेटन उठतो. त्याच्यातल्या लेखकाने जागे होऊन आपल्या धर्माचे पालन करावे, अशी त्याची अपेक्षा असते. त्याने देशाची फाळणी हा शाप आहे, हे जगाला ओरडून सांगावे, अशी त्याच्या त्या आत्म्याची प्रेरणा त्याला बजावत असते.

‘केसरी’ चे संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.

गेल्या पन्नास वर्षांत अनेकजण पाकिस्तानात गेले, अनेकांनी पाकिस्तानवर लिहिलंसुद्धा; पण अरविंद गोखले यांनी पाकिस्तानला जाऊन पत्रकाराच्या दृष्टीनं जे काही टिपलं आणि आल्यावर जे काही लिहिलं ते आगळंवेगळं आहे. आमचे पेशवे अटकेपार पोहोचले होते. त्यांनी तिथे आपले झेंडे  रोवले होते, फडकवले होते, असं आपला इतिहास आपल्याला सांगतो. अरविंद व्यं. गोखले यांच्या रूपानं मराठीतला एक लेखक आपली विचारपताका घेऊन अटकेपार पोहोचला आणि त्यानं तिथे ध्वजा फडकवली. ‘खैबर’ खिंडीची माहिती घ्यायला पाकिस्तानात जाणं ही एक असामान्य गोष्ट आहे. पाकिस्तान जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा काकासाहेब गाडगीळ आणि श्रीप्रकाश यांच्यात त्या विषयावर चर्चा झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर तर आपल्या मृत्यूशय्येवरसुद्धा सिंधूचंच स्मरण करत राहिले. तथापि जसजसा काळ लोटू लागला. तसतसा इतर भारतीयांप्रमाणे मराठी माणूसही आपल्या या मातृभूमीच्या त्या भागाला विसरू लागला. इतक्या वर्षांनंतरसुद्धा एका मराठी लेखकानं त्या विस्मृतीत गेलेल्या भूमीवर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या, याबद्दल अरविंद गोखले यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.

दोन्ही देशांदरम्यानचे संबंध चांगले नसल्याने इच्छा असूनही भारतीय पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत. तथापि त्यांच्या मनात ‘पाकिस्तान कसा असेल? ‘ हा विचार घर करून असतो. आमच्यापासून वेगळे होऊन त्याने किती प्रगती केली असेल? आजसुद्धा तिथली जनता १४ ऑगस्ट, १९४७ रोजी जे काही घडले ते योग्य झाले नाही, असा विचार करत असेल का? असे हे नानाविध प्रश्न पाकिस्तानच्या सध्याच्या अवस्थेचे वर्णन गोखले यांनी पानापानांतून केले आहे. फाळणीबद्दल खेद व्यक्त करणारे, पाकिस्तानात आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतील. नव्या पिढीने अखंड भारत जर पाहिलेलाच नसेल, तर त्याचा विचार करायची किंवा तशी इच्छा धरायची प्रक्रिया निर्माण कशी होणार? त्यामुळे जेव्हा काही जागरूक नागरिकांबरोबर किंवा बुद्धिवाद्यांसमवेत चर्चा केली जाते, तेव्हा ते फक्त एवढंच म्हणतात, की ‘जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. होऊन गेलेल्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा, आहे या अवस्थेत दोन शेजारी देश परस्परांशी आपले वर्तन चांगले कसे ठेवू शकतील, याचा विचार करायला हवा.’ गोखले यांच्या लिखाणावरून दोन्ही देशांत शांतता आणि बंधुभाव नांदण्यासाठी आवश्यक आहे ती इच्छाशक्ती, हे स्पष्ट होते. परस्परांच्या मैत्रीसाठी पुढे आले पाहिजे, पण दोन्ही देशांतली जनता आपल्या राजकारण्यांसमोर लाचार आणि अगतिक बनली आहे.

अरविंद व्यं. गोखले यांचे ‘पाकिस्तानामा’ हे पुस्तक ‘बिलोरी लाहोर’  या प्रकरणाने सुरू होते. बेनझीर भुट्टो यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या कालखंडाचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. सिंधू नदीच्या खोऱ्याविषयी गोखले यांनी एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. त्यांच्या प्रत्येक ओळीतून सिंधू नदीच वाहते आहे, असा तुम्हांला भास होईल. आज आम्ही ज्याला पेशावर म्हणतो ते एकेकालचे पोरसपूर आहे. लष्करी छावणी पेशावरलाच असल्याने तिथे मोकळेपणाने हिंडता येत नाही. लष्कराचे कडक नियंत्रण असणारा असा तो भाग आहे. भारतीयाला तर तिथपर्यंत पोहोचता येणंच महा कर्मकठीण. गोखले तिथेही पोहोचले; पण तिथे जाताच त्यांच्यावर कोणता प्रसंग गुदरला त्याची रोमहर्षक, चित्तथरारक कहाणी या पुस्तकात आहे. केवळ परदेशी मदतीवर कोणताही देश आपल्या पायावर उभा राहू शकत नाही, याचे योग्य ते विवेचन गोखले यांनी केले आहे.

‘पाकिस्ताननामा’तल्या दहाव्या प्रकरणात लाहोरमधल्या सर्वांत मोठ्या ‘दयाळसिंग लायब्ररी’ विषयी गोखले यांनी अतिशय उत्कट अशी माहिती दिली आहे. फाळणीचे चटके या ग्रंथालयालाही बसले आहेत. १९४८ मध्ये या ग्रंथालयाला पेटवून देण्यात आले होते. या ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारापाशी लोकमान्य टिळक, प्रेमचंद आणि राहुल सांकृत्यायन यांची भव्य तैलचित्रे पाहायला मिळायची. लोकमान्यांचे ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’ किंवा तुलसीदासांचे रामायण हे ग्रंथ तिथे आजही पाहायला मिळतात, तेव्हा भूमातेची वाटणी करणाऱ्यांना प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्ही संस्कृतीचे कशा पद्धतीने आणखी तुकडे करणार आहात?’ मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतली असंख्य पुस्तके आजही या ग्रंथालयात धूळ खात पडली आहेत. त्यांना नजरेखालून घालणारा आज तिथे कुणी नाही, हे दुर्दैव.

पाकिस्तानातल्या हिंदूंची अवस्था कशी आहे, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. त्याविषयी गोखले पुष्कळ काही सांगू शकतात. कराचीचे एकेकाळचे ‘पाकिस्तान नॅशनल असेंब्ली’ चे सदस्य तीरथदास लखियानी यांच्याशी गोखले यांनी चर्चा केली आहे. कराचीचे स्वामीनारायण मंदिर धडधाकट आहे; पण तक्षशिलेचे गणपतीचे मंदिर भग्नावस्थेत आहे. बेनझीर भुट्टो यांच्यावर पाकिस्तानात सध्या कुणी भरवसा ठेवू इच्छित नाही, हे लेखकाने केलेले विश्लेषण मार्मिक तर आहेच, पण ते शंभर टक्के खरे ठरले आहे.

पाकिस्तानच्या दूरसंचार विभागाच्या संचालकांची गाठ पेशावरला पडली असताना, त्यांनी गोखले यांना ‘माधुरी दीक्षित द्या आणि अख्खा आशिया घ्या’, असे म्हटले होते. म्हणजेच माधुरी दीक्षितसमोर काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला अगदीच नगण्य आहे. लेखकाने आपल्या पाकिस्तान दौऱ्यात झी. टी. व्ही., एल. टी.व्ही., ए.टी.एन. या केबल वाहिन्या किती लोकप्रिय आहेत ते पाहिले आहे, अनुभवले आहे. भारत हा पाकिस्तानच्या जनतेचा हितचिंतक आहे, हे या केबल वाहिन्यांमुळे पाकिस्तान्यांच्या लक्षात आले असायची शक्यता आहे. पाकिस्तानातला सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर ‘भारत दर्शनासाठी येऊ इच्छित आहे. तथापि आपल्याच देशाच्या कडक धोरणांविषयी तो नाराज आणि अस्वस्थ आहे. दोन्ही देशांमधले दूतावास भ्रष्ट आहेत. सामान्य माणसाच्या भावना त्यांना उमजतच नसल्याने मैत्रीपूर्ण संबंधात भिंत बनून ते उभे आहेत.

दोन्हा देशांमधल्या सामान्य माणसांमधल्या मैत्रीच्या पुलाचे काम पार पाडून गोखले यांनी लेखक धर्माची जाण ठेवली आहे. त्यांच्या या सेतुबंधनाच्या कार्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. पाकिस्तानविषयी अनभिज्ञ असणाऱ्या भारतीयाला गोखले यांचे ‘पाकिस्ताननामा’ हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. मराठीत त्यांनी केलेले हे कार्य मोलाचे आहे.

 
मुजफ्फर हुसेन  
सी १/८ पार्कसाइट कॉलनी, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०० ०७९.